आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वसुंधराराजेंवरचे गंडांतर (अग्रलेख)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे यांचे राजकारण तसे सरंजामशाही थाटाचे व आत्मकेंद्री पद्धतीचे. दिल्लीतील भाजपचे प्रमुख नेते आपल्या पक्षातील निर्णय सर्वसहमतीने घेतले जातात, असा कितीही दावा करत असले तरी या नेतृत्वाची वसुंधराराजेंच्या पुढ्यात डाळ शिजत नाही. अगदी दीड वर्षापूर्वी राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीत तिकीटवाटपादरम्यान राजेंच्या विरोधात पक्षात असंतोष होऊनही त्यांनीच शिक्कामोर्तब केलेल्या उमेदवारांना तिकिटे देण्यात आली. अर्थात, राजेंनी विक्रमी बहुमत मिळवून आपले निर्णय किती योग्य होते, हे पक्षाला दाखवून दिले होते. शिवाय हा विजय मोदी लाटेचा प्रभाव नसल्याचेही त्यांनी पक्षाच्या निदर्शनास आणून दिले. पण जेव्हा विक्रमी बहुमत मिळालेले सरकार अस्तित्वात येते तेव्हा सरकारमध्ये आलबेल असते, असे मानण्यात अर्थ नाही. अशा सरकारमध्ये आतून भेगा पडण्यास सुरुवात होत असते, पक्षात असंतोष वा सत्तासंघर्ष उफाळून येत असतो. त्याचे प्रत्यंतर केंद्रातल्या मोदी सरकारमध्ये व आता राजस्थानमध्ये दिसून येऊ लागले आहेत.

गेल्या दोन आठवड्यांपासून केंद्रात सुषमा स्वराज व राजस्थानमध्ये वसुंधराराजे यांची ललित मोदी प्रकरणावरून जी चहुबाजूंनी कोंडी झाली आहे, ती पाहता या प्रकरणात एकाचा तरी राजीनामा घेतला जाणार, हे स्पष्ट आहे. खुद्द राजे यांनी गुरुवारी आर्थिक घोटाळ्याचा आरोप असलेले ललित मोदी यांना ब्रिटनमध्ये राहण्यास मिळू द्यावे, म्हणून स्वत:च्या सहीचे शिफारसपत्र दिल्याचे कबूल केले. ही कबुली त्यांच्या राजीनाम्यासाठी कारण होऊ शकते. या कबुलीशिवाय राजे यांचा मुलगा दुष्यंत, जे सध्या भाजपचे खासदार आहेत, त्यांची ललित मोदी यांच्या कंपनीतील भागीदारीही वादग्रस्त अशी आहे.

दोन आठवड्यांपूर्वी सुषमा स्वराज यांनी ललित मोदी यांना "माणुसकी'च्या भावनेतून मदत केल्याचे कबूल केले होते. त्यानंतर हे प्रकरण तापत गेले; पण हे वादळ राजे यांच्या दिशेने घोंगावत जाईल, अशी कल्पना कोणी केली नव्हती. वास्तविक राजे व ललित मोदी यांची मैत्री जुनी आहे; पण त्यांच्या मैत्रीत बिनसल्याने राजे व सुषमा स्वराज यांची ललित मोदींना केलेली कथित मदत देशापुढे आली. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी याबाबत काय निर्णय घेतात, ते पाहणे महत्त्वाचे आहे. कारण या अगोदर मोदी सोडून भाजप अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री अरुण जेटली, नितीन गडकरी यांनी राजे यांचा राजीनामा घेण्याची गरज नाही, अशी ठामपणे भूमिका घेतली होती. पण राजेंनी स्वत: ललित मोदींना मदत केल्याची कबुली दिल्याने हे सर्वच नेते तोंडावर पडले आहेत. राजेंच्या राजीनाम्याचा निर्णय कोणाच्या कोर्टात जातोय, ते पाहणे महत्त्वाचे आहे. पंतप्रधान मोदी त्यांच्याच पक्षाच्या नेत्याला राजीनामा देण्यास सांगू शकतात; पण राजे यांच्यामागे बहुसंख्य भाजप आमदार असल्याने व राजेंचा राजीनामा घेतल्यास पक्षात बंड होण्याची भीती असल्याने हा पेच अधिकच वाढत जाऊ शकतो. काँग्रेसने क्रोनी कॅपिटलिझमला जन्मास घातल्याचा आरोप करत भाजप सत्तेवर आला होता.

महत्त्वाचे म्हणजे, गेल्याच आठवड्यात मोदींनी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत देशातील क्रोनी कॅपिटलिझम संपला असून अच्छे दिन आले असल्याचा दावा केला होता. पण प्रत्यक्षात राजेंची ललित मोदींना झालेली मदत व त्यात सुषमा स्वराज यांचा कथित सहभाग हा तर थेट पदाच्या गैरवापरापासून बाजारबुणग्या भांडवलदारांना (क्रोनी कॅपिटलिस्ट) मदत करण्यापर्यंत पोहोचला आहे. ललित मोदी यांचे संबंध हे सर्व पक्षांशी असल्याने राजे व सुषमा स्वराज यातून सहीसलामत सुटतील, असे भाजपच्या नेत्यांना वाटत होते. त्यामुळे मीडिया हे प्रकरण कितीही तावातावाने मांडत असले तरी त्याचा सरकारवर कोणताही परिणाम झालेला नाही, असे भाजपचे वर्तन होते. पण पक्षातील सुंदोपसुंदी तीव्र होत होती. ललित मोदी प्रकरणाचे धागेदोरे अगदी पीएमओपर्यंत जात असल्याने व ललित मोदी रोज नवे ईमेल मीडियासमोर उघड करत असल्याने प्रत्येक ज्येष्ठ नेत्याला आपली बाजू सांभाळताना कसरत होत होती.

दोनच दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सुषमा स्वराज व राजेंचा राजीनामा पक्ष घेणार नाही व हे सरकार पूर्वीचे यूपीए-२ सरकार नाही, असे थेट जाहीर करून आपली बाजू सांभाळली. या अगोदर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सुषमा स्वराजांना क्लीन चिट देताना स्वत:चे खाते मात्र आजही ललित मोदींच्या मागावर आहे, असे स्पष्ट करून स्वत:ची शिताफीने सुटका करून घेतली होती. जेटली आणि ललित मोदी यांच्यातील वितुष्ट या प्रकरणाच्या मुळाशी आहे, हे लपून राहिलेले नाही. तसेच जेटली व सुषमा स्वराज यांचेही संबंध मधुर नाहीत, हेही स्पष्ट आहे. अंतिमत: ललित मोदी प्रकरणात कोण कोणाला वाचवत आहे, हे लोकांना समजल्याने लाजेखातर कोणाचा तरी बळी देण्याची वेळ भाजपवर आली आहे. स्वराज यांना वाचवण्यासाठी राजेंचा बळी दिला जाऊ शकतो; पण त्यामुळे विरोधक स्वस्थ बसणार नाहीत.
बातम्या आणखी आहेत...