आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रांतिकारी विचारवंत (अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सत्यशोधक मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक, इतिहासाचे साक्षेपी संशोधक, क्रांतिकारी विचारवंत, प्राच्यविद्यापंडित अशी अनेक नामाभिधानं ज्यांच्या नावाआधी लावली जात होती ते कॉम्रेड शरद पाटील वयाच्या नव्वदाव्या वर्षी शनिवारी हा इहलोक सोडून गेले. गेली काही वर्षे नेहमीच आजारी राहत आलेले कॉम्रेड अनेकदा मृत्यूच्या दारातून परतलेही होते. काही दिवसांपूर्वीच धुळ्यात त्यांच्या मेंदूवर मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली होती आणि त्यातूनही ते बाहेर आले होते. त्याच काळात त्यांना अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचा पहिला बा. सी. बेंद्रे इतिहासकार पुरस्कार प्रदान करण्यात आला. पण कोणापुढेही हार न मानणार्‍या या सत्यशोधकाला अखेर मृत्यूपुढे हार पत्करावी लागली. कॉम्रेड शरद पाटील हाच एक आता इतिहास झाला आहे. हा इतिहास मात्र सर्वसाधारण इतिहास नाही. हा वैचारिक क्रांतीच्या मशालीचा धगधगता इतिहास आहे. जगभरातल्या सर्वच तत्त्ववेत्यांना अचंबित करणारा देदीप्यमान इतिहास आहे आणि जातिअंताच्या लढ्याचा काळ्या दगडावरच्या रेषेचा न पुसता येणारा इतिहास आहे. धुळे जिल्ह्यातल्या कापडणे या क्रांतिकारकांच्या गावचा वारसा लाभलेल्या या वैचारिक क्रांतिकारकाने तत्त्ववेत्यांचे सर्व परंपरागत मार्ग उखडून टाकले होते.

जगातल्या प्रमुख वादांची वस्तुनिष्ठ चिकित्सा करून त्यांनी आपला स्वत:चा असा एक ‘वाद’ जगाला दिला आहे; पण जगाच्याच काय, राष्ट्रीय पातळीवरही या माणसाच्या पारड्यात त्याच्या त्या मोठेपणाचं योग्य माप पडलं नाही, याची खंत त्यांच्या अनुयायांना नक्कीच वाटत राहणार आहे. कॉम्रेड शरद पाटलांच्या हयातीत आणि त्यांच्या उमेदीत अनेक वैचारिक वाद आणि तंटे त्यांनी ओढवून घेतले होते. अर्थात, सत्याच्या शोधाची जिद्द आणि सापडलेले सत्य प्रभावीपणे मांडण्याचा, ते पटवून देण्याचा आग्रह यातून हे वैचारिक तंटे उभे राहिले होते. अशा वादात आणि सत्य-असत्याच्या मांडणीत त्यांनी कधीच दुजाभाव केला नाही. ज्या मार्क्सच्या वैचारिक प्रभावाखाली येऊन त्यांनी आयुष्यभर तो विचार अंगीकारला, त्याच मार्क्सच्या ‘दास कॅपिटल’ या ग्रंथातील उणिवा दाखवून द्यायलाही ते कचरले नाहीत. त्या संदर्भातल्या त्यांच्या विश्लेषणामुळे अनेक दिग्गज मार्क्सभक्तांना धक्का बसला होता. त्यांच्या टीकेचे धनी त्यामुळे शरद पाटलांना व्हावे लागले होते. अर्थात, टीका आणि वादांना कचरतील ते कॉम्रेड शरद पाटील कसले! मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव नंबुद्रीपाद यांना त्यांनी ‘इतिहासाच्या अभ्यासाच्या बाबतीत माझा अधिकार तुमच्यापेक्षा मोठा आहे’ असे सुनवायलाही कमी केले नव्हते. मार्क्सवादी जातिअंताची लढाई लढायला नाही म्हणतात, हे लक्षात आल्यावर त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षालाच फारकत दिली आणि सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष स्थापन केला. यालाच ते सौत्रांतिक कम्युनिस्ट पक्ष म्हणत असत, असं त्यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते सांगतात.

