आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुटबॉल लीग : नवी वाहती गंगा ? (अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएलच्या आर्थिक आघाडीवरील अभूतपूर्व यशानंतर भारतात अन्य खेळांच्या ‘लीग’चे पेव फुटले. प्रत्येकाने या वाहत्या गंगेत हात धुऊन घेतला. त्या ‘लीग’च्या पंक्तीत आता फुटबॉलची ‘इंडियन सुपर लीग’(आयएसएल) आली आहे. आपापल्या उद्योगांमध्ये प्रचंड पैसा कमावून अन्यत्र गुंतवणुकीची संधी शोधणारे अशा ‘लीग’भोवती घुटमळताना दिसताहेत. नव्याने उदयाला आलेल्या या फुटबॉल लीगची रंगरंगोटी - ‘मेकअप’ करण्यासाठी फिल्मस्टार्स, निवृत्त क्रिकेटपटू, कॉर्पोरेट जगतातील दादा, युरोपियन फुटबॉल लीगमधील तज्ज्ञ, आयएमजी-रिलायन्स आणि भारतीय फुटबॉल संघटना पुढे सरसावल्या आहेत. खेळ वेगवेगळे असले तरी या लीगचा मसालाही तोच आहे.

पुरस्कर्ते, तिकीट विक्री, उत्पादनांचे ब्रँडिंग आणि सामन्याच्या प्रक्षेपणाच्या हक्काचा पैसा यासाठी फिल्मस्टार्स, क्रिकेटपटू आणि उद्योजकांची मोट एकत्र बांधण्यात आली आहे. आयपीएलमध्ये येताना जसा विजय मल्ल्या, अंबानी, शाहरुख व अन्य फिल्मी लोकांनी क्रिकेटच्या विकासाचा राग आळवला, तसाच प्रकार फुटबॉल लीगमध्ये येणार्‍यांच्या बाबतीतही आहे. आयपीएल फ्रँचायझींनी क्रिकेटचा किती विकास केला, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. फुटबॉल लीगच्या बाबतीतही तसेच घडण्याची शक्यता आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी जसा स्वत:चाच संघ आयपीएलमध्ये उतरवला आणि आता न्यायालयाकडून फटकारे खाल्ले, तसाच काहीसा प्रकार या लीगच्या बाबतीत आहे. कोलकाता फ्रँचायझीचे सहमालक उत्सव पारेख, भारतीय फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांचे सगेसोयरे आहेत.

गोवा फ्रँचायझींचे सहमालक अंबानींशी संबंधित आहेत. मुंबई इंडियन्सचा आयकॉन सचिन तेंडुलकर केरळ फ्रँचायझीचा सहमालक आहे. अशा अनेक गोष्टी अनाकलनीय आहेत, तशाच आयपीएलशी साधर्म्य सांगणार्‍या आहेत. क्रिकेट हा भारतात खेळ नाही तर धर्म आहे. त्याच आधारावर क्रिकेट आणि आयपीएल फॉर्म्युला यशस्वी ठरला. भारतात कोलकाता, गोवा, पूर्वेकडील काही राज्ये, केरळ अशा ठिकाणी फुटबॉल हा खेळ लोकप्रिय आहे. मात्र या लोकप्रिय ठिकाणी खेळावर नियंत्रण असोसिएशनपेक्षा त्यातील प्रबळ क्लबच ठेवतात. त्यामुळे आय लीग ही त्याआधीच अस्तित्वात असलेली लीग असताना या नव्या लीगला सहकार्य किती मिळेल, हादेखील प्रश्न आहे. ‘आयएसएल’साठी फुटबॉलमधील हे बुजुर्ग क्लब आपल्या किती खेळाडूंना मोकळे सोडतील, हे अज्ञात आहे. इंडियन प्रोफेशनल फुटबॉल क्लब असोसिएशननने आपले खेळाडू या लीगसाठी मुक्त करण्याकरिता घसघशीत रक्कम मागितल्याचे कळते. त्याचप्रमाणे आय-लीग या स्वत:च्या स्पर्धेतही आयएमजी-रिलायन्सकडून ‘आयएसएल’मधील खेळाडू घेण्यासही नकार दिला आहे. म्हणजे क्रिकेटमध्ये जसे इंडियन क्रिकेट लीग आणि आयपीएल यांच्यातील युद्ध भडकले होते, तसाच प्रकार फुटबॉलमध्येही घडणार आहे.

