आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टाइपरायटरची निवृत्ती (अग्रलेख)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र सरकारने अलीकडेच जाहीर केल्यानुसार टाइपरायटरचा खट् खट् खटाक् खट् असा आवाज आता कायमचा थांबणार आहे. कर्नाटकने यापूर्वीच असा निर्णय घेतला आहे. खरे तर टाइपरायटर मशीनचे उत्पादन करणार्‍या गोदरेज अँड बॉइस या कंपनीने 2011 मध्येच उत्पादन थांबवत असल्याचे जाहीर केले. टाइपरायटरचे उत्पादन करणारी ही शेवटची कंपनी होती, पण त्याबाबतचा सरकारी पातळीवरील निर्णय होण्यास तीन वर्षे जावी लागली. एक काळ असा होता, मुलगा किंवा मुलगी इंटर पास झाली की लगेच टायपिंगच्या क्लासला जात असे. पदवी आणि सोबत टायपिंगच्या परीक्षेचे प्रमाणपत्र असले की शासकीय कार्यालयात, न्यायालयात, एखाद्या बड्या कंपनीत टायपिस्ट म्हणून लागण्याची संधी असायची. टायपिंगबरोबर शॉर्टहँड येत असेल तर सोन्याहून पिवळे! टायपिंग आणि शॉर्टहँड येणार्‍या अनेक मुलींचे खासगी कंपन्यांमध्ये साहेबाची सेक्रेटरी म्हणून करिअर घडले. त्या वेळी टायपिंगची इतकी चलती होती की नंतरच्या काळात जिल्ह्याच्या ठिकाणाबरोबरच तालुक्याच्या ठिकाणीदेखील दोन-चार टायपिंग इन्स्टिट्यूट दिसू लागल्या. एक परीक्षा उत्तीर्ण झाली की लगेच स्पीड वाढवून दुसर्‍या परीक्षेला बसायचे, असा ध्यासच शासकीय नोकरीसाठी आसुसलेल्या एका पिढीने घेतला होता.

सकाळी कॉलेजला आणि दुपारी, संध्याकाळी टायपिंगच्या क्लासला जाण्याचा त्या वेळी ट्रेंड होता. नियंत्रित अर्थव्यवस्थेत लोकांची स्वप्ने अशी मर्यादितच होती. दुपारच्या शांत वातावरणात चालताना कानावर खट् खट् खटाक् खट् आवाज यायचा आणि मग टायपिंग इन्स्टिट्यूटमधील त्या दृश्याकडे लक्ष जायचे. समोरच्या मशीनवर टायपिंगचा सराव करत लाकडी स्टूलवर बसलेले भावी शासकीय कर्मचारी नजरेस पडायचे. टायपिंगच्या क्लासमध्ये शेजारी-शेजारी बसून प्रेमात पडल्यावर नंतर घरातून बाहेर पडण्यासाठी टायपिंगचा क्लास हे कारण पुरेसे विश्वासार्ह ठरले, असा हा काळ. टाइपरायटरवर काम करण्याची गंमत होती. त्यात अचूकतेला अतिशय महत्त्व होते. चूक झालीच तर व्हाइटनरशिवाय पर्याय नसे. टायपिंग करताना एक ओळ पूर्ण केली की पुढच्या ओळीला जाण्यासाठी कडेचा दांडा फिरवावा लागे. नवख्या व्यक्तीने वेगाने टायपिंग करण्याचा प्रयत्न केला की टाइपरायटरमधील अक्षरांचे दांडे एकमेकांत अडकत. कधी कधी त्या दांड्यात रिबन अडकत असे. मग ती काढण्यासाठी हात काळे करावे लागत. अशा या टाइपरायटच्या निर्मितीत अनेकांचे योगदान आहे. हा नाद भारताला लावणार्‍या ब्रिटिशांपैकी एक हेन्री मिल याने मोठ्या मेहनतीने आणि अभ्यासाने हे टाइपरायटर मशीन बनवले.

