आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय शहाणपण हवे (अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2014च्या लोकसभा निवडणुकांमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेस पक्षाने संसदेत एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून काम करू व संसदीय लोकशाहीची बूज राखू, असे आश्वासन जनतेला दिले होते; पण बुधवारी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे लोकसभेतील वर्तन पाहता ते आणि त्यांचा पक्ष आपल्या आश्वासनाला केवळ दोन महिन्यांत विसरला, असे म्हणता येईल. वास्तविक गेली 60 वर्षे काँग्रेसच सत्तेवर होती; पण या कालावधीत डाव्यांपासून उजव्यांपर्यंत एकाही पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी कधी लोकसभा अध्यक्षांच्या पुढे जाऊन घोषणा दिल्या नव्हत्या किंवा अध्यक्षांसमोर गोंधळ माजवत मत मांडले नव्हते. महत्त्वाची बाब अशी की, राहुल गांधी यांच्याकडे काँग्रेस पक्षाचे दुसर्‍या क्रमांकाचे पद आहे व काँग्रेस पक्षातील नेते त्यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार मानतात. अशा सदस्याने संसदीय संकेतांचे पालन करण्याची अधिक गरज आहे. राहुल गांधी यांनी लोकसभा अध्यक्षांवरही पक्षपाताचा आरोप करताना संसदेत विरोधकांना बोलू देत नसल्याचा आरोप केला आहे. हा आरोप शुद्धपणे राजकीयदृष्ट्या केलेली चाल आहे. त्यांचा अप्रत्यक्ष इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दिशेने आहे.

काँग्रेसमध्ये जी अस्वस्थता पसरत आहे, त्याचे कारण म्हणजे काही घटनाप्रसंग वगळता संसदेचे कामकाज सुरळीत चालू आहे व सरकारकडून विविध विधेयकांवर तातडीने निर्णय घेतले जात आहेत; पण ही अस्वस्थता व्यक्त करण्यासाठी व गलितगात्र झालेल्या पक्षामध्ये ऊर्जा आणण्यासाठी संसदेत गोंधळ घालणे हा मार्ग नाही. भाजपने दहा वर्षे गोंधळ घालून संसदेचे कामकाज होऊ न देता यूपीए सरकारची कुचंबणा केली होती. त्यांचे ते वर्तनही योग्य नव्हतेच; पण विरोधी पक्ष असताना भाजपने जे तंत्र वापरले तेच कायम ठेवणे काँग्रेसला योग्य वाटत असेल तर लोकसभा अध्यक्षांकडून कोणत्या न्यायाची अपेक्षा करता? या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राहुल गांधी यांचे वर्तन म्हणजे ‘राजवाड्यातील बंड’ असे वर्णन करून काँग्रेसच्या नेतृत्वावरून पक्षात सुरू असलेल्या अंतर्गत संघर्षाचे जे मूल्यमापन केले, त्यावरून काँग्रेस पिसाटणे साहजिकच होते. कारण देशभरात काँग्रेसविरोधी लाट असताना व पक्षातच प्रचंड असंतोष असताना राहुल गांधी पक्षाला दिशा देण्यासाठी प्रत्यक्ष हाती सूत्रे घेत नाहीत, असे काँग्रेसजनांना वाटते.

प्रियंका गांधी यांनी राजकारणात यावे म्हणून रोज ज्या बातम्या प्रसिद्ध होत असतात त्याचा एक अर्थ असा आहे की, राहुल गांधींच्या नेतृत्वावर काही असंतुष्ट काँग्रेसजनांचा विश्वास नाही. काही राजकीय विश्लेषकांना राहुल गांधी यांनी आक्रमकपणे राजकारण करावे, असे वाटते. पण या सगळ्या जर-तरच्या गोष्टी झाल्या. मुळात रस्त्यावरचे राजकारण आणि संसदेतील राजकारण यामध्ये महद् अंतर आहे. हे लक्षात घेऊनच राहुल गांधी यांना संसदेत काम करावे लागेल. संसदेत सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावायची असेल तर त्यांनी संख्याबळ कमी असूनही अभ्यासू पद्धतीने सरकारच्या कामकाजाचे परखड विश्लेषण केले पाहिजे. राहुल गांधी यांच्याकडे मुद्दे मांडण्याचे संसदीय अधिकार आहेत, ते कुणी काढून घेतलेले नाहीत. त्यांनी पक्षाचे एक महत्त्वाचे नेते म्हणून आपल्या सहकार्‍यांच्या मदतीने सरकारला घेरण्याची व्यूहरचना आखली पाहिजे.

संसदेत काँग्रेसला विरोधी पक्षपद दिले नाही याचा अर्थ असा नाही की, त्यांच्या पक्षाला बोलायला बंदी केली आहे. प्रत्येक संसद सदस्याला त्याच्या पक्षाची राजकीय-आर्थिक-सामाजिक भूमिका व त्याच्या मतदारसंघाच्या समस्या मांडण्याचे अधिकार दिले आहेत. जर यूपीए सरकारची धोरणे मोदी सरकार पुढे रेटत असेल तर याविषयी राहुल गांधी यांनी संसदेत व मीडियापुढे येऊन आपले म्हणणे मांडले पाहिजे. ते गेली दहा वर्षे प्रत्यक्ष राजकारणात आहेत व एकाच दारुण पराभवामुळे हाय खाऊन विजनवासात जाऊन एकदम आततायीपणे राजकीय चाली खेळणे, यात शहाणपण असे नाही. सध्याच्या संसदेच्या अधिवेशनात विमा क्षेत्रातील परकीय गुंतवणुकीवरून व यूपीएससी परीक्षांमधील सी-सॅट पॅटर्न रद्द करण्यावरून जो गोंधळ सुरू आहे, त्यामध्ये काँग्रेस सदस्यांचा सहभाग अतर्क्यच आहे. कारण यूपीए सरकारने विमा क्षेत्रात परकीय गुंतवणूक असावी म्हणून संसदेत विधेयक आणले होते, तसेच 2011मध्ये सी-सॅट पॅटर्न बदलण्याचा निर्णय यूपीए सरकारने घेतला होता. 2011 नंतर तीन वर्षे सी-सॅटविषयी देशात काहीच आंदोलन नव्हते.

आता सुरू झालेले आंदोलन व त्यामध्ये मोदी सरकारची झालेली पंचाईत याचा फायदा काँग्रेस घेऊ इच्छिते; पण गोंधळ घालण्यापेक्षा त्यांनी विमा विधेयकात व सी-सॅट पॅटर्नमध्ये काय बदल व्हावेत, याविषयी आपली भूमिका स्पष्ट करायला हवी होती. ती न करता संसदीय संकेत उधळून त्यांच्या हाती काहीच मिळालेले नाही. राहुल गांधी व काँग्रेसकडून राजकीय शहाणपणाची अपेक्षा आहे.