आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योगाला झळाळी! (अग्रलेख)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या वर्षी संयुक्त राष्ट्रांनी २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर हा दिवस भारतात नवे सरकार कसा साजरा करेल याबाबत उत्सुकता होती. मोदी सरकारने सत्तेवर येताच धर्म, संस्कृती व प्राचीन वारसा यांना साद घातल्याने योग दिनही तसा टीकेचा विषय बनला. पण या गदारोळात प्रसारमाध्यमांनी, कॉर्पोरेट कंपन्यांनी, सोशल मीडियाने हा दिवस एक इव्हेंट म्हणून जोरदारपणे साजरा केला. काल रविवार व नेमका विश्रांतीचा दिवस असल्याने लोकांनी उत्साहाने घरात टीव्हीसमोर, सोसायटीमध्ये, कॉलनीत योग दिवस उत्साहाने साजरा केला. सोशल मीडियात लोकांनी आपल्या योगासनांचे "सेल्फी' टाकले. "लाइक-अनलाइक'च्या या आभासी जगात हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा झाला यात नवल नव्हते. पण असे आभासी जग व त्या जगात उमटणार्‍या प्रतिक्रिया फार काळ राहत नाहीत. जगाने आपल्या संस्कृतीची दखल घेतली हा आनंद आहेच; पण आपण आपल्या संस्कृती संवर्धनासाठी कोणते प्रयत्न करतो याचाही आत्मशोध घेण्याची गरज आहे. जे लोक योग दिनात उत्साहाने सामील झाले त्यांच्यावर आता दररोज योगासने करण्याची नैतिक जबाबदारी आहे. कारण केवळ दिवस साजरे करण्यासाठी व्यायाम किंवा मन:साधना करून बिघडलेल्या शरीराचे स्वास्थ्य सुधारत नाही, तर शरीराला सातत्याने व्यायामाची गरज असते. आधुनिक विज्ञान, शरीर हे यंत्र असल्याचे सांगते.

यंत्र काम न करता तसेच ठेवले तर ते गंजून जाते. तसे शरीराचे असते. आज देशाचे स्वास्थ्य बिघडले आहे अशी ओरड दिसत असताना परिस्थिती चिघळू नये यासाठी एक नागरिक म्हणून प्रत्येकाने आपले मन:स्वास्थ्य स्थिर राहावे याकरिता प्रयत्न करण्याची गरज आहे. मोदींनी जनतेला दिलेल्या भाषणात जग भौतिक गोष्टींवरील संघर्षाने वेढले असल्याचे सांगत केवळ योगसाधनेने संस्कृती-संस्कृतीत निर्माण झालेले संघर्ष संपुष्टात येतील, असा आशावाद व्यक्त केला आहे तो या पार्श्वभूमीवर. योग हे आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतता व सामाजिक सलोखा प्रस्थापित करण्याचे; किंबहुना जगातले वर्ण, धर्म, संस्कृती यांना एकाच पंखाखाली घेणारे माध्यम असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

२१ जून ही तारीख आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी मुक्रर झाल्यानंतर व सरकारने देशभरात एकाच वेळी हजारो-लाखो योगसाधक जमवून योगासने करण्याचे निश्चित केल्याने थोडी अस्वस्थता पसरली होती. पण सगळीकडे कडक सुरक्षा व्यवस्था राबवण्यात आल्याने निर्वेधपणे हा दिवस साजरा झाला. आजपर्यंत २६ जानेवारी रोजी राजधानीतल्या राजपथावर सैन्याचे संचलन पाहायला मिळत होते. तो राजपथ रविवारी हजारो योगसाधकांनी फुलून गेला होता. राजपथ हा योगपथ आहे, ही पंतप्रधानांची प्रतिक्रिया बरेच काही सांगून जाते. त्यांच्याच आग्रहाने केंद्रातील मंत्रिगण, भाजपशासित राज्यांतील मुख्यमंत्री, मंत्री एक मिशन म्हणून यामध्ये सहभागी झाले. अर्थात याचे श्रेय खुद्द मोदींनाच द्यावे लागेल. त्यांनी गेल्या वर्षी संयुक्त राष्ट्राच्या अधिसभेपुढे भाषण करताना आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करावा अशी विनंती जगापुढे केली होती. त्यांची ही विनंती संयुक्त राष्ट्रांनी तत्काळ मान्य केली व पृथ्वीवरील सर्वात मोठा दिवस असलेल्या २१ जूनची आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषणा झाली. जग जे चांगले आहे ते स्वीकारते हे त्या निमित्ताने दिसून आले.

या अगोदरही जगात साहित्य, व्यापार यांच्या निमित्ताने योगसाधना पसरली होती. गेल्या सव्वाशे वर्षांत रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, जे. कृष्णमूर्ती, रमण महर्षी, अरविंद, अय्यंगार अशा योगमहर्षींनी योग जगापुढे नेला. निरामय आयुष्याचा एक मूलमंत्र हे लोक जगाला देत होते. असा मूलमंत्र देण्यात त्यांच्या वर्तनात बढाया किंवा आत्मप्रौढी नव्हती. उलट योग हा मन:शांतीचा राजमार्ग आहे, अशी त्यांची शिकवण होती. एकंदरीत संस्कृतीचा, परंपरेचा प्रवाह असा संयतपणे पसरत असतो. बहरत असतो. आज संस्कृतीचा प्रसार करण्यामागे तंत्रज्ञानाचा मोठा वाटा असताना योग जगाला माहीत नाही, असा दावा करण्यात अर्थ नाही. उलट त्याचा दैनंदिन जीवनशैलीमध्ये सहभाग करण्याची गरज होती. म्हणूनच संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय योग दिनावर मोहोर उठवताना, योग ही प्राचीन भारतीय परंपरा असली तरी तिची आज जगाच्या एकूणच बदलत चाललेल्या जीवनशैलीला नितांत गरज असल्याचे स्पष्टपणे म्हटले. रविवारी हा दिवस आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उत्साहात साजरा करून राष्ट्रीय बाणा दाखवला असला तरी त्यातून आत्मस्तुतीला बळ मिळाल्यास ते घातक ठरेल. योगप्रसार हा उद्योग होऊ शकतो असे काहींचे म्हणणे आहे. अनेक साधू, सद््गुरू या निमित्ताने टीव्हीवर गेले दहा दिवस आपले दर्शन देत होते. पण त्यांच्या आकर्षक जाहिरातीत व कर्मकांडात वाहवत न जाता स्वत: समजून-उमजून योगाभ्यास केल्यास आपले मन:स्वास्थ्य अधिक बळकट होईल. ते देशासाठी महत्त्वाचे आहे.
बातम्या आणखी आहेत...