आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्रोचे पुढचे पाऊल (अग्रलेख)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अवकाश तंत्रज्ञान व संशोधन क्षेत्रात भारताच्या ‘इस्रो' (इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन) या संस्थेने आजवर केलेली प्रगती नक्कीच स्पृहणीय आहे. या प्रगतीच्या बळावरच बुधवारी इस्रोने मोठी अवकाश झेप घेतली. वीस उपग्रहांना एकाच वेळी अवकाशात घेऊन ‘पीएसएलव्ही-सी ३४’ या प्रक्षेपकाने इस्रोच्या श्रीहरिकोटा येथील तळावरून अवकाशात यशस्वी उड्डाण केले. या असाधारण कामगिरीमध्ये भारतातील युवा पिढीच्या संशोधन कर्तृत्वाचाही महत्त्वाचा वाटा होता. अवकाशात प्रक्षेपित झालेल्या २० उपग्रहांमध्ये गुगल कंपनीच्या उपग्रहाबरोबरच देशातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या दोन उपग्रहांचाही समावेश होता. पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील (सीओईपी) विद्यार्थ्यांनी तयार केलेला ‘स्वयम्’ हा उपग्रह तसेच चेन्नईतील सत्यभामा विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी तयार केलेला सत्यभामा सॅट अशी या दोन या उपग्रहांची नावे आहेत. देशातील विज्ञान संस्था जी मोलाची कामगिरी पार पाडत असतात, त्यामध्ये देशाच्या युवा पिढीच्या सहभागाचे दर्शन सामान्य जनतेलाही मोठ्या प्रमाणावर व्हायला हवे. याचे कारण देशात मूलभूत संशोधन किंवा इतर संशोधन शाखांमध्ये विद्यमान काळात उत्तम करिअरच्या संधी निर्माण होत आहेत. उच्चविद्याविभूषित मुलांनी परदेशी स्थायिक न होता देशात राहूनच संशोधन कार्याला वाहून घेण्यासाठी अनुकूल ठरावे असे वातावरण निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारचे गेल्या काही वर्षांपासून, विशेषत: १९९१ मध्ये आर्थिक उदारीकरणाचे युग अवतरल्यापासून प्रयत्न सुरू आहेत.

इस्रो ही केंद्रीय अवकाश संशोधन खात्याच्या अखत्यारीत येते. मात्र, तिला पुरेशी स्वायत्तता देण्यात आलेली आहे. इस्रोच्या कारभाराचा लेखाजोखा हा थेट पंतप्रधान कार्यालयाकडूनच घेतला जात असल्याने या संस्थांच्या कारभारात मंत्री, नोकरशहा यांची लुडबूड होण्याचे प्रसंग खूपच कमी येतात. त्यामुळेच इस्रोसारख्या संस्था आपल्या कार्यक्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करून दाखवत आहेत. देशामध्ये स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी दूरदृष्टी राखून विज्ञान संस्थांची उभारणी केली. नेहरूंच्या नंतर केंद्रात सत्तेत असलेले काँग्रेस किंवा बिगरकाँग्रेसचे सरकार असो, या सरकारांनी विज्ञान संस्थांचे खच्चीकरण होईल असे निर्णय घेणे कटाक्षाने टाळले. या संस्थांना स्वमताने प्रगती करण्यास वाव दिला ही सकारात्मक बाजू विसरता येणार नाही. त्यामुळे देशात आजवर जे विज्ञान संशोधन झाले आहे तसेच जे सुरू आहे त्याचे श्रेय कोणाही पक्षाने घेण्याचा प्रयत्न करू नये.

आधुनिक काळात अस्तित्वात असलेल्या अद्ययावत तंत्रज्ञानाची पाळेमुळे देशातील पाच हजार वर्षांचा वारसा असलेल्या संस्कृतीमध्ये पूर्वीपासूनच कशी होती याबद्दल दावे करत राहणे जितके हास्यास्पद आहे, तितकेच इस्रोसारख्या संस्थांनी मिळवलेल्या यशामुळे आत्मसंतुष्ट होणेही धोकादायक आहे. पाश्चात्त्य तसेच अन्य विकसित देशांच्या तुलनेत भारताला मूलभूत तसेच अन्य शास्त्रीय शाखांच्या संशोधनात अजून मोठी मजल मारता आलेली नाही. त्यामुळे इस्रोने एकाच वेळी २० उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले हा देशाच्या प्रगतीतील एक टप्पा मानला गेला पाहिजे. इस्रोने बुधवारी केलेल्या कामगिरीची काही वैशिष्ट्ये देशाच्या अवकाश संशोधनाला पाच पावले पुढे नेणारी आहेत. ‘पीएसएलव्ही’ प्रक्षेपकाने बुधवारी ३६वे उड्डाण केले व इतर अवकाश संस्थांच्या दहापट कमी खर्चात त्याने आपल्यासोबत वीस उपग्रह आकाशात नेले. पीएसएलव्हीने सोबत न्यावयाच्या उपग्रहांच्या संख्येत २८ एप्रिल २००८ नंतर प्रत्येक उड्डाणागणिक वाढच होत गेलेली आपल्याला दिसून येईल. आठ वर्षांपूर्वी पीएसएलव्हीने एकाच वेळी १० उपग्रह घेऊन उड्डाण केले होते. मात्र, अमेरिकेच्या मिनोटॉर १ अग्निबाण २९ उपग्रह एकाच वेळी घेऊन अवकाशात झेपावला होता.

रशियाच्या डीएनईपीआर अग्निबाणाने २०१४ मध्ये एकाच वेळी ३३ उपग्रह सोडले होते. अमेरिका, रशियाच्या सामर्थ्याचा हा तपशील पाहिला तर इस्रोला स्वबळावर अजून किती मजल गाठायची आहे हे लक्षात येईल. उपग्रह प्रक्षेपणामध्ये व्यावसायिक स्पर्धाही वाढली आहे. बुधवारी या स्पर्धेमध्ये भारत अधिक सक्षमपणे उतरला. १९६२ मध्ये अवकाश संशोधनासाठी राष्ट्रीय समिती स्थापन झाली होती. १९६९ मध्ये याच समितीचे रूपांतर इस्रो या संस्थेत झाले. १९७५ मध्ये अार्यभट्ट हा पहिला भारतीय उपग्रह बनवला. त्यानंतर संस्थेने केलेली प्रगती ही तिला चांद्रयान-१, मार्स ऑरबिट मिशन या मोहिमांच्या यशस्वी वाटेवर घेऊन गेली. इस्रोच्या या यशाने दिपून न जाता देशातील प्रत्येक विज्ञान संस्था, विद्यापीठांनीही संशोधनात अशीच नेत्रदीपक कामगिरी करण्याचा निर्धार केला पाहिजे. त्यातूनच देशाची प्रगती अधिक वेगाने होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...