आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माहितीची महती! (अग्रलेख)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतामध्ये दहशतवादी हल्ले चढविण्याची योजना इसिस (इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया)ने आखली असल्याचे एनआयए (राष्ट्रीय तपास यंत्रणा) या संस्थेने न्यायालयात सांगितल्यानंतर या सार्‍या प्रकरणाला वेगळाच आयाम मिळाला आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथून चार युवक सिरियामध्ये जिहादी युद्धात सहभागी होण्यासाठी गेले होते. त्यातील अरिब माजिद हा गेल्या नोव्हेंबरमध्ये भारतात परतला असून त्याच्यावर दाखल केलेल्या आरोपपत्रातून ही बाब पुढे आली. या चार युवकांना हाताशी धरून भारतात घातपाती कारवाया करण्यात येणार होत्या. त्यासाठी भारतविरोधी दहशतवादी संघटनांशीही इसिसने संधान बांधले आहे, ही माहितीही एनआयएच्या तपासातून उघड झाली. पण इसिसचा उदय हा काही अकस्मात झालेला नाही. जागतिक स्तरावर गेल्या तीन दशकांत तालिबान, अल कायदाकडून मोठ्या प्रमाणावर दहशतवादी कारवाया घडविल्या गेल्या. दहशतवाद्यांचे आश्रयस्थान बनलेल्या पाकिस्तानातून या कारवायांची सूत्रे हलविली जात असत व अजूनही ती स्थिती काही प्रमाणात कायम आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांचा अमेरिका व दोस्त राष्ट्रांच्या फौजांनी पराभव केला.

पाकिस्तानमध्ये दडून बसलेला अल कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेनला अमेरिकेने कारवाई करून ठार केले. या घटनांनंतर अल कायदा, तालिबान्यांचा जोर एकंदरीत ओसरला असून त्यामुळे निर्माण झालेली पोकळी इसिसने भरून काढली. त्यामुळे इस्लामी दहशतवादाचा प्रमुख सूत्रधार यापुढे इसिस हीच संघटना राहणार आहे. काश्मीरसहित अन्य भागांत हिंसक कारवाया करणार्‍या संघटनांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील दहशतवादी संघटनांशी संधान बांधलेले आहे. त्यामुळे त्यांच्या कारवायांचा बीमोड करणे गुंतागुंतीचे काम बनले आहे. हे आव्हान पेलण्यासाठी भारतीय तपास यंत्रणा, गुप्तचर यंत्रणा पुरेशा कार्यक्षम आहेत का, हा प्रश्न उपस्थित होतो. इसिसपासून भारताला इतक्यात तरी धोका नाही, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह व गुप्तचर यंत्रणा गेल्या काही महिन्यांत सातत्याने सांगत होते. मग आता असे काय झाले की, त्यांना आपल्या भूमिकेपासून घूमजाव करावे लागले? गुप्तचर यंत्रणा व सरकारमध्ये पुरेसा समन्वय नसल्याचेच हे निदर्शक आहे!

अमेरिकेवर २००१ मध्ये लादेनच्या नेतृत्वाखालील अल कायदा संघटनेच्या दहशतवाद्यांनी भीषण हल्ले चढविले. तेव्हापासून अमेरिका त्याच्या शोधात होती. सरतेशेवटी अमेरिकेने मे २०११मध्ये पाकिस्तानातील अबोटाबाद येेथे लपून बसलेल्या लादेनला धडक कारवाई करून ठार मारले. या कारवाईत लादेनच्या घरातून जप्त केलेल्या साहित्यापैकी सुमारे चारशे कागदपत्रे अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तहेर विभागाच्या संचालकांनी जनतेसाठी नुकतीच खुली केली. त्याआधी लादेनच्या घरातून जप्त केलेली कागदपत्रे, छायाचित्रांचा काही भाग, त्याला ठार मारून एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त अमेरिकेने २०१२ मध्ये सर्वप्रथम खुला केला होता. लादेनचा अबोटाबाद येथील ठावठिकाणा सांगण्याच्या बदल्यात सीआयएने पाकिस्तानच्या एका गुप्तहेर अधिकार्‍याला २५ दशलक्ष डाॅलरची लाच िदल्याचा व त्यानंतर ओसामाला ठार करण्याची कारवाई केल्याचा गौप्यस्फोट प्रख्यात पत्रकार सेमूर हर्श यांनी केला असला तरी तो अनेकांना विश्वासार्ह वाटलेला नाही. याचे कारण लादेनचा माग काढण्यासाठी अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणा सुसज्ज रीतीने काम करीत होत्या व त्यातूनच त्यांना हे यश मिळाले. या कारवाईनंतर लादेनची कागदपत्रे ज्या कमी कालावधीत अमेरिकेने खुली केली ती पारदर्शकता भारतानेही शिकण्यासारखी आहे.

भारतातील गोपनीय कागदपत्रांसंदर्भातले कायदेकानू अगदीच जुनाट आहेत. स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संदर्भातील कागदपत्रे अजूनही दडवून ठेवणार्‍या भारताचे याआधीच पुरते हसे झाले आहे हे विसरता कामा नये. मुंबईवर २००८ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात खूप आधीच अमेरिकेने काही गोपनीय माहिती पुरवूनही भारतीय गुप्तचर संस्थांनी तिचे विश्लेषण करण्यात ढिसाळपणा दाखविला होता. त्यामुळे कोणत्याही देशाने दहशतवाद्यांबद्दल कितीही महत्त्वाची माहिती पुरविली तरी तिचा अचूक उपयोग करून प्रभावी व तत्काळ कारवाई करण्याबाबतची कार्यक्षमता भारतीय गुप्तचर संस्थांनी वाढविण्याची गरज आहे. दहशतवाद्यांनी हल्ले चढविल्यानंतर त्यांचा शोध घेत राहण्यापेक्षा त्यांचा ठावठिकाणा गुप्तचर यंत्रणांमार्फत आधीच मिळवून त्यांना कंठस्नान घालायचे अशी नीती अवलंबल्यानेच गेल्या वर्षात जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी व घातपाती कारवायांचे प्रमाण ३० टक्क्यांनी घटले, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकरांनी म्हटले आहे. ही नीती योग्यच असली तरी गुप्तवार्ता व मिळणार्‍या माहितीचे अचूक विश्लेषण या पातळीवरही भारतीय गुप्तचर यंत्रणांनी सुधारणा केली तरच इसिस वा अन्य दहशतवादी संघटनांचा पुरता बीमोड करता येईल. ही सतर्कता दाखविल्याशिवाय गत्यंतर नाही!
बातम्या आणखी आहेत...