आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मेट्रो’ने दिलेली दिशा (अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशामध्ये मोठ्या प्रमाणावर शहरीकरण होत आहे. ग्रामीण भागांमध्ये जी जिल्हा, तालुक्याची ठिकाणे आहेत ती आता मोठ्या शहरांत रूपांतरित होत आहेत. या बदलांमुळे त्या भागातील पायाभूत सुविधांवर ताण येत असून तो कमी होण्यासाठी विविध प्रकारचे विकास प्रकल्प हाती घेतले जात आहेत. मात्र ग्रामीण व शहरी भागांचा संतुलित विकास व्हावा अशा प्रकारे त्या संदर्भातील धोरणाची आखणी करावी लागणार आहे. देशातील मुंबई, कोलकाता, चेन्नई, दिल्ली या महानगरांना लोकसंख्येची दाटी, सार्वजनिक वाहतुकीची अपुरी पडणारी व्यवस्था यासह अनेक प्रश्नांनी वेढलेले आहे. या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी राबवण्यात येणार्‍या विकास प्रकल्पांमध्येही इतकी दप्तरदिरंगाई चालते की हे प्रकल्पच एक नवीन प्रश्न म्हणून समोर उभे ठाकतात. मुंबईतील वाहतूक समस्येवर प्रभावी तोडगा म्हणून या शहरात प्रगत समाजाचे प्रतीक ठरलेली मेट्रो रेल्वे सुरू करण्याचे स्वप्न पाहिले गेले. मात्र हे स्वप्न सत्यात अवतरण्यासाठी बराच विलंब झाला. रविवारी (8 जून) मेट्रो रेल्वेच्या पहिल्या टप्प्याचे (अंधेरी-वर्सोवा-घाटकोपर) उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

एमएमआरडीए, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि फ्रान्सची वेओलिआ ट्रान्सपोर्ट कंपनीच्या संयुक्त भागीदारीतून आकाराला आलेल्या या मेट्रो रेल्वे प्रकल्पामुळे मुंबईच्या वाहतुकीवरील ताण हलका होण्यास खूप मोठी मदत होणार आहे. शिवाय मुंबई शहरामध्ये याआधीच मोनोरेलही सुरू झाली आहे. मेट्रो रेल्वेच्या तिकिटाचे दर काय असावेत यावर महाराष्ट्र शासन व अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर यांच्यामध्ये कलगीतुरा सुरू आहे. मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या निविदेत निश्चित केल्याप्रमाणे तिकीट दर आकारण्यास रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी तयार नसल्याने हा वाद चिघळला आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी व भाजपची मिलीभगत झाली असून जर मेट्रो रेल्वे तिकिटांचे दर वाढले तर त्याला भाजप जबाबदार असेल, असा आरोप मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी केला. त्याचबरोबर निविदेनुसार तिकीट दरांची हमी नसेल तर मेट्रो रेल्वेच्या उद्घाटनालाच न जाण्याचा निर्णय मुख्यमंत्री चव्हाण यांनी जाहीर केल्याने या सगळ्या प्रकरणाला राजकीय रंग आला होता. तिकीट दराच्या मुद्द्यावर महाराष्ट्र शासनाने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले असून त्या याचिकेची सुनावणी आज होणार आहे. तिकीट दर वादाच्या त्रांगड्यातून सुटका होण्यासाठी आता तात्पुरता उपाय असा निघाला की, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर एक महिनाभर मेट्रो रेल्वेच्या एकेरी प्रवासाचा तिकीट दर स्वागतमूल्य स्वरूपात प्रत्येकी 10 रुपये ठेवण्यात येईल.

एक महिन्यानंतर मेट्रो प्राधिकरणाची बैठक होणार असून त्यात मेट्रो रेल्वेच्या नव्या तिकीट दरांबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. देशाच्या महानगरांपैकी कोलकाता, दिल्ली, मुंबई येथे आता मेट्रो रेल्वे धावत आहे. चेन्नईमध्ये येत्या सहा महिन्यांत मेट्रो रेल्वे धावू लागेल. भांडवली खर्च अधिक असलेली मात्र पुढे बरीच वर्षे सेवा देणारी मेट्रो रेल्वे भारतात यशस्वी होईल काय, अशी शंका सातत्याने विचारली गेली. मात्र कोलकाता, दिल्लीत सुरू झालेल्या मेट्रोनंतर अशा शंकांना परस्पर उत्तर मिळाले, एवढेच नव्हे तर भारतीय नागरिक मेट्रो अतिशय चांगली वापरू शकतो, हे सिद्ध झाले. काटेकोर वेळ, वारंवारिता, स्वच्छता आणि व्यवहार्यता या सर्व कसोट्यांवर कोलकाता, दिल्ली मेट्रो यशस्वी ठरली आणि त्यानंतर मेट्रोचा संचार इतर शहरांतही होऊ शकतो, असा आत्मविश्वास देशात तयार झाला. मेट्रो रेल्वे प्रवासी वाहतुकीत कार्यक्षमतेच्या संदर्भात दिल्ली मेट्रोचा आज जगात तेरावा क्रमांक लागतो. त्यानंतर बंगळुरू शहरामध्ये मेट्रो रेल्वेचे आगमन 20 ऑक्टोबर 2011 रोजी झाले.

मुंबईपाठोपाठ आता राजस्थानातील जयपूर शहरामध्ये मेट्रो रेल्वे या वर्षाच्या अखेरीपर्यंत सुरू होणे अपेक्षित आहे. त्यानंतर नागपूर, हैदराबाद, विशाखापट्टणम, सुरत, भोपाळ, कोची, पाटणा या शहरांतही आगामी काळात मेट्रो रेल्वेसेवेचा प्रारंभ करण्यासाठी वेगाने हालचाली होत आहेत. महाराष्ट्रात मुंबईनंतर आता पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद आदी मोठ्या शहरांतही मेट्रो किंवा मोनो रेल्वे प्रकल्प सुरू व्हायला हवेत. तसे प्रस्तावही गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत येत आहेत. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या यादीत भारतीय महानगरे वाढत चालली असली आणि मेट्रोसारख्या सेवा ही आता अपरिहार्यता झाली असली तरी आधी शहरे फुगवायची आणि नंतर सरकारांना जड होणारी कर्जे काढून असे प्रकल्प पूर्ण करण्याचा खटाटोप करायचा, हाच प्रगतीचा एकमेव निकष नाही. ही वस्तुस्थिती मुंबई मेट्रोचे स्वागत करताना लक्षात घेतली पाहिजे. मात्र त्यासाठी विकासाची दिशाच बदलावी लागेल.