आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिस्तानी खुमखुमी (अग्रलेख)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताविरुद्ध १९६५ मध्ये झालेल्या युद्धात आपलाच विजय झाला, असे पाकिस्तान मानत असले तरी या युद्धात पाकिस्तानची मोठी हानी झाली आणि मोठा भूभाग भारताच्या ताब्यात आला, हे या युद्धानंतर जगाने मान्य केले आहे. एवढेच नव्हे, तर शस्त्रसंधी जाहीर झाली तेव्हा भारतीय लष्कराने लाहोरपर्यंत मुसंडी मारली होती आणि लाहोरचे विमानतळ टप्प्यात आले होते. रशियाने केलेल्या मध्यस्थीला होकार देत हे युद्ध थांबवण्यात आले. आपलाच विजय झाला असे मानणार्‍या पाकिस्तानला या युद्धाला ५० वर्षे झाल्यानिमित्त रावळपिंडीत कार्यक्रम आयोजित करणे भागच होते. देशाला काही संदेश देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करणे, समजण्यासारखे आहे. मात्र पाकिस्तानविरुद्ध लहान किंवा मोठे युद्ध पुकारल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील, अशी गरळ पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल राहील शरीफ यांनी ओकली आहे. एवढेच नव्हे, तर वेळ आल्यास आम्ही अण्वस्त्रे वापरण्यास कमी करणार नाही, अशी दर्पोक्ती एक मंत्र्याने केली आहे. पाकिस्तानात दहशतवाद्यांनी धुमाकूळ घातला असून अशी अतिशय स्फोटक परिस्थिती असताना लष्करप्रमुखांना भारताला इशारा द्यावा वाटला, याला खुमखुमीच म्हणतात.

आमच्या देशात काही अतिशय गंभीर प्रश्न निर्माण झाले असून युद्धखोरीऐवजी आम्ही आता ते आधी सोडवू, असे लष्करप्रमुखांनी म्हणावे, अशी अपेक्षा ठेवता येणार नाही. मात्र, त्याचे भान शरीफ यांनी ठेवायला हवे होते. विशेषतः भारतात पकडण्यात आलेले अतिरेकी आपण पाकचे नागरिक आहोत, असे सांगत असताना आपण कोठे तरी कमी पडतो आहोत, हे त्यांना मान्य करावे लागणार आहे. त्यामुळेच त्यांना दहशतवादाविषयी विधाने करावी लागली आहेत. अमेरिका आणि चीनकडून पाकिस्तानला जी भरभक्कम मदत केली जात आहे, त्यामागे पाकिस्तान पोसत असलेला दहशतवाद जगाला होरपळून काढू नये, हा उद्देश आहे आणि तसे थेट सांगितले जात आहे. जगाचा इतका अविश्वास पदरात पाडून घेतला असताना पाकिस्तानला युद्धखोरी सुचते आहे, हे त्या देशाचे दुर्दैवच म्हटले पाहिजे.

आपल्या घरातील हा संघर्ष थांबवण्याऐवजी शरीफ यांना युद्धखोरीची भाषा करावी वाटते, याकडे भारताला दुर्लक्ष करता येणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी झाला तेव्हा शेजार्‍यांना सोबत घेण्याचा एक प्रयत्न म्हणून त्यानी सर्वच शेजारी राष्ट्रप्रमुखांना निमंत्रित केले होते. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ हेही त्यात होते. भारतीय उपखंडात विकास होण्यासाठी भारत आणि पाकिस्तानदरम्यानचे संबंध सुधारण्याची गरज आहे. विकासकामात हा अडथळा नको, असा विचार त्या वेळी मोदींनी केला असेल, पण लष्कराचे बाहुले असलेले पाकिस्तानी नेते वेगळे काही करू शकतील, असे दिसत नाही. त्यामुळेच पाक सीमा पुन्हा असुरक्षित झाली आहे. उभय बाजूंचे निरपराध नागरिक आणि जवान बळी पडत आहेत. शरीफ यांनी गाठीभेटींमधून शांततेची आशा निर्माण केली होती, मात्र ती इतकी अल्पजीवी असेल, असे वाटले नव्हते. लोकशाहीला आव्हान देऊन तेथे लष्कराची थेट सत्ता प्रस्थापित करण्याची परंपरा पाकिस्तानात राहिली आहे. त्याची आठवण पाकिस्तानी लष्करप्रमुखांना झालेली दिसते. इतिहास असे सांगतो की, पाकिस्तानात जेव्हा जनक्षोभ माजतो, तेव्हा त्यावर स्वार होऊन लष्कर सत्ता ताब्यात घेते. आताही तशीच काहीशी स्थिती तेथे आहे. विकासकामांसाठी चीन आणि अमेरिकेकडून मोठी मदत घेऊन खरोखरच देशात काही बदल करण्याचा विचार राजकीय नेतृत्व करीत आहे, असे वाटू लागले होते. मात्र गेल्या काही दिवसांतील पाकिस्तानच्या बाजूची विधाने, पाकिस्तान पुन्हा मूळ पदावर जात असल्याचे लक्षण आहे.

पाकिस्तानकडून होणारी घुसखोरी आणि काश्मीर प्रश्नाचा पाकिस्तान करत असलेला वापर, यामुळे भारतीय लष्करप्रमुख जनरल दलबीरसिंग सुहाग यांनी जलद आणि छोट्या युद्धासाठी तयार राहण्याचे सूतोवाच केले होते. त्यावरील पाकिस्तानने दिलेली ही प्रतिक्रिया असली तरी पाकची अण्वस्त्रे आणि त्यावर दहशतवादी ताबा मिळवण्याचा धोका लक्षात घेता, भारताला कायमच दक्ष राहावे लागणार आहे. भारत आणि पाकची निम्मी-अधिक जनता दारिद्र्यातून अजून बाहेर आलेली नाही, मात्र या दोन्ही देशांना एकमेकांच्या भीतीने लष्करावर प्रचंड खर्च करावा लागत आहे. आता तर शस्त्रखरेदी करणारे जगातील आघाडीवरील देश म्हणून त्यांची ओळख होऊ लागली आहे. पण १९६५ च्या युद्धाच्या पन्नाशीनिमित्त पुन्हा युद्धज्वर वाढू लागला आहे. भारताकडे मोठ्या भावाची भूमिका असल्याने भारत आपली जबाबदारी निभावत आला आहे. मात्र, पाकिस्तान त्यातून शहाणा होणार नसेल तर या युद्धज्वरातून हा संघर्ष असाच पेटत राहील, अशी भीती निर्माण झाली आहे. साठ- सत्तरीतील लष्करी बळ आणि आजचे बळ यात जो प्रचंड फरक पडला आहे, तो उभय देशांना विनाशाकडे नेणारा ठरेल, याचे भान ठेवावेच लागणार आहे.