आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेपर्वाईचे बळी (अग्रलेख)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईतल्या मालवणी दारूकांडातील बळींच्या आकड्याने शंभरी पार केली आहे. शेकडो घरांतल्या बायकापोरांना उघड्यावर आणणारी ही दुर्घटना. पण राज्यातले कारभारी अजून चिडीचूप आहेत. गेल्या आठवड्यात बुधवारी ही महाभयानक घटना घडली. पालकमंत्री िवनोद तावडे यांना मालवणीत जायला सवड मिळाली रविवारी. इतके आपले राज्यकर्ते सजग आहेत. मालवणी दुर्घटनेत राज्य सरकारचे वागणे बेपर्वाईचे आहे. विरोधी बाकावरच्या लोकप्रतिनिधींची उदासीनता त्यापेक्षा अधिक दिसली. विक्रोळीत २००४ मध्ये विषारी दारूकांड घडले होते, त्यात ८७ जण मरण पावले होते. तेव्हा तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर मोठी टीका झाली होती. त्या मानाने आज गृहखाते सांभाळणारे देवेंद्र फडणवीस नशीबवान म्हणायचे. मालवणी दुर्घटनेचा तपास क्राइम ब्रँचकडे देण्यापलीकडे फडणवीसांना काही करावेसे वाटले नाही.

विक्रोळीची दुर्घटना आर. आर. पाटलांनी चांगलीच मनावर घेतली होती. गावठी गुत्त्यांिवरोधात त्यांनी व्यापक मोहीम उघडली होती. फडणवीस सरकारने मात्र लाख रुपये देण्यापलीकडे अजून काही केलेले नाही. आठ पोलिस व उत्पादन शुल्कच्या चार कर्मचार्‍यांना निलंबित केले आहे. ज्यांना निलंबित केलेय ते कर्मचारी िनरीक्षक दर्जाच्या खालचे आहेत. विक्रोळी दुर्घटनेतील दोषींना २०१२ मध्ये शिक्षा झाली. त्या खटल्यात पोलिस व उत्पादन शुल्कच्या कर्मचार्‍यांना प्रतिवादी न केल्याबद्दल न्यायालयाने सरकारला जाब विचारला होता. त्यातून शासकीय यंत्रणेने काहीच धडा घेतलेला दिसत नाही. विक्रोळीप्रमाणे इथेही बाबू मंडळी सहीसलामत सुटणार, एवढे निश्चित. धक्कादायक म्हणजे, ज्या राजू लंगडाच्या गुत्त्यावर राठोरी गावातल्या शेकडो मजुरांनी विषारी दारू प्यायली, तो गुत्ता उत्पादन शुल्कच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर आहे. आता या गुत्त्याची माहिती उत्पादन शुल्कला नव्हती, हे अशक्यच वाटते. मालवणी घटनेने पोलिस व उत्पादन शुल्क खात्याला केवळ उघडे पाडले असे नाही, तर हप्ता पद्धती किती आणि कशी बेबंदशाही प्रस्थापित करते, याची झलक दाखवली आहे. शेजारच्या सिल्वासा व दमण या केंद्रशासित प्रदेशातून अमली पदार्थ मुंबईसह राज्यात पोहोचत असल्याचे उघड झाले आहे.

मालवणी प्रकरणात रोज नवी माहिती येत आहे. गुत्तेवाल्यांच्या संघर्षातून ही दुर्घटना घडवल्याचे म्हटले जात आहे. मिथेनाॅल अधिक प्रमाणात िमसळल्याने शेकडोंचे मृत्यू ओढवल्याचे डाॅक्टर सांगत आहेत. क्राइम ब्रँचच्या तपासात सत्य बाबी पुढे येतीलच. राज्यात गावठी दारूवर पूर्णपणे बंदी आहे. तरी राज्यात िवभागनिहाय गावठी दारूचे नाना प्रकार सर्रास विकले आहेत. तेलंगणाशेजारच्या भागात ताडापासून ताडी काढली जाते. कोकणात नारळापासून माडी बनवली जाते. तर विदर्भात माेहाच्या फुलांपासून गावठी दारू गाळण्यात येते. अशा हातभट्टीत वीस रुपये लिटरने मिळणारे मिथेनाॅल सर्रास मिसळले जाते. गावठीचा साराच धंदा बेकायदा.
त्यामुळे त्यात कोण काय मिसळते, याची दखल घ्यायची शासनाला गरज नसते. पण याच सरकारचे चाकर प्रत्येक छोट्यामोठ्या गुत्त्याची खडान््खडा माहिती मात्र ठेवतात.

या गुत्त्यांकरवी पोलिस आणि उत्पादन शुल्क खात्याला चोख हप्ता विनासायास पोहोचत असतो. राज्य शासनाला अबकारी करामधून वर्षाला १० हजार कोटी रु.चा व्हाइट महसूल मिळतो, तो वेगळाच. राज्यातल्या अमली पदार्थांची िवक्री आणि त्यावर निर्बंध ठेवण्याचे काम उत्पादन शुल्क खात्याचे. पण गावठी गुत्त्यांवर मात्र त्यांची नेहमीच मेहेरनजर असते. मालवणी परिसरात उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकार्‍यांनी गेल्या वर्षात दीडशेच्या वर धाडी घातल्या होत्या. तरी राजू लंगडाचा गुत्ता विनासायास चालू होता. म्हणून मालवणीची जबाबदारी पोलिसांबरोबरच राज्य उत्पादन शुल्क खात्याचीसुद्धा आहे. या अधिकार्‍यांवर ३०२ अन्वये गुन्हे दाखल व्हायला हवेत, तरच भविष्यात अशी विषारी दारूकांडे थांबतील.

एकीकडे मालवणीत मृत्यूचे तीन दिवस तांडव चालले आहे. दुसरीकडे या महानगरातील माध्यमे पावसाच्या बातम्या देण्यात गुंग होती. पावसाने विश्रांती घेतल्यावर प्रसारमाध्यमांचे पाय लक्ष्मीनगरच्या झोपडपट्टीला लागले. सरकारने बळींच्या वारसांना लाखाची मदत जाहीर केली आहे. दोन आठवड्यांनी पावसाळी अधिवेशन आहे. त्यात मालवणीवर चर्चेचे कर्मकांड पार पडेल. सरकार थातूरमातूर उत्तर देऊन त्यावर पडदा टाकेल. पण या राज्यात पुन्हा मालवणी होऊ नये, असे म्हणून कोणी काही करणार नाही. कारण गावठीचे गुत्ते पूर्णतया कोणालाच संपवायचे नाहीत. हप्ताबंदी राजकारणी आणि सरकारी यंत्रणांनाच नको आहे. मटका काय किंवा गुत्ता काय, यातला पैसा कार्यकर्ते, राजकीय पक्ष आणि निवडणुकांच्या कामी झिरपत आलेला असतो. अधिकार्‍यांना तर याच पैशाच्या बळावर बदल्यांसाठी कोटीची बोली लावता येते. गावी जमिनी व महानगरात भूखंड घेता येतात. मग मालवणी कशी थांबणार? ती कुठे ना कुठे घडतच राहणार!
बातम्या आणखी आहेत...