आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलमापनाची कालसंगती (अग्रलेख)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाळा, अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती आणि करिअर याचा अत्यंत साचेबद्धपणे विचार करण्याच्या मळलेल्या वाटेला फाटा देऊन दहावीतील विद्यार्थ्यांच्या कलमापन चाचणीचा वेगळ्या अंगाचा उपक्रम यशस्वीरीत्या राबविल्याबद्दल राज्य सरकार आणि शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे नक्कीच कौतुकास पात्र ठरतात. विशेष म्हणजे, देशात अशा प्रकारचा उपक्रम राबविणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले असून या चाचणीचे निष्कर्ष रूढ समजांना काहीसे छेद देणारे आहेत. म्हणूनच हा संपूर्ण प्रयोग साकल्याने समजावून घेणे गरजेचे आहे. आपल्याकडे करिअरचे बहुसंख्य मार्ग माध्यमिक शालांत परीक्षेनंतर खुले होत असल्याने या टप्प्यावर कल नेमका कुणीकडे आहे ते मुलांच्या व पालकांच्या लक्षात यावे आणि त्यावरून पुढील दिशा ठरवणे सोपे जावे या उद्देशाने कलमापन चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये २१ हजारांहून अधिक शाळांतील तब्बल साडेपंधरा लाख विद्यार्थी सहभागी झाले. नुकतेच या चाचणीचे निष्कर्ष हाती आले असून त्यानुसार सर्वाधिक विद्यार्थ्यांचा ओढा फाइन आर्ट््स (पारंपरिक कलाकारी व सादरीकरण कला) कडे असल्याचे पुढे आले आहे. अर्थात, वैद्यकीय शाखा व तंत्रज्ञान हेदेखील फार मागे नाहीत.

फाइन आर्ट््सखालोखाल आरोग्य आणि जैविक विज्ञान, तांत्रिक-अभियांत्रिकी, कला शाखा व मानव्यविद्या आणि वाणिज्य असा हा क्रम आहे. डॉक्टर अथवा इंजिनिअर होणे म्हणजेच यशस्वी करिअर असा जो सार्वत्रिक समज आपल्याकडे झालेला आहे त्याला सर्वाधिक विद्यार्थ्यांचा ओढा कलागुणांकडे असल्यामुळे काहीसा धक्का पोहोचणार आहे. मात्र, हा धक्का सुखद असल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये. कारण, कला मग ती कोणत्याही प्रकारची असो त्यामध्ये सर्वाधिक महत्त्व असते ते सर्जनशीलतेला म्हणजेच क्रिएटिव्हिटीला. महाराष्ट्राला सर्जनशीलतेची उज्ज्वल परंपरा असून नवी पिढीदेखील मराठी मातीत तेच रुजवू पाहत आहे, किंबहुना त्याकडे तिचा ओढा आहे ही समाधानाची बाब म्हणायला हवी. कारण, क्षेत्र कोणतेही असो, जिथे सर्जनशीलतेला वाव मिळतो तेथेच सर्वोत्तम निर्मिती होत असते.

आवडीनुसार काम करायला मिळाले तर त्यामध्ये अधिक गती प्राप्त होते, हा सर्वमान्य सिद्धांत आहे. मात्र, अमेरिकेसह अन्य पाश्चिमात्य देशांत त्याला जेवढे महत्त्व दिले जाते तेवढ्या गांभीर्याने आपल्याकडे पाहिले जात नाही हे वास्तव आहे. अशा स्थितीत सरकारने या उपक्रमाला चालना दिल्याने आता त्याला वेगळे परिमाण लाभणार असून सर्वसामान्यांना त्याचा थेट लाभ घेता येणार आहे, ही त्याची सर्वात मोठी उपलब्धी मानायला हवी. दहावीच्या निकालाबरोबरच कलमापन चाचणीचा अहवालही प्राप्त होणार असला तरी तेथून पुढच्या टप्प्यावर किती सजगता दाखवली जाते, त्यावर बरेच काही अवलंबून असेल. कारण, नवीन काहीही समोर आले की प्रथम त्याकडे छिद्रान्वेषीपणाने पाहण्याची वृत्ती आपल्याकडे सर्रास आढळते. त्यातूनच या चाचणीची अचूकता काय, शास्त्रोक्त पद्धतीचे निकष किती पाळले गेले, सामूहिक पद्धतीने तिची परिणामकारकता साधली जाईल काय वगैरे प्रश्न उपस्थित होतीलच. परंतु, त्यापेक्षा या निमित्ताने कलमापनास सुरुवात झाली हे अधिक महत्त्वाचे आहे. त्यात अधिकाधिक शास्त्रशुद्धता आणणे, त्रुटी आढळून आल्यास त्या दूर करणे कालौघात होईलच. प्रगत देशांप्रमाणे याहूनही अगोदर म्हणजे सहावी-सातवीच्या स्तरावर अशा चाचण्या घेणेसुद्धा आवाक्यात येऊ शकते. पण, सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तो पालकांच्या मानसिकतेचा.

ज्ञानार्जनापेक्षाही शिक्षणाचा उद्देश भविष्यात पैसा कमावण्यासाठीची गुंतवणूक असल्याचा समज आज इथे बहुतांशाने रूढ झाला आहे. परिणामी, कोणती नोकरी वा व्यवसाय केल्यावर अधिक पैसा मिळतो, त्यावर डोळा ठेवून मुलांच्या मनावर तशी उदाहरणे बिंबवली जातात. बहुतेकदा तर मुलांवर करिअर लादले जाते. साहजिकच मग ते लोढणे बनून पाट्या टाकायची वृत्ती बळावते अन् अंतिमत: ‘एक्सलन्स’ऐवजी ‘अॅव्हरेज’वर समाधान मानून घ्यावे लागते. आज कोणत्याही क्षेत्राकडे सहज नजर टाकली तरी हे प्रकर्षाने जाणवते. आपल्याकडच्या शिक्षण पद्धतीचा हा जो चक्रव्यूह निर्माण झाला आहे तो भेदण्याची क्षमता कलमापन चाचणीच्या या अनोख्या प्रयोगात आहे. म्हणूनच भविष्यात त्या आधारे अभ्यासक्रमांचे नियोजन वा नव्या विद्याशाखांना मान्यता वगैरे देण्याचा विचारसुद्धा पुढे येत आहे. तसे झाले तर आवडीप्रमाणे शिक्षण व त्या माध्यमातून करिअरचे नवे द्रुतगती मार्ग खुले होऊन संपूर्ण शिक्षण क्षेत्राला एक नवा आयाम मिळू शकेल. फक्त त्यासाठी आपल्या पाल्याची नेमकी आवड काय आहे, हे जाणून घेण्याची सवड तेवढी पालकांनी काढायला हवी.
बातम्या आणखी आहेत...