आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सामान्यांचे शहाणपण घ्या (अग्रलेख)

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नोटाबंदीच्या मुद्द्यावरून संसदेसह विविध पातळ्यांवर मोदी सरकारला घेरण्याची रणनीती काँग्रेससह सर्व विरोधकांनी जाणीवपूर्वक आखली आहे. शिवसेनेसारख्या मित्रपक्षानेही विरोधकांच्या सुरात सूर मिसळण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेे आणखी काही दिवस तरी या विषयावरून देशांतर्गत राजकारण चांगलेच तापणार यात शंका नाही. नोटाबंदीचा मुद्दा प्रत्येकाशीच निगडित असल्याने तो चर्चेच्या केंद्रस्थानी राहणे स्वाभाविकच. कुठल्याही गोष्टीचे नाट्यीकरण करण्याचा जो दोष भारतीय मानसिकतेत आहे त्याच दिशेने हा विषयही नेला जात असल्याचे विरोधकांचा पवित्रा पाहता जाणवते. अर्थात, भाजप जरी आज विरोधात असता तरी या पक्षाचे वर्तन यापेक्षा वेगळे नसते. नोटांच्या विषयावर मतमतांतरे व्यक्त व्हायलाच हवीत, पण ती अर्थकारणाच्या अनुषंगाने असावीत. मुद्देसूद आणि तर्काधिष्ठित मांडणीद्वारे खोलात शिरून विषयाची मांडणी अपेक्षित असताना दुर्दैवाने त्याऐवजी विरोधासाठी विरोध असाच माहौल आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या नोटाबंदीच्या धाडसी निर्णयाला आज दोन आठवडे पूर्ण होत आहेत. या काळात नोटा बदलण्यासाठी वा खात्यांत पैसे भरण्या-काढण्यासाठी बँकांसमोर लागलेल्या रांगा सर्वाधिक चर्चेत आहेत. या घोषणेनंतर असे होणे अगदी स्वाभाविक होते. आता रांगा आटोक्यात येत असून येत्या काही दिवसांत स्थिती आणखी नियंत्रणात येईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. असे असताना दुसरीकडे विरोधकांकडून नोटबंदीचे राजकारण टिपेला पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हा निर्णय जाहीर होताच प्रादेशिक पक्षांकडून त्याला विरोध होईल, असा अंदाज होता. तो खरा ठरत आहे. अगोदर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी रस्त्यावर उतरल्या. त्यांची पाठराखण करण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पुढे आले. हा निर्णय त्वरित मागे घेतला नाही तर देशात बंडाळी घडवून आणण्याचा आततायी इशारा त्यांनी दिला. उभयतांच्या कर्कश राजकारणाचा प्रत्यय त्यातून पुन्हा एकदा आला. आता महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांनीही या निर्णयावर टीकेची झोड उठवायला सुरुवात केली आहे. केंद्रासह राज्यातील सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने नोटाबंदीविरोधात प्रथमपासूनच सूर आळवायला प्रारंभ केला होता.

उद्धव ठाकरे यांनी आक्रमक होत नोटाबंदीविरोधात लढ्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन समर्थकांना केले आहे. नोटाबंदीचा जाच काळ्या पैसेवाल्यांपेक्षा सामान्यांनाच होत असल्याचे उद्धव यांचे म्हणणे आहे. मात्र, या तात्कालिक जाचापेक्षाही मुंबई महापालिकेत वर्षानुवर्षे सत्ता असूनही साधी चांगल्या रस्त्यांची सुविधाही आपला पक्ष पुरवू न शकल्याने लोकांना होणारा सततचा जाच त्यांनी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सोयिस्कररीत्या नजरेआड केला आहे. असो. राज ठाकरे यांनीसुद्धा मोदींचा हा निर्णय म्हणजे दोन उंदीर मारण्यासाठी घर जाळून टाकण्याचा प्रकार असल्याचे सांगत त्यामुळे देश खड्ड्यात जाईल, अशी कठोर टीका केली आहे. ज्येष्ठ आणि जाणकार म्हटल्या जाणाऱ्या शरद पवारांनी तर त्याही पुढे जात प्रस्तुत निर्णय म्हणजे आर्थिक आणीबाणीच असल्याचे म्हटले आहे. देशाचा प्रमुखच जर हा देश गुन्हेगारांचा असल्याचे भासवत असेल तर ते खोटे सिद्ध करण्यासाठी सत्ता परिवर्तन करावे लागेल, सध्या जे चालू आहे त्यामुळे सामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे, असे सांगत पवारांनी त्याला पद्धतशीरपणे भावनिक मुलामा दिला आहे. छोट्या पक्षांचे असे सुरू असताना काँग्रेससारखा जुना आणि मोठा पक्षही या खेळात मागे नाही.

आपल्या विचाराच्या अर्थतज्ज्ञांची फौज उभी करून त्या माध्यमातून मोदी सरकारच्या निर्णयातील त्रुटींवर काँग्रेसने बोट ठेवायला हवे. तसे झाले तर सरकारलासुद्धा या त्रुटी भरून काढण्याचा निर्णय घ्यावा लागेल आणि त्यातून सकारात्मक संदेश जाईल. परंतु, त्याऐवजी राहुल गांधी यांनी थेट बँकांच्या रांगेत जाऊन लोकांना नोटाबदलाचा जाच कसा होत आहे त्याचे ‘फुटेज’ खाण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यासोबत ठरावीकच ‘मीडिया’ असल्याने हा प्रयत्न केविलवाण्या स्वरूपाचा भासला. एकुणात केजरीवाल असोत, उद्धव-राज असोत, पवार असोत की राहुल, या सगळ्यांचा भर आहे तो नाटकी बाजाच्या राजकारणावर. आर्थिक क्षेत्रासारख्या गुंतागुंतीच्या विषयावर अभ्यासपूर्ण मांडणी करून तो सामान्यांपर्यंत पोहोचवण्यापेक्षा अशी नौटंकी सोपी आणि सरावाची असल्याने संबंधितांनी तो मार्ग अवलंबला असावा. या उलट बँकांसमोरील रांगांतील बहुसंख्य लोक मात्र मोदींच्या निर्णयाच्या बाजूने असून त्यासाठी थोडासा त्रास सहन करावा लागणे त्यांनी गृहीत धरले आहे. सर्वसामान्यांमध्ये असलेले हे व्यावहारिक शहाणपण आणि संयम राजकारण्यांमध्ये नाहीच, हे या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
बातम्या आणखी आहेत...