आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींचे व भारताचे वर्ष ! (अग्रलेख)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतवर्ष नावाच्या १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या या महाकाय देशाची पुढील दिशा काय असेल, किमान दशकभर विकासदराची झेप घेऊन थकलेल्या चीनला मागे टाकून तो पुढे निघून जाण्यास सज्ज होईल का, कच्च्या तेलाच्या किमती पडल्याने जगासमोर निर्माण झालेल्या संकटाचे तो संधीत रूपांतर करेल का, अर्थव्यवस्थेला कुरतडणारी वित्तीय तूट अन् सोन्याची आयात कमी होऊन आवाक्यात राहील काय आणि त्यामुळे या देशाचे जागतिक व्यासपीठावरील मानांकन आणखी सुधारेल का, ते सुधारले तर एफडीआयने आखडता हात घेतला होता, तो मोकळा सुटेल का, तो सुटला तर या देशातील भांडवलाचा प्रश्न काही प्रमाणात सुटून ‘मेक इन इंडिया’ तून उत्पादन-निर्यात आणि रोजगार संधी वाढतील का आणि त्या वाढल्या तर मंदीने सुस्तावलेल्या जगाला तो मागणीचे इंजिन जोडून पळायला लावेल का? असे अनेक प्रश्न आज आपल्या देशासमोर आहेत. पण स्वातंत्र्यानंतर असे कोणते वर्ष होते, जे अशा प्रश्नांच्या जंत्रीशिवाय समोर उभे ठाकले होते? २०१५ नावाच्या नव्या वर्षात प्रश्नांची तीच जंत्री आहे, हे खरे असले तरी हे वर्ष वेगळे आहे. विकासाची गाडी विशिष्ट वेगाने हाकण्यासाठी जी राजकीय स्थिरता आणि इच्छाशक्ती लागते, त्याची पायाभरणी गेले सात महिने सहा दिवसांनी आधीच करून ठेवली आहे. या देशाचे काय होणार, अशा स्वरूपाचे प्रश्न परकीय नव्हे, पण स्वकीयांतल्या काही शहाण्यांनी अनेकदा विचारले आहेत. मात्र, या देशातील सामान्य माणसाने आपले कष्ट, प्रामाणिकपणा आणि जन्मत: त्याला जोडल्या गेलेल्या सर्वव्यापी संस्कृतीने हा देश अखंड राहील आणि त्याचे भवितव्य उज्ज्वल आहे याची वेळोवळी हमी दिली आहे. त्यामुळेच जगाचा आज सर्वाधिक भरोसा आहे तो १२५ कोटी भारतीय जनतेच्या क्रयशक्तीवर! म्हणूनच सारे जग या मातीत पैसा ओतायला तयार आहे.

भारताची पुढील दिशा काय असेल, या प्रश्नाचे उत्तर देताना सर्वाधिक भरोसा येथील सामान्य माणसावर ठेवण्याशिवाय पर्याय नसला तरी २०१५ ने या प्रश्नाला आणखी एक उत्तर जोडले आहे. गेली ६८ वर्षे या देशाची लोकशाही जिवापाड जपणार्‍या येथील जनतेने तीन दशकांनंतर एका नव्या नायकाच्या हातात देशाची सूत्रे अशी एकहाती मोठ्या विश्वासाने सोपवली आहेत. त्या नायकाचे नाव आहे नरेंद्र मोदी. हा आज भारताचा आघाडीचा नेता आहे आणि गेल्या सात महिन्यांत त्याने असा काही झंझावात निर्माण केला आहे की जग त्याच्याविषयी आणि भारताविषयी वेगळे काही बोलू लागले आहे. त्याच्या आडाख्यांवर जगाचे लक्ष लागले आहे. भारताला वगळून जगाला पुढे जाता येणार नाही, हे प्रस्थापित होऊ लागले आहे.
जागतिकीकरणाने सुरुवातीच्या टप्प्यात ज्या देशाकडे फक्त बाजारपेठ म्हणूनच पाहिले गेले, तो देश आज त्याच जगात मोठी भूमिका बजावण्यास सज्ज झाला आहे. जो स्वत:चे प्रश्न सोडवू शकत नाही, तो जगाचे प्रश्न काय सोडवणार, असे कोणी म्हणू शकेल; पण जगाच्या व्यासपीठांवर वावरण्यासाठी जो आत्मसन्मान, स्वाभिमान लागतो तो आज प्रथमच दिसायला लागला आहे. जगाचे नियंत्रण करणार्‍या संस्थांत वाढत चाललेली भारतीय नावे आणि महासत्ता अमेरिकेच्या अध्यक्षांच्या भारताच्या दिशेने वळत चाललेली पावले ही त्यासाठी पुरेशी बोलकी आहेत. एवढेच नाही तर आपल्याच कलाने जग चालले पाहिजे, ही हेकेखोरी मागे घेऊन जगातील वजनदार नेते या देशातील निर्मितीचे भागीदार व्हायला तयार झाले आहेत.

घरात प्रश्न नाहीत, असे नाहीत. अगदी जटिल प्रश्न आहेत. मात्र, त्यांना थेट भिडण्याशिवाय पर्यायच काय आहेत? परदेशात गेलेला काळा पैसा परत आणणे, सार्वजनिक जीवनातील स्वच्छतेची सुरुवात केरकचर्‍याच्या स्वच्छतेपासून करणे, स्वच्छ भांडवलासाठी बँकिंग विस्ताराच्या मागे लागणे, ते देशातच मिळत नाही तोपर्यंत एफडीआयची रसद कमी होणार नाही याची काळजी घेणे, काही झाले तरी हातांना कामच द्यावे लागेल हे ओळखून ‘मेक इन इंडिया’ला गती देणे, सुस्तावलेल्या नोकरशाही आणि मस्तवाल नेत्यांच्या शेपट्या पिरगाळून त्यांना कामाला जुंपणे, नियमांची जाळी आपल्याच मानेला वेढा घालत आहेत हे लक्षात घेऊन अशा नियम-कायद्यांचा फेरविचार केला जाऊ शकतो याची जाहीर चर्चा करणे आणि १२५ कोटी जनतेला समृद्ध, शांत आणि समाधानी एकत्र जगायचे असेल तर सुप्रशासनाच्याच मार्गाने जावे लागेल यावर ठाम विश्वास व्यक्त करणे. २०१५ च्या आशा पल्लवित व्हाव्यात यासाठी या सर्व होकारांचा उच्चार करून झाला आहे. ज्या राजकीय इच्छाशक्तीच्या त्रुटीवर बोट ठेवून सारे नकार या देशाने पचवले आहेत ती इच्छाशक्ती हा देश प्रथमच पाहतो आहे. देशात आणि देशाबाहेर काहीतरी वेगळे घडू लागले आहे. त्यावर विश्वास ठेवण्याची तेवढी गरज आहे. तो ठेवला की हे नवे वर्ष मोदींचे आणि भारताचे असणार आहे!