आयपीएल एकतर्फीच यशस्वी झाली. कारण ती स्पर्धा म्हणजे बीसीसीआयचेच एक अपत्य होती. बीसीसीआयचे आयसीसीवरील वर्चस्व एवढे प्रभावी होते की, ‘आयसीएल’ या प्रतिस्पर्धी लीगची चारही दिशांनी कोंडी करण्यात आली. अखेर ‘आयसीएल’ लीगला गाशा गुंडाळावा लागला. फुटबॉलच्या बाबतीत मात्र प्रकार काहीसा वेगळा आहे. या खेळात क्लब्जचे प्राबल्य अधिक आहे. त्यांच्यासाठी फुटबॉलप्रेमी जनता उभी आहे. संघटना केवळ कागदावर आहे. त्यामुळे संघर्षाची पहिली ठिणगी अल्पावधीतच पडेल, अशी चिन्हे आहेत. ‘आयएसएल’च्या संभाव्य यशाची शक्यता म्हणजे भारतात कोणत्याही लीगला पाठिंबा द्यायला प्रेक्षक उत्सुक नसले तरीही मनोरंजन विश्वातले सितारे, माजी क्रिकेटपटू यांना पाहण्यासाठी येणारी जनता अशा कोणत्याही उपक्रमाला पाठिंबा देते. त्यामुळे या फुटबॉल फ्रँचायझींना गल्ला गोळा करण्यास फारशी अडचण येऊ नये. अर्थात भारतातील नामवंत खेळाडू या लीगमध्ये खेळण्याची जशी शाश्वती नाही तसेच युरोपियन लीगमधील नामवंत खेळाडूही या लीगमध्ये खेळण्याची शक्यता कमी आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे युरोपातील लीगमधील खेळाडू क्लबशी करारबद्ध आहेत. त्यांचे प्रचंड मानधन हादेखील भाग विचारात घेतला पाहिजे. तरीही फुटबॉल लीगचे भवितव्य आयकॉन खेळाडूंच्या नावावरच अवलंबून असणार आहे. आय लीगचे व असोसिएशनचे अन्य सामने यामध्ये या लीगच्या आणखी 14-14 सामन्यांची भर पडणार आहे. फुटबॉलचा तो अतिरेक असेल का? युरोपियन ला लीगमधील अ‍ॅटलेटिको, माद्रिद व अन्य फुटबॉल प्रोफेशनल व्यवस्थापन सांभाळणार्‍या व्यक्तींच्या उपस्थितीमुळे भारतीय फुटबॉल व्यवस्थापनाला शिकताही येईल.

परदेशातील दर्जेदार खेळाडू या लीगमध्ये खेळल्यास त्याचा फायदा भारताच्या उदयोन्मुख फुटबॉल खेळाडूंना निश्चितच होईल. मात्र, त्याच वेळी प्रत्येक क्लबचा वेगवेगळा प्रशिक्षक, वेगवेगळ्या स्टाइल्स, संकल्पना, शिकवण्याच्या पद्धती यामुळे भारताच्या राष्ट्रीय संघाला प्रशिक्षण देणार्‍यांचे हाल होणार आहेत. फुटबॉल क्रमवारीत 145 व्या क्रमांकावर असलेल्या देशातील कुणाला या संभाव्य गुंत्याची फिकीर आहे, याची कल्पनादेखील लवकरच येईल. एकीकडे फुटबॉल लीगची घोषणा होत असतानाच काही दिवसांपूर्वी कबड्डी प्रोफेशनल लीगचीही घोषणा झाली. कबड्डीचे सामने पाहण्यासाठी सर्वाधिक प्रेक्षक जमतात. भारताच्या या प्राचीन खेळाचे जनक असल्याचा दावा कुणी अन्य देशाने करण्याआधीच आपण सावध व्हावे या हेतूने खेळांना आश्रय देणारे आनंद महिंद्रसारखे उद्योजक पुढे आले आहेत. अभिषेक बच्चन यांच्यासारख्या फिल्मस्टारने त्यांना मनापासून साथ दिली आहे. त्यामुळे कबड्डीच्या लोकप्रियतेचा फिल्मस्टार्स लाभ उठवतात की त्यांच्या उद्यम कौशल्याचा परिसस्पर्श कबड्डीला होतो, तेही अल्पावधीत कळेल.

एकंदरीत सध्या प्रत्येक खेळाच्या व्यावसायिक लीग सुरू करण्याचे खूळ वाढत चालले आहे. मरडॉक यांचे स्टार स्पोर्ट्ससारखे चॅनल अन्य खेळ लोकप्रिय करण्यासाठी हे सारं करतंय की त्यांच्याकडे कार्यक्रम नाहीत म्हणून भारतात अशा लोकप्रिय गोष्टींचा लाभ उठवण्यासाठी प्रयत्न होताहेत, तेही यानिमित्ताने स्पष्ट होणार आहे.