आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदानाचे मानसशास्त्र (अग्रलेख)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विशिष्ट राजकीय पक्षांची कामगिरी, नेत्यांची प्रतिमा, स्थानिक मुद्दे, राजकीय-सामाजिक-आर्थिक विषय हे निवडणुकांमध्ये लढवले जात असले तरी मतदाराच्या मनात नेमके काय असते, याचा थांगपत्ता आजपर्यंत कोणत्याही मतदानपूर्व चाचण्यांमधून लागलेला नाही. समाजात बहुसंख्य असा ‘अदृश्य’ मतदार असतो की त्याची राजकीय भूमिका अखेरच्या क्षणी बदलत असते. निवडणूक शास्त्राचा अभ्यास करणारे असे सांगतात की, असा ‘फ्लोटिंग व्होटर’ निवडणुकीचा निकालच आयत्या वेळी (एका रात्रीत) बदलू शकतो. हा मतदार वास्तविक कुठल्या लाटेचा बळी नसतो किंवा त्याच्यावर प्रसारमाध्यमांचा खोलवर परिणाम झालेला नसतो. गुरुवारी 2014 च्या लोकसभा निवडणुकांचे तिसर्‍या टप्प्याचे जे मतदान झाले ते विक्रमी होते, असे निवडणूक आयोगाची आकडेवारी सांगते. देशातल्या केरळ, हरियाणा, ओडिशा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, झारखंड, दिल्ली, बिहार, छत्तीसगड, लक्षद्वीप, चंदिगड, अंदमान व निकोबार येथील 91 जागांसाठी हे मतदान 2009 च्या तुलनेत अधिक झाले. छत्तीसगडसारख्या नक्षलग्रस्त राज्यातही सामान्य मतदारांनी नक्षलवाद्यांच्या दादागिरीला झिडकारून मतदान केले, ही कौतुकास्पद बाब म्हणावी लागेल.

लोकांनी जास्तीत जास्त व निर्भयपणे मतदान करावे, यासाठी निवडणूक आयोगासह सर्वच राजकीय पक्षांनी आवाहन केले होते; त्याचा परिणाम दिसून आला, असे म्हणावयास हरकत नाही. काही राजकीय विश्लेषकांनी मतदानाच्या टक्केवारीत झालेली वाढ ही भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या लाटेचा परिणाम आहे, असे म्हटले आहे. या निवडणूक विश्लेषकांच्या मते, गेल्या दोन महिन्यांत नरेंद्र मोदींनी देशभर जे झंझावाती प्रचार केले त्याचे दृश्य परिणाम या टक्केवारीत दिसून येत आहेत. हे सुस्पष्ट आहे की, मोदींची टीव्ही मीडियाने व प्रिंट मीडियाने ‘लार्जर दॅन लाइफ’ प्रतिमा निर्माण केली. मोदी हे सामान्य भारतीयांची दु:खे दूर करतील, येथपासून केवळ मोदी पंतप्रधान झाल्यास भारताच्या प्रगतीला जगातील एकही देश रोखू शकत नाही, अशी मोदींची प्रतिमा उभी करण्यात जेवढे मोदी, त्यांच्या समर्थकांचे प्रयत्न होते, तेवढेच प्रयत्न प्रसारमाध्यमांनीही केले होते. याच प्रसारमाध्यमांनी भ्रष्टाचारविरोधातील आंदोलनाच्या माध्यमातून अण्णा हजारेंची दुसरे महात्मा गांधी अशी प्रतिमा तयार केली होती. पुढे अण्णांच्याच टीमचा त्रिफळा उडून हे आंदोलनही मृतवत झाले. पण जनतेच्या मनावर प्रभाव पाडण्यासाठी त्यांच्या मानसिकतेवर एकाचीच प्रतिमा ठसवण्याचे हे प्रयत्न काही काळापुरते यशस्वी ठरताना दिसत असले तरी त्यांचे गारूड फारसे काही टिकत नाही, हेही खरे आहे. साधारण साडेतीन महिन्यांपूर्वी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्या होत्या, त्या वेळी काँग्रेसचा झालेला दारुण पराभव हा प्रथम अनेक पत्रपंडितांनी मोदींच्या लाटेमुळे झाल्याचे सांगण्यास सुरुवात केली होती. पण काही दिवसांनंतर विविध सर्वेक्षणे, अभ्यास प्रसिद्ध होऊ लागले; तेव्हा या राज्यातील मतदारांचा कल मोदींपेक्षा भाजप या पक्षाकडे दिसून आला. केंद्रातील काँग्रेसप्रणीत यूपीए-2 सरकारच्या कामगिरीवरची नाराजी दिल्लीच्या मतदारांनी व्यक्त केली; तर मध्य प्रदेश, छत्तीसगड या भाजपशासित राज्यांतील मतदारांनी मोदींपेक्षा स्थानिक उमेदवार व तेथील प्रश्नांचा प्रामुख्याने विचार केल्याचे दिसून आले.

