आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘कसोटी’ क्रिकेटची! (अग्रलेख)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गतवर्षी मानगुटीवर बसलेल्या ‘आयपीएल’ मॅच फिक्सिंगच्या भुताने बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा अजूनही पुरता पिच्छा पुरवला आहे. मात्र, जावयाच्या कर्तृत्वामुळे अडचणीत आलेले सासरेबुवा फारच खमके निघाले. बीसीसीआयमधील आप्तस्वकीयांनी राजीनामासत्र सुरू केल्यानंतरही ते त्या दबावाला बळी पडले नाहीत. राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंच्या निकालनिश्चितीतील सहभागाची चौकशी सुरू असताना त्यांनी अध्यक्षपदाची खुर्ची सोडली. सकृतदर्शनी त्या वेळी तसे दिसत असले तरीही त्या खुर्चीवरून पायउतार झाल्यानंतरही पाठीमागून सारी सूत्रे श्रीनिवासन हेच हलवत होते, हे नंतर स्पष्ट झाले. न्यायालयाच्या नजरेसमोरच त्यांनी पुन्हा एकदा बीसीसीआयचे अध्यक्षपद बहुमताने मिळवले. त्यानंतर सारे काही आलबेल आहे, असे वाटत असतानाच सर्वोच्च न्यायालयाने न्या. मुदगल समितीला आयपीएल मॅच फिक्सिंग प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याचे अधिकार दिले.

या मुदगल चौकशी समितीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने पाहिला आणि श्रीनिवासन यांनी आतापर्यंत बीसीसीआय अध्यक्षपदाची खुर्ची रिकामी का केली नाही, असा सवाल केला. अशा प्रश्नांना घाबरून पद सोडले असते तर ते श्रीनिवासन कसले? श्रीनिवासन यांनी आजही आपला जुनाच राग पुन्हा एकदा आळवला. ‘मी काहीही गैर केले नाही, मला बीसीसीआयवरून कुणीही हुसकावून लावू शकत नाही,’ असे विधान त्यांनी बुधवारी केल्याचे म्हटले जाते. क्रीडा क्षेत्र मक्तेदारी आणि भ्रष्टाचारमुक्त करण्याचे प्रचंड वारे सध्या भारतात वाहत आहेत. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने गुन्हेगारीबाबत तक्रार असलेल्यांना भारतीय ऑलिम्पिक संघात स्थान नको, असे सांगून जवळजवळ वर्षभराच्या कालावधीसाठी आपल्या राष्ट्रीय संघटनेला बडतर्फकेले होते. आयओसीला संलग्न असलेले दोनशेहून अधिक देश भारतासाठी लागू करण्यात आलेले नियम, निकष, आचारसंहिता किती मानतात किंवा पाळतात, हा संशोधनाचा विषय आहे. त्याच धर्तीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात श्रीमंत संघटना असणार्‍या बीसीसीआयचीही कोंडी करण्याची संधी देशातील आणि देशाबाहेरची अनेक मंडळी करत आहेत. आयसीसीला अलीकडेच ‘बिग थ्री’ ही नवी संकल्पना देणार्‍या आणि पर्यायाने अन्य सदस्यांनाही आर्थिक अनुदानात भरघोस वाढ करून देण्याची योजना मांडणार्‍या श्रीनिवासन यांना खिंडीत गाठण्याची संधी अनेक जण शोधत आहेत.