या पक्षाचा विस्तार किती झाला, यापेक्षा त्याची सैद्धांतिक बैठक काय होती, हे अधिक महत्त्वाचे आहे. वर्गवाद आणि जातीयवादाचा अंत झाल्याशिवाय दासशूद्रांची आणि महिलांची खर्‍या अर्थाने गुलामगिरीतून सुटका होणार नाही, हे ते ठामपणे सांगत होते. हे सांगण्यासाठीच त्यांनी रामायणाची आणि महाभारताचीही कठोर चिकित्सा केली होती. हे दोन्ही ग्रंथ वर्णसंघर्षावर आधारित आहेत असं त्यांचं प्रतिपादन होतं आणि त्यासाठी त्यांनी याच दोन्ही ग्रंथांतील अनेक दाखलेही दिले होते. केवळ रामायण, महाभारतच नाही तर शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या शत्रूंनाही उघडे पाडण्याचे काम त्यांनी ग्रंथांतून आणि भाषणांतून आयुष्यभर केले. ते ब्राह्मणांचे नव्हे, ब्राह्मण्याचे शत्रू होते आणि म्हणूनच ब्राह्मण्यावर टीका करण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही. समाजसुधारणेत शाहू महाराजांना ते आदर्श मानत असत आणि इतर कोणत्याही राजाच्या तुलनेत शाहू महाराजच श्रेष्ठ कसे होते हेही ठामपणे सांगत. पूर्वीच्या धुळे आणि आताच्या नंदुरबार जिल्ह्यात त्यांनी आदिवासींसाठी काम सुरू केले होते. ते करताना त्यांना अनेक वादांना आणि हल्ल्यांनाही तोंड द्यावं लागलं; पण म्हणून त्यांनी माघार कधी घेतली नाही. जे करायचं ते मनापासून आणि मुळापासून, हा त्यांचा स्थायीभाव होता. म्हणूनच इयत्ता सहावीत शिकत असताना त्यांनी शेक्सपिअर वाचून काढला होता. वेदांचा आणि त्यासाठी संस्कृत भाषेचाही त्यांनी ऐन किशोरवयात अभ्यास केला होता.

त्या अभ्यासातून त्यांच्यात प्रचंड आत्मविश्वास आला होता आणि त्या आत्मविश्वासाच्या बळावरच ते आपल्या मतांवर ठाम राहत होते. हा संस्कार त्यांच्यावर शालेय शिक्षकांनी केला आणि त्यामुळेच आपल्या जीवनावर त्यांचा मोठा प्रभाव पडला, असं ते सहज मान्य करीत असत. सत्यशोधनाचा संस्कार त्यांच्या वडिलांनी केला. वडील सत्यशोधक चळवळीत तर आई बडोद्यात शिकलेली. त्यामुळे आपल्याला बुद्धिप्रामाण्याचे बाळकडू घरातच मिळाले, असेही त्यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले आहे. आपल्या तत्त्वांशी घट्ट चिकटून राहण्याच्या संस्कारांमुळे आईच्या अंत्यसंस्कारालाही ते गेले नाहीत. कारण त्यासाठी त्यांना तुरुंगातून जामीन मागावा लागणार होता. नामांतर चळवळीत त्यांना अटक झाली होती आणि जामीन मागायचा नाही असा निर्णय नामांतरवाद्यांनी घेतला होता. त्या निर्णयापासून ते इतक्या दु:खातही ढळले नाहीत याचा त्यांच्या अनुयायांवरच नाही तर एकूणच कम्युनिस्ट चळवळीवर मोठा प्रभाव पडला होता; पण तो प्रभाव आदर आणि कुतूहलापुरताच मर्यादित राहिला आहे. त्यांच्या पासंगाला पुरेल असा एकही अनुयायी आज त्यांच्या पश्चात दिसत नाही, ही या जिवंत दंतकथेची शोकांतिका आहे.