आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुटप्पींचे प्रदूषण (अग्रलेख)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोणत्याही गोष्टीचा राजकारणासाठी उपयोग करण्याची व त्याद्वारे सारा माहोल नासवण्याची अत्यंत वाईट खोड सर्वच राजकीय पक्षांना लागलेली आहे. आपणच कधीकाळी योग्य म्हणून स्वीकारलेली गोष्ट विधिमंडळात विरोधी बाकांवर बसण्याची पाळी आल्यानंतर संबंधित राजकीय पक्षाला डोळ्यांत खुपू लागते. मग हे विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षावर तुटून पडतात. या गलिच्छ राजकीय खेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप असे सारेच पक्ष राज्यात तसेच केंद्रात खेळताना दिसतात. दुटप्पी लोकांच्या वर्तनामुळे जे सामाजिक प्रदूषण निर्माण होते त्याचे ओंगळवाणे दर्शन जैन धर्मीयांच्या पर्युषण काळात राज्य सरकार व काही महानगरपालिकांनी मांसविक्रीवर घातलेल्या बंदीच्या निमित्तानेही झाले. मीरा-भाईंदर महानगरपालिकेने पर्युषण काळात आठ दिवस मांसविक्रीवर बंदी घालण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. तो प्रत्यक्षात अस्तित्वात आला नाही हा भाग वेगळा; पण त्या प्रस्तावाचे अनुकरण करीत मुंबई महानगरपालिकेनेही पर्युषण काळात चार दिवस मांसविक्रीवर बंदी घातली. मीरा-भाईंदर महानगरपालिकेत भाजपची सत्ता असल्याने तेथे ते जैनांचा अनुनय करत असल्याची टीका शिवसेना व अन्य पक्षांनी केली; परंतु मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना-भाजपची सत्ता असून तेथेही अशीच बंदी घातली गेल्यानंतर खरे तर शिवसेनेने तोंड लपवायला हवे होते. मात्र, राजकारणात गेंड्याची कातडी घालूनच वावरावे लागते हे माहीत असल्याने शिवसेनेने आपल्यावरील जबाबदारी झटकून भाजपवरच तोंडसुख घ्यायला सुरुवात केली.

जैन मंडळींनी मुस्लिमांच्या मार्गाने जाऊ नये, तुमचा धर्म तुमच्या घरात पाळा, आमच्या चुलीपर्यंत याल तर खपवून घेतले जाणार नाही, असे इशारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले. एक ठाकरे बोलल्यानंतर दुसरे ठाकरेही लगेच बोलतात. त्या परंपरेला जागून राज ठाकरेही गर्जले की, महाराष्ट्र हा गुजरात नाही. येथे काय करायचे ते जैन लोकांनी ठरवायचे नाही. दुसर्‍या बाजूला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनेही मांसविक्रीवर बंदी घातल्याबद्दल भाजप, शिवसेनेवर कडाडून हल्ला चढवला होता. हे टीकेचे प्रहार प्रत्येक पक्षाने एकमेकांवर केले ते योग्यच झाले. त्यामुळे हे सर्व पक्ष कसे बेगडी व तकलादू आहेत हे तरी जनतेसमोर आले. ज्या काँग्रेस, राष्ट्रवादीने तोंडसुख घेतले त्याच पक्षांचे महाराष्ट्रात सरकार असताना २००४ सालापासून पर्युषण काळात मांसविक्रीवर दोन दिवस बंदी घालण्याचा निर्णय झाला होता. या निर्णयानुसारच मुंबईसह काही पालिका आपल्या हद्दीतही ही बंदी लागू करत असत. ही वस्तुस्थिती राज्याचे हंगामी अधिवक्ता अनिल सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात सांगितली. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने दोन दिवसांची घातलेली बंदी पर्युषण काळात आठ दिवसांवर नेण्यासाठी भाजप भलतेच उतावीळ झाले होते. सगळा वाद पेटला तो भाजपच्या याच भूमिकेमुळे. पर्युषण काळात मासे, अंडी यांच्या विक्रीवर बंदी नसते. फक्त मांसविक्रीवर बंधने येतात. त्यामुळे मांसाहार करणार्‍यांच्या विरोधात पर्युषणाचे निमित्त करून शाकाहारी लोकांनी कारस्थान रचले आहे, असे चित्र उभे करण्याचा प्रयत्न झाला. पर्युषणाच्या काळातील मांसविक्री बंदी ही केवळ सुरुवात असून यामागे भाजपचे राजकारण असल्याची टीका करणार्‍या राज ठाकरे यांना २००४च्या निर्णयाची बहुधा माहिती नसावी.

पर्युषणात मांसविक्रीवर दोन दिवस घातलेली बंदी योग्य असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानेही एका प्रकरणात दिला होता. त्याची गंधवार्ताही राज ठाकरेंना नव्हती. राज ठाकरे ज्या नाशिकला कवटाळून बसतात तेथील महानगरपालिकेनेही मांसविक्री बंदीचा आदेश जारी केला होता. त्यामुळे या वादामध्ये उद्धव व राज ठाकरे या बंधूंनी व्यक्त केलेली मते कोणीही गांभीर्याने घेऊ नयेत. मांसविक्री बंदीच्या निर्णयाचे लोण भाजपचे स्वबळावरील सरकार असलेल्या राजस्थान, गुजरात आदी राज्यांतही लगेच पसरले. जम्मू-काश्मीरमध्ये भाजप-पीडीपीचे आघाडी सरकार असले तरी तेथील न्यायालयानेच पर्युषण काळात मांसविक्रीला बंदी केली आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर व अमित शहा हे भाजपचे पक्षाध्यक्ष झाल्यानंतर विविध राज्यांतील तसेच काही देशांत स्थायिक झालेल्या गुजराती मंडळींच्या आकांक्षा व अपेक्षा नक्कीच वाढल्या आहेत. मात्र, ही मंडळी करीत असलेल्या मागण्यांना कधीकधी प्रादेशिकता वादाचे संकुचित अस्तर असते. जैन मंडळीही पर्युषण काळात मांसविक्रीवर बंदी घालावी यासाठी भलतीच आग्रही झालेली आहेत. त्यासाठी ते कोणालाही लक्षात येणार नाही अशा रीतीने सत्ताधार्‍यांवर दबाव टाकत असतात.

या खेळी आता जैनांनीही थांबवण्याची गरज आहे. कोणी कोणता आहार कधी घ्यावा हे ज्याचे त्याला ठरवू द्यावे. मांसविक्रीवर घातलेली बंदी खूप आरडाओरड झाल्यामुळे मुंबई, मीरा-भाईंदर येथे पुन्हा दोन दिवसांवर आणली गेली. मात्र, या सगळ्या गदारोळात संबंधितांच्या दुटप्पी वर्तनाने जे सामाजिक प्रदूषण झाले, त्यामुळे झालेली हानी लवकर भरून न येणारीच आहे.