आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेल्वे सुरक्षेलाच अपघात! (अग्रलेख)

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तर प्रदेशातील पुखराया रेल्वे स्थानकाजवळ रविवारी पहाटे पाटणा-इंदूर एक्स्प्रेसचे चौदा डबे घसरून झालेल्या अपघातात भीषण प्राणहानी झाली. अनेक जण जखमी झाले. गेल्या जुलै महिन्यापासून झालेल्या रेल्वे अपघातांपैकी पाच मोठ्या रेल्वे अपघातांचा आढावा घेतला तर असे दिसेल की, प्रवासी किंवा मालवाहूतक करणाऱ्या रेल्वेंचे डबे एक तर रुळावरून घसरले किंवा रेल्वेगाड्या एकमेकांवर आदळल्याने तसेच मानवी चुकांमुळे हे अपघात झाले. गेल्या जुलै महिन्यात उत्तर प्रदेशमध्येच रखवालदार तैनात नसलेले रेल्वे फाटक अोलांडताना रेल्वेने धडक दिल्याने आठ मुलांचा मृत्यू झाला होता. गेल्या ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यादरम्यान चार रेल्वे अपघातांत दोनहून अधिक प्रवासी ठार व २७ जखमी झाले होते. त्या सर्वांवर कडी करणारा पुखराया येथे झालेला रेल्वे अपघात आहे. अपघातानंतर रेल्वे मंत्रालयाची एकाच साच्यातली कार्यवाही दिसली ती म्हणजे अपघातातील मृत किंवा जखमींना भरपाई घोषित करणे, त्या अपघाताच्या चौकशीसाठी समिती नेमणे वगैरे. एका अपघातानंतर हे सोपस्कार पार पडल्यानंतर दुसरा अपघात होईपर्यंत अनेक विषय वाऱ्यावर सोडले जातात.

भारतीय रेल्वे हे जगातील सर्वात मोठ्या रेल्वे जाळ्यांपैकी एक आहे. अपघातानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारून मंत्रिपदाचा राजीनामा देणारे पूर्वी महान समजले जात. पण आजकाल नैतिकतेची व्याख्याही बदलल्याने तसे काही होताना दिसत नाही! तसेच राजीनामा देऊन काही साध्यही होत नाही. विद्यमान केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहेत. अशा प्रोफेशनल मंत्र्याच्या अखत्यारीतील रेल्वे यंत्रणा अधिक व्यावसायिक रीतीने चालण्यासाठी आ‌वश्यक सुधारणांचे धीट वारे रेल्वे खात्यात अद्यापही नीट घोंगावताना दिसत नाही. मुंबईच्या उपनगरी लोकल गाड्यांची धडक लागून दरवर्षी सहा हजारांपेक्षा जास्त प्रवासी मरण पावतात, तर अजून एक हजार प्रवासी या तुडुंब भरलेल्या लोकल गाड्यांच्या डब्यातून खाली पडून यमसदनी जातात. देशात रेल्वे अपघातांत मृत्युमुखी पडणाऱ्याची संख्या सर्वात जास्त महाराष्ट्रात आणि मग तामिळनाडू, पश्चिम बंगालमध्ये आहे.

हे अपघात वाढण्याच्या कारणांपैकी महत्त्वाचे कारण असे की, रेल्वे रुळांचे परीक्षण करणारे गँगमन, रेल्वे फाटकावरील रखवालदार यांच्या असंख्य जागा रिक्त असून त्या भरण्यास रेल्वे खात्याने कायम दिरंगाई केली. रेल्वे प्रवास व प्रवासी यांची सुरक्षा ज्यांच्यावर निर्भर असते असे घटकच दुबळे ठेवले गेले. ही कमतरता सुरेश प्रभू यांनी आधी दूर करायला हवी. सामाजिक जबाबदारीचे भान राखून रेल्वे यंत्रणा केंद्र सरकारतर्फे चालविली जात असली तरी ती कायम फायद्यात असणेही आवश्यक आहे. रेल्वे यंत्रणा सक्षमपणे चालावी म्हणून तिच्या खासगीकरणाचा पर्यायही उपलब्ध आहेच. स्वातंत्र्यानंतर ६९ वर्षांच्या कारकीर्दीत अधिक काळ सत्ता उपभोगणाऱ्या काँग्रेसने रेल्वे खात्याकडे फारसे लक्ष दिले नव्हते. काँग्रेसच्या अपयशांवर बोट ठेवून निवडून आलेल्या मोदी सरकारने व सुरेश प्रभूंसारख्या सुजाण मंत्र्याने आता या अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेल्वे सुरक्षा व या यंत्रणेची कार्यक्षमता यांना अधिक गती मिळण्यासाठी ठोस पावले उचलायला हवीत.

जगात सध्या रेल्वे, रस्त्यावरील प्रवासी वाहतूक यांच्यापेक्षा विमानप्रवास अधिक सुरक्षित झालेला आहे. विमानाला अपघात झाल्यानंतर त्यामागील कारणांचा शोध घेण्यासाठी एक मोठी यंत्रणा कामाला लागते. विमानातील यंत्रांमध्ये काही दोष आढळून आल्यास तो दूर करण्यासाठी विमान कंपन्या झटतात. विमानबांधणीचे तंत्रज्ञान, नेव्हिगेशन तसेच पायलटना दिले जाणारे प्रशिक्षण हे सारेच अत्याधुनिक झाल्याने व त्यात सातत्याने संशोधन होत असल्याने विमान अपघातांचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटले आहे. प्रगत देशांतही रेल्वेपेक्षा विमान प्रवास अधिक सुरक्षित मानला जातो. विमान प्रवासाच्या सुरक्षेसाठी जशी यंत्रणा आहे तशीच ती प्रगत देशांनी आपापल्या रेल्वेजाळ्याकरिता राबविली आहे. त्यामुळे एकूणच लोकसंख्या जरी कमी असली तरी प्रगत देशांतील रेल्वे अपघात भारत, चीनसारख्या देशांतील अपघातांपेक्षा कमीच आहेत. भारतात प्रवाशांनी खच्चून भरलेल्या रेल्वे डब्यांची रचनाही अपघातानंतर प्राणहानी वाढवण्यास कारणीभूत ठरत आहे. रेल्वे डब्यांची रचना कितीही आधुनिक केली तरी प्रवासी त्या डब्यांचे नानाप्रकारे नुकसान करतात. देशात दहशतवाद्यांच्या घातपाती कारवायांतूनही रेल्वे अपघात घडतात. हे सारे थांबवायचे असल्यास प्रवाशांनीही आवश्यक शिस्त अंगी बाणवली पाहिजे. त्याचबरोबर रेल्वे अपघातांची कारणे गुलदस्त्यात न ठेवता ती जनतेला कळावीत असा पारदर्शक कारभार रेल्वे खात्याने केला पाहिजे. नाहीतर पुखरायाच्या अपघाताचे कवित्व काही दिवस सुरू राहील व पुन्हा येरे माझ्या मागल्या अशी परिस्थिती येईल!
बातम्या आणखी आहेत...