फोन कॉल, मेसेज, गाणी ऐकणे, मॅप पाहणे, फिटनेस ट्रॅक, हेल्थ ट्रॅक,
ट्विटरसारखे ऑनलाइन सोशल नेट अॅप्स आणि तेही चक्क मनगटी घड्याळामध्ये… अॅपलच्या स्मार्ट घड्याळाचे दणक्यात पदार्पण झाल्याने एकीकडे उत्सुकता वाढली असतानाच मनाला हुरहुर लावणारी एक बातमी पाठोपाठ धडकली. ती म्हणजे, ‘एचएमटी’ची घड्याळे आता इतिहासजमा होणार... सरकारने एचएमटी घड्याळांचे उत्पादन यापुढे बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे घड्याळाच्या रूपाने जपलेल्या असंख्य आठवणीच आता सोबत राहणार आहेत. जागतिकीकरणाच्या रेट्यात काळासोबत बदलले नाही, तर तो काळाच्या मागे पडतो, हा आजपर्यंतचा इतिहास आहे.
काळाची शर्यत जिंकायची असेल, तर काळासोबतची दौड कायम ठेवावी लागते. ही दौड कायम ठेवली नाही, तर काळ इतिहासजमा होतो. असाच प्रकार अगोदर तार ऑफिस, मग अॅम्बेसेडर गाडी आणि आता एचएमटीची घड्याळे यांच्या बाबतीत घडला. जनसामान्यांशी नाळ जुळलेल्या आणि नेहरूपर्वाचे प्रतीक ठरलेल्या या सार्वजनिक क्षेत्रातल्या तिन्ही घटना वर्षभरात घडल्यानंतर आता फक्त "हमारे जमाने में’ एवढेच म्हणण्याची वेळ आली आहे. ‘टाइमकीपर टू द नेशन’ आणि ‘देश की धडकन’ असे बिरूद मिरवत एचएमटीची घड्याळे साठच्या दशकात बाजारात आली आणि अल्पावधीतच या घड्याळांनी लोकांच्या मनावर गारूड करायला सुरुवात केली. विशेषत: मध्यमवर्गीयांची नाळ एचएमटीशी अधिक जोडली गेली. परीक्षेत चांगले गुण मिळव; तुला एचएमटीचे घड्याळ आणून देईन, हा जवळपास प्रत्येक घरातला संवाद असायचा... लग्नाची बोलणी व्हायची, तेव्हा नवरदेवाला सफारीचा सूट आणि मनगटावर सोनेरी पट्टा असलेल्या एचएमटीच्या घड्याळाचा खर्च वधूपित्याला क्रमप्राप्त असायचा... जिथे कुठे सनई वाजेल आणि घड्याळाची चर्चा होईल, तिथे एचएमटी हे नाव प्रामुख्याने घेतले जात होते... वडिलांच्या निधनानंतर त्यांचा वारसा एचएमटीच्या रूपाने मुलांच्या मनगटावर जपला जायचा... इतकेच काय, तर टायटनच्या जमान्यात हल्लीच मुंबईच्या ‘बेस्ट’ने त्यांच्या ८०० कर्मचार्यांना एचएमटीची घड्याळे भेट म्हणून दिली.
तब्बल पाच दशकांहूनही अधिक काळ लोकांच्या मनगटावरची जागा काबीज करण्याचे एकमेव कारण म्हणजे, एचएमटीचे परवडणारे ‘बजेट’... हिंदुस्थान मशीन टूल्स (एचएमटी) या सार्वजनिक क्षेत्रातील मुख्य कंपनीची एचएमटी वॉचेस ही उपकंपनी. १९६१ मध्ये जपानच्या सिटिझन वॉच कंपनीच्या सहकार्याने तिची स्थापना केली गेली होती. एचएमटीच्या आगमनाने विदेशी घड्याळांची तस्करी जवळपास बंद पाडली. देशभक्तीच्या लाटेवर स्वार होऊन अत्यंत साधी मोठी गोल तबकडी असलेली ही घड्याळे लहान-मोठे, गरीब-श्रीमंत प्रत्येकाच्या मनगटावर दिसू लागली. अगदी अलीकडे भारतातल्या दीड लाख पोस्ट कचेर्यांमधूनही एचएमटी घड्याळांची विक्री सुरू झाली होती आणि या उपक्रमातून जवळपास दहा हजार घड्याळे विकली गेली होती. भारतात ‘खाउजा’ धोरणाला सुरुवात झाली आणि अचूक वेळ सांगणारे एचएमटी घड्याळ वेळेच्या मागे पडू लागले.
काळ आणि वेळ सांगणार्या या कंपनीवर काळ आणि वेळ एकत्रच धावून आले. त्यामुळे ही कंपनी गर्दीतून गर्तेत जाऊ लागली होती. २००० मध्ये एचएमटी वॉच बिझनेस ग्रुपचे रूपांतर एचएमटी वॉचेस लिमिटेडमध्ये करण्यात आले. मात्र, त्यालाही ग्राहकांचा फारसा प्रतिसाद लाभला नाही. त्यानंतर काही काळातच काळाचे काटे फिरले आणि एचएमटीचा तोटा सुरू झाला. कंपनीसाठी चांगली वेळ त्यानंतर कधीच आली नाही. दरवर्षी नुकसान वाढतच गेल्याने एचएमटीला कर्मचार्यांचे पगार देणेही अशक्य होऊ लागले. सरकारकडून त्यांनी ६९४.५२ कोटींचे कर्जही घेतले खरे; मात्र तरीही तोटा वाढतच गेल्याने त्याची गंभीर दखल घेत केंद्र सरकारने अखेर एचएमटी वॉचेस ही कंपनी बंद करण्याचे ठरवले. तशी शिफारस बोर्ड ऑफ रिकन्स्ट्रक्शन ऑफ पब्लिक सेक्टर एंटरप्रायझेसने सरकारला केली होती.
२०१२-१३ मध्ये या कंपनीचा महसूल होता ११ कोटी रुपये, तर तोटा होता तब्बल २४२ कोटी. त्या तुलनेत टायटन या बलाढ्य कंपनीने याच वर्षात जवळजवळ १६७५ कोटींचा व्यवसाय केला होता. या निर्णयामुळे कर्नाटकातील बंगळुरू आणि तुमकूर, उत्तराखंडचे राणीबाग आणि जम्मू-काश्मीर असे चार युनिट पोरके होणार असून सुमारे दीडेक हजार कर्मचार्यांचे पुनर्वसन कसे करायचे, हा मोठा प्रश्न असणार आहे. अर्थातच हा निर्णय वस्तुनिष्ठ असला, यामुळे सरकारचा तोटा कमी होणार असला, तरीही जनसामान्यांच्या हृदयात स्थान मिळवलेल्या उत्पादनांच्या निर्मितीचा वारसा
आपल्याला जपता आला नाही, याची सलही यापुढे कायम राहणार आहे.