आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बायसिकल मोदी (अग्रलेख)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारत, चीनसह बहुतांश विकसनशील देशांमध्ये प्रदूषण रोखण्यासाठी प्रभावी यंत्रणा कार्यरत नाही, हे सत्य आहे. पण त्याचबरोबर आपल्या प्रचंड उत्पादनक्षमतेतून निर्माण होणारा अणु, रासायनिक तसेच ई-कचरा देशाबाहेर घालवून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी विकसित देशांनी विकसनशील देशांचा डम्पिंग ग्राउंड म्हणून वापर केल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. या सगळ्यातूनच प्रदूषणाची समस्या वाढीला लागलेली असल्याने केवळ कुणा एकाच्याच खांद्यावर ही जबाबदारी टाकता येणार नाही. नेमक्या अशाच काही मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी नवी दिल्लीत विविध राज्यांच्या पर्यावरणमंत्र्यांच्या परिषदेत बोलताना बोट ठेवले हे बरे झाले. विकासासाठी भारताने अणुऊर्जेचा शांततामय वापर वाढवायचे ठरवल्यानंतर त्यासाठी लागणारे पुरेसे अणुइंधन मिळण्यात विकसित देशांनी अनेक खोडे घातले. त्यामुळे अशा दुतोंडी विकसित देशांच्या दबावासमोर भारत झुकणार नाही, असा खणखणीत संदेश देणे आवश्यक होते. तो मोदींनी दिला. प्रदूषण नियंत्रणाच्या मुद्द्यांवर श्रीमंत देशांशी कितीही मतभेद असले तरी भारताला या प्रयत्नांत सहभागी होणे अनिवार्य आहे. भारतातील वायुप्रदूषणावर देखरेख ठेवण्यासाठी कार्यान्वित केलेल्या राष्ट्रीय वायुप्रदूषण निर्देशांक सेवेचे उद्घाटनही पंतप्रधानांनी केले. प्रदूषणाबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी या सेवेचा परिणामकारक उपयोग होणार आहे.

जागतिक प्रदूषणात भारताचा वाटा अत्यंत कमी आहे. आकडेवारीच्या जंजाळातून सापडणारे हे सत्य भारतासाठी किंचित दिलासा देणारे व मनोहर असले तरी त्यामागे लपलेला जो अंधार आहे, त्याकडेही डोळसपणे पाहिले पाहिजे. प्रदूषण रोखण्यासाठी भारतातील नागरिकांनी नेमके काय करायला हवे यासाठी जे उपाय आपण सांगत आहोत त्याची इंग्रजी भाषेतून संभाषण करणारे देशातील उच्चभ्रू लोक खिल्लीच उडवतील, असे पंतप्रधान मोदींनी उपहासाने म्हटले आहे. मात्र त्यांनी सुचवलेले उपाय व्यावहारिकतेच्या निकषावर टिकू शकतात का, हाही गहन प्रश्न आहेच. "भारतीय संस्कृतीत निसर्गाला देव मानण्यात येते. त्यामुळे पर्यावरण रक्षणासाठी प्राचीन काळापासून पाळण्यात येणार्‍या परंपरा आपण पुन्हा काटेकोरपणे अंगीकारल्या पाहिजेत,' असे आवाहन मोदी यांनी केले. भारतीय असो वा कोणत्याही संस्कृतीत कितीही महान मूल्ये सांगितलेली असली तरी ती आजच्या काळात जशीच्या तशी अंगीकारणे अत्यंत खर्चिक आणि कालबाह्य असते. प्रगत देशांमध्ये औद्योगिक, आर्थिक प्रगती भरभराटीच्या अवस्थेला पोहोचलेली असून प्रदूषणाची पातळीही तुलनेने कमी आहे. तेथील पायाभूत सुविधाही उत्तम आहेत. त्यामुळे चारचाकी वाहनांऐवजी सायकलचा वापर वाढवणे इत्यादी गोष्टी त्यांना जमू शकतात. पण तेच निकष भारतासारख्या देशाला लावता येणार नाहीत.

आपल्याकडे पायाभूत सुविधा अजूनही फारशा धड अवस्थेत नाहीत. देशाच्या संस्कृतीची मूल्ये कितीही महान असली तरी त्यांचा व्यावहारिक फायदा क्षीणच असतो. "पूर्वीच्या काळी पौर्णिमेला चंद्रप्रकाशाचा उपयोग करून गावांमध्ये आजीबाई आपल्या नातवांना सुईत धागा ओवायला सांगायच्या. आजही पौर्णिमेच्या रात्री अनेकांनी आपल्या घरांमधील दिवे बंद ठेवले तरी या देशात मोठी ऊर्जाबचत होऊ शकते,' असे नरेंद्र मोदींचे मत आहे! मात्र सध्या देशामध्ये अनेक भागांत भारनियमनच जास्त चालते. माणसे अंधारात चाचपडत जगत राहतात. त्यांच्यासाठी पौर्णिमा आणि अमावास्या दोन्हीही सारख्याच असतात! दर रविवारी इंधनावर चालणार्‍या वाहनांचा वापर टाळून जास्तीत जास्त सायकलींचा वापर करावा, असे सुचवणार्‍या मोदींना देशातील दारुण परिस्थिती नक्कीच माहिती असणार. शहरी भाग सोडला तर गावागावांमध्ये शाळा, आरोग्य केंद्रे, मुख्य बाजारपेठा या अनेक किमी अंतरावर असतात.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे पार धिंडवडे निघालेले असतात. तेथे सायकलचा वापर परवडणाराही नाही. शहरांमध्येही निवासी जागांचे भाव कमालीचे वाढल्यामुळे रोजगारासाठी कित्येक किलोमीटर प्रवास करावा लागतो. तेथे सायकली कामाच्या नाहीत, तसेच अनेक शहरांतील रस्ते इतके लहान आहेत, खड्ड्यांनी भरलेले आहेत की तेथे सायकल चालवणे जिवावर उठणारे आहे. तेव्हा काही श्रीमंत वगळता असंख्य सहनशील लोकांना सायकलींचा वापर करायला सांगणे म्हणजे एक प्रकारची चेष्टाच आहे. यापेक्षा शहरी वाहतूक व्यवस्था उत्तम केली तरी प्रदूषणाला आळा बसेल. देशातील वास्तव पाहता भारतीय संस्कृतीतील मनोहर भासणार्‍या मूल्यांचा हवाला देऊन मोदी सुचवत असलेले उपाय व्यवहारात टिकणारे नाहीत. त्यापेक्षा पायाभूत सुविधा कशा वाढतील यावर लक्ष केंद्रित करून मोदी यांनी आर्थिक विकास साधला, तर त्यांना प्राचीन संस्कृतीतल्या मूल्यांचा जप करण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे जागतिक वायू, ध्वनिप्रदूषणाबरोबरच सांस्कृतिक प्रदूषणही कमी होईल. त्याचीही भारतासह जगाला आज गरज आहे!