आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खंत बाळगायलाच हवी (अग्रलेख)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
४० वर्षांपूर्वी २५ जूनच्या मध्यरात्री भारतावर आणीबाणी लादली गेली. भारतावर आणीबाणी लादण्याच्या घटनेला आज ४० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने काही वाद, चर्चा होत आहेत. लालकृष्ण अडवाणी यांनी गेल्या आठवड्यात मुलाखत दिली. मोदींना टोमणे मारण्याचा उद्देश त्यामागे असावा काय यावर अधिक लक्ष केंद्रित होत आहे. ते काही प्रमाणात बरोबर असले तरी त्यामुळे आणीबाणीच्या मुख्य रोगाकडे दुर्लक्ष होऊ नये. तसे ते होत असल्याने वेळीच सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. आणीबाणीचे ग्रहण अपेक्षेपेक्षा लवकर सुटले. देशात निवडणुका झाल्या व इंदिरा गांधींचा पराभव झाला. त्याबरोबरच हा विषय संपला, अशी समजूत देशातील अनेक बुद्धिजीवी करून देत असून ते धोक्याचे आहे. आणीबाणी लादल्याबद्दल काँग्रेसला कधीही खंत वाटली नाही, इंदिरा गांधींनी कधीही याबाबत माफी मागितली नाही, या महत्त्वाच्या बाबीकडे अडवाणी यांनी लक्ष वेधले होते. बाबरी मशीद पाडण्याच्या मोहिमेत सहभागी झालेल्या अडवाणींना असे बोलण्याचा अधिकार काय, असा भलत्याच विषयाला हात घालणारा प्रश्न काही जणांनी उपस्थित केला. भारतातील वादविवाद पद्धतीला धरूनच हे झाले.

बाबरी मशीद पाडण्यात आल्याच्या दुसर्‍याच दिवशी अडवाणी यांनी वृत्तपत्रात लेख लिहून खंत व्यक्त केली असली तरी या घटनेने त्यांच्या कारकीर्दीला बट्टा लागला हे नाकारता येत नाही. तोच प्रकार इंदिरा गांधींबद्दल झाला. अत्यंत कर्तृत्ववान, राष्ट्राभिमानी अशा नेत्याच्या कारकीर्दीवर आणीबाणीचा बट्टा लागला व त्याबद्दल त्यांना, त्यांच्या वारसांना व काँग्रेसला खंत वाटू नये हे वास्तव या देशासाठी धोकादायक आहे. नरेंद्र मोदींच्या कार्यशैलीत हुकूमशहाची बीजे असल्याबद्दल काळजी व्यक्त करणारे या दुसर्‍या अधिक महत्त्वाच्या वास्तवाकडे दुर्लक्ष करतात. हे वास्तव अधिक धोकादायक अशासाठी की अपराधाची खंत न बाळगण्याची वृत्ती त्यातून बळकट होत गेली. इंदिरा गांधींच्या काळात दोन बाबींवर भारताची घसरण झाली. कर्तृत्ववान, बुद्धिमान व चोख नेत्यांचे काँग्रेसमधील स्थान संपले व सामान्य खुशमस्कर्‍यांकडे सत्ता गेली. केवळ राजकारण नाही, तर सर्वच क्षेत्रांत त्यानंतर हा प्रवाह वेगवान झाला. बन्सीलाल, विद्याचरण शुक्ल अशी अनेक नावे घेता येतील. वेगळे मत मांडणार्‍यांचा नेहरूंच्या काळात थोडा तरी मान राखला जात असे. नेहरूही तसे एकाधिकारशाही प्रवृत्तीचे असले तरी स्वत:च्या आक्रमकतेला निर्बंध घालण्याचे भान त्यांना होते.

इंदिराजींच्या काळात ते सुटले. आपल्याभोवती खुशमस्कर्‍यांचे टोळके उभे करण्याची ही पद्धत पुढे अन्य पक्षांतही पसरली व नेत्याशिवाय वेगळा आवाज ऐकू येईनासा झाला. हे आजही सुरू आहे. ‘मी म्हणजेच राष्ट्र व मी म्हणजेच पक्ष’ अशा अहंकारात इंदिराजी अडकल्या व अहंकाराची ही कीड अन्य पक्षांमध्येही पसरली, हा आणीबाणीचा दुसरा आघात. भाजप व जनता पक्ष वगळता अन्य बहुतेक पक्ष एकचालकानुवर्ती झाले व आता भाजपमध्येही त्याची लागण लागली आहे. स्वतंत्र बुद्धीच्या, हुशार माणसांना बाजूला सारून अपात्र खुशमस्कर्‍यांच्या हाती सत्ता व एकाच नेत्याच्या चरणी निष्ठा या दोन आघातांसाठी तरी आणीबाणीची खंत बाळगायला हवी. भारत आज महासत्ता होण्यापासून कोसो दूर असण्याची कारणे या अध:पतनात दडलेली आहेत. दुर्दैवाने देशातील बुद्धिवादी त्याची म्हणावी तशी चिकित्सा करीत नाहीत.

नवमतदारांना तर याची काहीच माहिती नाही. वृत्तपत्रांवरील सेन्सॉरशिप ही काय भानगड असते याची त्यांना कल्पना नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मुस्कटदाबी म्हणजे काय हेही त्यांना कळलेले नाही. उजव्या शक्तींकडून अशी मुस्कटदाबी झाल्यास मोठी ओरड केली जाते, पण खुद्द सरकारकडूनच आणीबाणीत याची सुरुवात केली गेली होती याची आठवण काढली जात नाही. उजव्या शक्तींचा धाक जसा दाखवला जातो, तसा डाव्या वा काँग्रेसी शक्तींबद्दल सावध राहण्याचा इशारा दिला जात नाही. यामुळे सरकारकडून स्वातंत्र्यावर कसे निर्बंध येऊ शकतात याची जाणीव नव्या पिढीला नाही. ती करून देण्यासाठी आणीबाणीची आठवण, बाबरी मशिदीप्रमाणेच, वारंवार काढणे आवश्यक आहे. आणीबाणीबद्दल सजगता न येण्यामागे आणखीही एक कारण आहे.

आणीबाणीचा जाच बहुसंख्य नागरिकांपर्यंत पोहोचला नव्हता. त्यांचे रोजचे प्रश्न इतके मोठे होते की, स्वातंत्र्यापेक्षा अनुशासन त्यांना बरे वाटले. आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत उत्तर भारतात काँग्रेसचे पानिपत होण्यामागे, स्वातंत्र्यावरील निर्बंधांपेक्षा, नसबंदी मोहिमेची आक्रमक अंमलबजावणी हे मुख्य कारण होते. दक्षिणेत ही मोहीम राबवली गेली नाही व तेथे काँग्रेसला चांगल्या जागा मिळाल्या. तेव्हा लोकशाही मूल्यांवरील निष्ठेमुळे जनतेने इंदिराजींचा पराभव केला हा भ्रम आहे. अन्य अनेक भ्रमांप्रमाणे तो जोपासला गेला. भारतात लोकशाही मूल्ये दृढ न झाल्याचा दाखला आणीबाणी व त्यानंतरच्या निवडणुकांनी दिला. या कडवट वास्तवाची खंत बाळगलीच पाहिजे.
बातम्या आणखी आहेत...