जावयाच्या कर्तृत्वामुळे त्यांच्या हितशत्रूंना ती आयतीच मिळाली आहे. त्या सर्वांचे श्रीनिवासन हे एकमेव लक्ष्य असावेत, असे वाटते. कारण संपूर्ण आयपीएल स्पर्धांमध्येच अनेक गोष्टी संशयास्पद घडत असल्याची शंका येते. पहिल्या तीन स्पर्धांमध्ये प्रक्षेपण हक्कातील आर्थिक व्यवहारात गैरव्यवहार करून परागंदा झाल्याचे आरोप ललित मोदी यांच्यावर आहेत. प्रत्येक फ्रँचायझीमधील काही सामन्यांचे निकाल शंकेची पाल मनात चुकचुकवल्याशिवाय राहत नाहीत. पहिल्या पाच वर्षांत नफा होणार नाही, हे ठाऊक असूनही प्रत्येक फ्रँचायझी प्रत्येक वर्षी प्रचंड खर्च कसे करू शकतात, हा यक्षप्रश्न आहे. पंचतारांकित हॉटेलमधील वास्तव्य, फिजिओ, ट्रेनर्स, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ, प्रशासकीय स्टाफ यावरचा प्रचंड खर्च त्यानंतरही करण्यात येत आहे. महागडी तिकिटे हातोहात विकली कशी जातात, हे जसे कोडे आहे; तसेच स्टेडियम हाऊसफुल्ल होतात कशी, हेही एक आश्चर्य आहे. यापैकी कशाचीही चौकशी होत नाही. श्रीनिवासन यांचा मोठा गुन्हा म्हणजे ते हुकूमशहा आहेत. त्यांनी आपला प्रत्येक प्रतिस्पर्धी हर प्रकारे चिरडून टाकला किंवा त्याला हुसकावून लावले. स्वत: भ्रष्टाचारात सहभागी नाहीत, या एकमेव गुणवत्तेवर त्यांना बीसीसीआयने आणखी किती काळ सहन करायचे, हाही प्रश्न आहे. आयपीएल स्थापनेच्या वेळी त्यांनी बीसीसीआयवर पदाधिकारी असतानाही स्वत:चा संघ उतरवला. त्यांच्या हितसंबंधांविरुद्ध कृतीबाबतही संशय घेण्यात आला. मात्र, त्या वेळी अन्य सदस्यांनी स्वत:चा संघही भविष्यकाळात उतरवण्याची मनीषा बाळगून श्रीनिवासन यांच्या बाजूने मतदान केले. त्या वेळी सुटलेल्या श्रीनिवासन यांच्या महत्त्वाकांक्षेचा वळू नंतर चौखूर उधळत गेला. त्यांनी सर्वप्रथम आपल्याला विरोध करणार्‍या प्रत्येकाला खड्यासारखे वेचून दूर केले. त्यामुळे बीसीसीआयमध्ये त्यांना विरोध करणारे कुणी उरलेच नाही.

जावयाचा क्रिकेट सट्टेबाजी आणि निकालनिश्चितीमधील संबंध जेव्हा न्या. मुदगल समितीच्या अहवालाद्वारे अधिक दृढ झाला, त्या वेळी न्यायालयालाही उद्वेगाने मत व्यक्त करावे लागले की, एवढे होऊनही श्रीनिवासन अध्यक्षपदाच्या खुर्चीला चिकटून कसे राहू शकतात? नैतिकता हे प्रमाण मानून श्रीनिवासन अध्यक्षपद सोडण्यास तयार नाहीत. त्यांना स्वत:च्या आयसीसीमधील भविष्याची काळजी वाटत आहे. स्वत:च्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे आणि यंदाच्या आयपीएल स्पर्धेचे अस्तित्व त्यांना टिकवायचे आहे. त्यासाठी त्यांनी न्यायालयाकडेच स्पष्टीकरण मागितले आहे. चौकशीनंतर त्यांना पुन्हा एकदा अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसायचे आहे. त्याच शिडीचा वापर करून ते आयसीसीच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीवर विराजमान होणार आहेत. त्यांच्या या महत्त्वाकांक्षेला अनेकांनी सुरुंग लावले आहेत. न्यायालयाने जावई मयप्पन यांना दोषी ठरवल्यास किंवा चेन्नई सुपरकिंग्जच्या खेळाडू व संघातील काही खेळाडूंबाबतचे कथित आरोप खरे ठरल्यास भारतीय क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा भूकंप होणार आहे. फक्त एक गोष्ट स्पष्ट व्हायला हवी की, श्रीनिवासन यांच्या हकालपट्टीमुळे भारतीय क्रिकेट साफ आणि स्वच्छ होणार आहे काय? अनेक भ्रष्टाचारी खेळाडू, अन्य पदाधिकारी जे अजूनही मोकाट फिरताहेत, त्यांना चौकशीच्या जाळ्यात कोण अडकवणार? भारतातील अन्य खेळांच्या संघटनांप्रमाणे क्रिकेट संघटनेतही प्रत्यक्ष हा खेळ खेळणार्‍यांना कमी स्थान व प्रतिनिधित्व दिले जाते. प्रशासन व्यवस्थेत उत्तम काम करणारे ब्रिजेश पटेल, अंशुमन गायकवाड, संजय जगदाळे, रणजित बिस्वाल यांच्यासारखे माजी खेळाडू आहेत. शशांक मनोहर यांच्यासारखे कर्मठ क्रिकेट प्रशासकही होते. केवळ श्रीनिवासन यांची गच्छंती करून भारतीय क्रिकेट स्वच्छ होणार नाही, तर अशा खेळाडू व प्रशासकांना संघटनेवर स्थान दिले गेले पाहिजे. आज तरी श्रीनिवासन यांनी भारतीय न्यायव्यवस्थेविरुद्ध दंड थोपटले आहेत. उद्या गुरुवारनंतरचे न्यायालयाच्या सुनावणीनंतरचे चित्र किती वेगळे असेल?