आता टीव्हीवरच्या विविध सर्वेक्षण चाचण्यांमध्ये मध्य प्रदेशमधील बहुसंख्य मतदारांनी पंतप्रधानपदी मोदींऐवजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना पसंती दिली आहे. पण असे असले तरी मोदींची प्रतिमा तरुण, नवमध्यम व उच्चवर्णीयांना भावणारी आहे. मोदींनी देशभर तुफानी दौरे करून ‘गुजरातचा विकासपुरुष’ अशी जी प्रतिमा होती त्याला देशव्यापी रूप दिले आहे. त्यांच्या देशभरातील सभांना मोठ्या प्रमाणात गर्दी असते. प. बंगाल, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ अशा ज्या राज्यांमध्ये भाजपााी सत्ता नाही तेथील मतदारही भाजप नव्हे तर मोदींना मतदान करेल, असे सांगितले जात आहे. असे असले तरी देशभरातील सामान्य मध्यमवर्गीय, शेतकरी, कष्टकरी, आदिवासी, मजूर वर्गामध्ये मात्र त्यांचे आकर्षण फारसे दिसत नाही. जातीच्या समीकरणांचा विचार केला तर मोदींचे लक्ष्य ज्या बिहार व उत्तर प्रदेशावर आहे त्या राज्यांमध्ये मोदींच्या तथाकथित लाटेला रोखण्यासाठी बसपा, सपा, राजद, काँग्रेस व अन्य छोटे पक्ष पुन्हा जातीय समीकरणांची मांडणी करू लागले आहेत. खुद्द भाजपमध्ये जे मोदीविरोधक गट आहेत ते तिकिटांवरूनच मोदी व त्यांचे निकटचे सहकारी अमित शहा यांच्यावर नाराज आहेत. भाजपचे पारंपरिक ब्राह्मण व इतर उच्चवर्णीय जातीतले नेते व मतदार मोदींच्या कार्यशैलीवर नाराज आहेत. मोदींनी ज्या पद्धतीने जुन्याजाणत्या नेत्यांना पक्षातून मागे सारले, त्याचाही राग पक्षकार्यकर्त्यांमध्ये आहे.

महत्त्वाचे म्हणजे, उत्तर प्रदेशात सुमारे 20 टक्के मतदार हा मुस्लिम असून त्याचा कल कसा आहे, हेही महत्त्वाचे ठरणारे आहे. गुरुवारी तिसर्‍या टप्प्याचे मतदान पश्चिम उत्तर प्रदेशातील 10 मतदारसंघांत झाले. यापैकी मुझफ्फरपूर, कैराना, सहारनपूर हे गेल्या वर्षी दंगलीत होरपळले होते. या तिन्ही ठिकाणी विक्रमी मतदान झाले. विक्रमी मतदान प्रस्थापितांच्या विरोधात जसे होते तसे ते संभाव्य राजकीय समीकरणाला नाकारण्यासाठीही होते. भारतात असे अनेक संवेदनशील मतदारसंघ आहेत, जेथे आर्थिक विकासापेक्षा सामाजिक सुरक्षितता हा महत्त्वाचा निवडणूक मुद्दा आजच्याही घडीला असतो. पुढील काही दिवसांत मोदी पूर्व उत्तर प्रदेशात डझनभर सभा घेणार आहेत. या सभांच्या माध्यमातून ते आपली विकासपुरुषाची प्रतिमा पुन्हा ठसवण्याचा प्रयत्न करतील व तशी नवी जातीय समीकरणेही मांडतील. त्याचा फायदा किती मिळेल ते नंतर कळेलच.