आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भ कडक तापला (अग्रलेख)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राज्यभर महाराष्ट्र दिनाचे कार्यक्रम सुरू असतानाच विदर्भात मात्रवेगळ्या राज्याच्या मागणीच्या आंदोलनाचा भडका उडाला. उन्हाचा पारा शिखरावर पोहोचल्यामुळे आधीच तापलेल्या वातावरणात या भडक्याने वातावरण अधिकच तप्त झाले. महाराष्ट्र दिनाच्या सरकारी कार्यक्रमांचे सोपस्कार एकीकडे पार पाडले जात होते, तर अखंड महाराष्ट्रवादीही आपली ताकद दाखवत वेगळ्या विदर्भवाद्यांच्या आंदोलनाला विरोध करत होते. नागपूर, वर्धा, यवतमाळसह संपूर्ण विदर्भात २४ ठिकाणी विदर्भवाद्यांनी वेगळ्या विदर्भाचा झेंडा फडकवला, अनेक ठिकाणी काळे झेंडे दाखवले. वेग‌ळ्या विदर्भाचे समर्थन करणाऱ्या भाजपच्या जाहीरनाम्याची होळी केली. काही ठिकाणी आंदोलनाने हिंसक वळण घेतले. यवतमाळ येथे बसवर दगडफेक झाली. नागपुरात रास्ता रोकोचा प्रयत्न झाला.

ठिकठिकाणी झालेल्या आंदोलनात शेकडो कार्यकर्त्यांना अटक झाली. तिकडे मराठवाड्यातही त्याची थोडी धग पोहोचली. जालन्यात वेगळ्या मराठवाड्याचा झेंडा फडकवण्यात आला, तर तिकडे ज्या मुंबईत महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही, अशा गर्जना केल्या जातात आणि अखंड महाराष्ट्रासाठी ज्या हुतात्म्यांचा दाखला दिला जातो त्या हुतात्मा स्मारक परिसराची साधी साफसफाई आणि सुशोभीकरणही केले गेले नाही, असे आरोप झाले. मुख्यमंत्र्यांनी हा आरोप फेटाळला आणि परंपरागत पद्धतीनेच कार्यक्रम झाल्याचे स्पष्ट केले. मात्र, या विषयावरून चिखलफेक करत राजकीय कलगीतुरा करण्यात नेत्यांनी धन्यता मानली. अॅड. श्रीहरी अणे वेगळ्या विदर्भासाठीचे जनमत तयार करण्याचे काम अनेक वर्षांपासून करत आहेत. सरकारने त्यांना महाधिवक्ता केल्यानंतर त्यांची भूमिका कायम राहिली. राज्याच्या एका मोठ्या पदावरचा माणूस राज्य तोडण्याची भाषा करतो, हे पाहून वातावरण अधिकच बिघडले. शेवटी त्यांनी राजीनामा दिला आणि त्यांच्या या मोहिमेला आणखीनच उभारी मिळाली. विदर्भभर त्यांच्या सभा होत आहेत. त्यांच्या नेतृत्वात इतर विदर्भवादी संघटना आणि समविचारी लोक एकत्र येत आहेत. वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनाच्या नेतृत्वाला एक आश्वासक नवा चेहरा मिळाला आहे. त्यांना चांगला प्रतिसादही मिळत आहे. वेगळ्या विदर्भाबाबत भूमिका बदलल्यास भाजप विरोधातही थेट रस्त्यावर उतरण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

वेगळ्या विदर्भाचा आगामी तीन वर्षांचा कालबद्ध कार्यक्रमही निश्चित करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. इतके दिवस मागणी, उपोषण, निदर्शने, सभा, चर्चासत्र, मतदान अशा टप्प्यांवर चाललेल्या वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनाला आता हिंसात्मक वळण मिळत आहे. दिल्लीत अणेंवर शाई फेकण्यात आली. अकोल्यातील जाहीर सभेवर शिवसैनिकांचा जमाव गेला, तेथे त्यांना पोलिसांचा प्रसाद खावा लागला. अॅड. अणेंचा वणवा असाच पेटत राहिला तर येत्या काळात तेलंगणासारखे लोक रस्त्यावर उतरण्याचा धोका आहे. त्यातही सगळ्याच पक्षांचे धोरण वेगवेगळे आहे. त्यांच्यात समन्वय नाही. त्यामुळे रस्त्यावर दोन्ही विचारांचे लोक उतरले तर वेगळाच भडका उडण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. सध्या निर्णायक लढाईची वेळ आली आहे. ही अखेरची नाही तर अंताची लढाई आहे ती लोकशाही मार्गानेच व्हावी. त्याला हिंसक वळण लागू नये, अशीच अणेंची भूमिका आहे. पण, या तत्त्वाला मर्यादा आहेत. त्यामुळे संघर्ष अटळ आहे आणि त्यातूनच आजच्यासारखे प्रकार घडायला सुरुवात झाली आहे.

वेगळा विदर्भ व्हावा की नाही, हा आजही वादाचाच विषय आहे. या विषयावर दोन मतप्रवाह असल्यामुळे ठोस भूमिकेचा अभाव आहे. त्यामुळे हा विषय केवळ राजकारणाचाच आहे असे मानून भूमिकाच ठरवणाराही एक वर्ग आहे. तो सध्या शांत आहे. निवडणुकीपूर्वी वेगळ्या विदर्भाच्या बाजूने असलेली आणि याच मुद्द्यावर राज्यात सत्ता प्राप्त करणारी भाजप तसेच मुख्यमंत्री किंवा सत्तेतील त्यांचा एकही माणूस या विषयावर एक चकार शब्द बोलायला तयार नाही. वेगळा विदर्भ करायचाच असेल तर ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया लगेच सुरू करावी. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचाली करून त्याचा फायदा होणार नाही, अशी विदर्भवाद्यांची ठाम मागणी आहे. तो करायचा नसेल तर नेमका अॅक्शन प्लॅन जाहीर करायला हवा. या विषयावरची कोंडी वेळीच फुटायला हवी.
बातम्या आणखी आहेत...