त्यासाठी त्याला खर्चही खूप आला होता. 1714 मध्ये त्याने त्याबद्दल पेटंट मिळवले. 1829 मध्ये विल्यम ऑस्टिन बर्ट यांनी टायपोग्राफर तयार करून पेटंट मिळवले. व्यावसायिक पातळीवर यशस्वी ठरलेला पहिला टाइपरायटर बनवला तो अमेरिकेतील ख्रिस्तोफर शोल्स आणि कार्लोस गिडेन यांनी 1868 मध्ये. कीबोर्डवरील अक्षरांची ही रचना आणि पहिला टाइपरायटर तयार केला ख्रिस्तोफर शोल्स या अमेरिकन व्यक्तीने. 1872 मध्ये शोल्सने त्याचे पेटंट, रेमिंग्टन या कंपनीला 12,000 डॉलर्सना विकले. तेव्हापासून शोल्सने तयार केलेली कीबोर्डवरील अक्षरांची रचना काहीही बदल न होता जशीच्या तशी चालत आली आहे. भारतावर इंग्रजांची राजवट असताना देशात टाइपरायटरचे आगमन झाले. स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय भाषांमध्ये, भारतीयांची गरजा पूर्ण करण्यासाठी टाइपरायटरची गरज भासू लागली व त्या वेळचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ही बाब बोलून दाखवली. ‘गोदरेज’ समूहाने हे आव्हान स्वीकारले. 1950 मध्ये दिल्लीत भरलेल्या औद्योगिक प्रदर्शनात पं. नेहरूंनी एका मशीनवर काही बटणे दाबून टाइपरायटरचे प्रात्यक्षिक पाहिले. नंतर काही काळातच हा टाइपरायटर शासकीय सेवेत रुजू झाला. गोदरेजने 2011 मध्ये टाइपरायटरचे उत्पादन थांबवण्याचा निर्णय घेतला.

त्याअगोदरच हाल्डा (ब्रिटिश), ई. रेमिंग्टन अँड सन्स (अमेरिका) आणि फॅसिट (स्वीडन) या कंपन्यांनी उत्पादन थांबवण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या वीस-पंचवीस वर्षांत तंत्रज्ञानात वेगाने बदल होत गेले. त्याच वेळी अर्थकारणातही आमूलाग्र परिवर्तन झाले. या सगळ्याच्या रेट्यामुळे इच्छा असो किंवा नसो, समाजजीवनातही झपाट्याने मोठे बदल झाले. टाइपरायटरची जागा बहुपयोगी संगणकाने घेतली. एक वेळ अशी होती की एलआयसी, बँका, शासकीय कर्मचार्‍यांच्या सगळ्या संघटनांनी संगणकाला कडाडून विरोध केला होता. संगणकामुळे बेरोजगारी वाढेल, असा त्यांचा दावा होता. प्रत्यक्षात विमा आणि बँकिंग क्षेत्रात खासगी कंपन्या आल्याने रोजगाराच्या संधी प्रचंड वाढल्या, त्याचबरोबर अनेकांना मान मोडून काम करण्याची सवय करून घ्यावी लागली. संगणकाने कामाची गती वाढवली आणि माणसाला त्या गतीने पाळण्यास भाग पाडले. टाइपरायटर हे यंत्र कालबाह्य झाले, हे महाराष्ट्र शासनाला समजायला आणि तसा अधिकृत आदेश काढायला 2014 उजाडावे लागले. 15 नोव्हेंबर 2015 अखेरपर्यंत राज्यातील सर्व टाइपरायटिंग इन्स्टिट्यूटनी संगणक वापरण्यास सुरुवात करावी आणि त्यांच्या अभ्यासक्रमांचे स्वरूपही बदलावे, असा आदेशच (जीआर) शासनाने काढला आहे. त्यामुळे या संस्था आता संगणक प्रशिक्षण संस्था होणार आहेत. या संस्थांनी तसे बदल केले नाहीत तर त्यांचे परवाने रद्द होणार आहेत. राज्यात सध्या अशा 10 हजार टाइपरायटिंग इन्स्टिट्यूट आहेत. आता त्या सगळ्यांचे रूप पालटणार आहे. एक-दीड वर्षांपूर्वी टपाल कार्यालयातील तारेची कडकट्ट थांबली आणि आता टाइपरायटरची खट् खट् खटाक् खट् थांबते आहे. मानवाच्या प्रवासात एकेकाळी अपरिहार्य ठरलेल्या अशा अनेक यंत्रांना एकविसावे शतक सक्तीने निवृत्त करणार आहे! यंत्रांच्या या वाढत्या वेगाने माणसालाच निवृत्त करू नये, याची मात्र सजग माणसांनीच काळजी घ्यायची आहे.