आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्क्वेझ नावाचा महानायक! (अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पूर्वसुरींच्या सुरात सूर मिसळत परंपरेला शरण गेलेले साहित्य प्रस्थापितांचा वृथा अभिमान जोपासण्याचे उद्दिष्ट साध्य करत राहते. मात्र प्रस्थापितांना न जुमानता परंपरेशी उभा दावा मांडत मानवी जगण्याचा उभा-आडवा छेद घेणारे धाडसी लेखन केवळ साहित्यविश्वालाच नव्हे, तर एकूण जगण्यालाच नवे प्रयोजन मिळवून देते. मेक्सिको सिटी येथे वयाच्या 87व्या वर्षी निधन पावलेले, जागतिक साहित्यात ‘मॅजिकल रिअ‍ॅलिझम’ अर्थात जादुई वास्तववाद रुजवलेले नोबेल पुरस्कारप्राप्त लॅटिन अमेरिकन लेखक गॅब्रिएल गार्सिया मार्क्वेझ हे असेच साहित्याला नवे प्रयोजन देणार्‍या धैर्यवान लेखकांपैकी एक होते. ‘वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिट्यूड’, ‘द ऑटम ऑफ द पॅट्रिआर्च’, ‘लव्ह इन द टाइम ऑफ कॉलरा’, ‘मेमरीज ऑफ माय मिलॅन्कोली व्होअर्स’ या आशयसंपन्न साहित्यकृतींच्या बळावर विसावे शतक गाजवलेल्या मूळ कोलंबियन मार्क्वेझ यांचा पिंड नि:संशय साहित्यिकाचा होता. बलाढ्य सत्ताधीशांना शरण न जाता राजकीय तसेच सामाजिक भूमिका घेण्याचे धाडस पत्रकारितेची पार्श्वभूमी असलेल्या मार्क्वेझ यांच्या ठायी होते.

हे धाडस त्यांचे टीकाकार मानत आले त्यानुसार क्युबाचे माजी अध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो यांच्याशी असलेल्या जवळिकीतून आलेले नव्हते, तर त्यामागे साम्यवादी विचारांचे पक्के अधिष्ठान होते. हाच विचार त्यांच्या जगण्याचा आणि साहित्याचा आधारही होता. तसे पाहता उत्तुंग प्रतिभेचे धनी असलेल्या मार्क्वेझ यांचे व्यक्तिमत्त्व आणि जीवनशैली रूढार्थाने ‘साहित्यिक’ या संज्ञेशी न जुळणारी होती. मेक्सिको सिटी, बार्सिलोना, पॅरिस आणि कॅरेबियन बेटावरच्या कार्टाजेना ठिकाणी स्वत:ची घरे उभारण्याइतपत सुबत्ता ते राखून होते. डाव्या विचारसरणीशी जोडल्या गेलेल्या सामाजिक तसेच राजकीय कार्यास तन-मन आणि धनाने वाहून घेण्याची त्यांची वृत्ती होती. व्हेनेझुएलातल्या डाव्या पक्षाला जाहीरपणे आर्थिक मदत देण्याची रग त्यांच्या अंगी होती; तसेच निकाराग्वातील डाव्या क्रांतिकारकांना जाहीर पाठिंबा देण्याची आणि चिलीचा हुकूमशहा ऑगस्टो पिनोशला विरोध करण्याची हिंमतही होती. कॅस्ट्रोसारख्याशी वैचारिक सख्य असल्यामुळेच अमेरिकेच्या दृष्टीने मार्क्वेझ हे मोठे शत्रू होते. त्यामुळे अमेरिकेने 50च्या दशकापासून त्यांना प्रवेश नाकारला होता. मार्क्वेझवरील प्रवेशबंदी बिल क्लिंटन अध्यक्ष होईपर्यंत कायम होती. पण अमेरिकेत प्रवेश मिळावा म्हणून अमेरिकेच्या मिनतवार्‍या करण्याच्या फंदात ते पडले नव्हते. आपली राजकीय-सामाजिक भूमिका न कचरता मांडणार्‍या मार्क्वेझ यांनी पेरुवियन नोबेल पुरस्कारप्राप्त लेखकमित्र मारिओ व्हर्गास लोसा यांच्याशी जाहीर कार्यक्रमात हाणामारी झाल्यानंतर शत्रुत्व पत्करून अहंकारही तितक्याच तीव्रतेने जोपासला होता. मात्र व्यक्ती आणि समष्टीशी जाणीवपूर्वक स्वत:ला जोडून घेणारा हा लेखक साहित्यातही जाणीवपूर्वक नवनवी क्षितिजे धुंडाळत होता. विसाव्या शतकाच्या मध्यात, म्हणजेच 40-50च्या दशकात जगातले कम्युनिझमचे अस्तित्व संपुष्टात आणण्यासाठी अमेरिकेची दादागिरी वाढत चालली होती. दुसरीकडे चिली, व्हेनेझुएला, क्युबा, कोलंबिया आदी दक्षिण अमेरिकी देश हुकूमशाही-अधिकारशाही व्यवस्थांमध्ये भरडले जात होते, कोलंबियासाठी हा काळ लष्करी आणि यादवी युद्धाचा काळ होता.

‘ला व्हायोलेन्शिया’ म्हणून ओळखल्या गेलेल्या त्या काळात सुमारे तीन लाख लोकांचे बळी गेले होते. अराजक आणि अस्थिरता हा त्या देशांचा जणू स्थायीभाव बनत चालला होता, त्या अवस्थेत पाना-फुलांचे वा प्रेमाचे गुलकंदी गोडवे गाण्याच्या मन:स्थितीत लॅटिन अमेरिकी समाज खचितच नव्हता. त्याचेच प्रतिबिंब मुख्यत: मार्क्वेझ यांच्या साहित्यात पडले होते. याच अस्थिर आणि अस्वस्थ लॅटिन अमेरिकी समाजाच्या पार्श्वभूमीवर मार्क्वेझच्या कथा-कादंबर्‍या आकारास आल्या होत्या. मार्क्वेझच्या आधी अल्बर्ट काम्यू, जे. डी. सॅलिंगर आदींनी वास्तवाचे झाकोळलेले रूप जगापुढे आणले होते; परंतु मार्क्वेझचे वास्तवाचा वेध म्हणजे मुखवटे घालून मिरवणार्‍या समाजाची चामडी सोलवटून काढणे होते. मानवी मनाच्या तळाशी दबून राहिलेल्या अगम्य वेदनेला स्पर्श करणेही होते. किंबहुना, हाच मुख्यत: मार्क्वेझप्रणीत जादुई वास्तववादाचा आविष्कार होता. त्या अर्थाने जागतिक साहित्याला नव्याने प्रयोजन मिळवून देण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले होते. ‘वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिट्यूड’ हे त्या आविष्काराचे जागतिक पातळीवर गाजलेले पहिले रूप होते. आदिम प्रेरणांमध्ये गुरफटत गेलेल्या सात पिढ्यांची कहाणी विशद करणार्‍या या कादंबरीत माणसाच्या मनात दडलेल्या प्रेम, करुणा, कपट, तिरस्कार, भय, भास, हिंसा आदी भावनांचा पट विलक्षण ताकदीने मांडण्यात आला होता. प्रसिद्ध चिलियन कवी पाब्लो नेरुदाने या कादंबरीचा उल्लेख मिगेल कॅव्हान्टिस लिखित ‘डॉन क्विझोट’ नंतरची सर्वश्रेष्ठ स्पॅनिश साहित्यकृती, असा केला होता.

अमेरिकी पत्रकार- साहित्यिक विल्यम केनेडी यांनी, बायबलचे हिब्रू रूप असलेल्या ‘बुक ऑफ जेनेसिस’नंतर समस्त मानवजातीने वाचलीच पाहिजे अशी कलाकृती, असा ‘वन हंड्रेड..’चा गौरव केला होता. प्रेम हा तसा मार्क्वेझच्या लेखनाचा केंद्रविषय नव्हता. मात्र ‘लव्ह इन टाइम ऑफ कॉलरा’ या कादंबरीत मरणाच्या छायेत उलगडत जाणारा प्रेमाचा नवा अर्थ वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. ‘मेमरीज ऑफ माय मेलॅन्कोली व्होअर्स’ या लघुकादंबरीत त्यांनी कुमारिका असलेल्या वेश्येकडे जाऊन वाढदिवस साजरा करू पाहणार्‍या वयाची नव्वदी पार केलेल्या स्खलनशील पुरुषाचे दर्शन घडवले होते. शरीरसुखाच्या शोधात गेलेल्या त्या पुरुषाला त्या षोडशवर्षीय वेश्येच्या सान्निध्यात आयुष्यात पहिल्यांदा प्रेमाचा शोध लागतो, असा आशय असलेल्या कादंबरीने वाचकांच्या अंगावर सरसरून काटा आणला होता. पूर्वसुरींचे अनुकरण न करण्याचा प्रयत्न करत मार्क्वेझ मानवी संवेदनांचा यापूर्वी अभावानेच सापडलेला नवा अवकाश सर्वार्थाने धुंडाळत होते. याच प्रयत्नांमुळे त्यांच्याकडे जागतिक साहित्याचे महानायकपद चालून आले होते.