आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख (अग्रलेख)

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारत-पाकिस्तान संबंध तणावाचे असताना पाकव्याप्त काश्मीरमध्ये आपल्या करिअरची महत्त्वाची वर्षे घालवलेले लेफ्ट. जनरल कमर जावेद बाजवा यांची पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख म्हणून झालेली नियुक्ती भारताच्या दृष्टीने विचार करण्याजोगी आहे. अत्यंत व्यावसायिक दृष्टिकोन असलेले बाजवा हे पाकिस्तानच्या पायदळातील बलुच या लष्करी रेजिमेंटची धुरा सांभाळणारे अधिकारी आहेत आणि २००३ पासून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत-पाकिस्तानदरम्यान ज्या घटना घडत आहेत त्याचे ते प्रत्यक्ष साक्षीदार आहेत. आजच्या राजकीय परिप्रेक्ष्यात शरीफ सरकारने कोणताही संघर्ष न करता बाजवा यांची लष्करप्रमुखपदी नेमणूक करून पाकिस्तानच्या अंतर्गत राजकारणात स्वत:चे स्थान अधिक मजबूत केल्याचे पाकिस्तानच्या मीडियाचे म्हणणे आहे. कारण विद्यमान लष्करप्रमुख राहिल शरीफ पदावरून पायउतार होताना नवाझ शरीफ सरकारला धोका पोहोचवू शकतात, अशा अटकळी मांडल्या जात होत्या. मात्र प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. राहिल शरीफ यांनी आपण आपला कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर निवृत्त होणार असल्याचे पूर्वी स्पष्ट केले होते व त्यानुसार कोणताही गोंधळ व संशयाचे वातावरण निर्माण न होता ते ३० नोव्हेंबरला निवृत्त होत आहेत. राहिल हे २० वर्षांनंतरचे पहिले असे लष्करप्रमुख आहेत की ज्यांनी मुदतीनंतर आपली सूत्रे खाली ठेवली, ही घटनाही चांगली म्हटली पाहिजे.

अन्य लष्करप्रमुखांना पाकिस्तानच्या राजकीय परिस्थितीचा अंदाज घेत मुदतवाढ देण्यात आली होती. दुसरी बाब अशी की, नवाझ शरीफ यांना लोकशाही मानणाऱ्या (त्यांच्या खुर्चीस धोका न पोहोचवणाऱ्या) पण पाकिस्तानची अंतर्गत सुरक्षा व दहशतवादाविरोधात लढणाऱ्या तज्ज्ञ लष्करी अधिकाऱ्याची गरज होती. बाजवा हे त्या दृष्टीने शरीफ यांच्या फायद्याचे आहेत. पाकिस्तानचे लष्कर व पाकिस्तानची लोकशाही यांच्यातील संघर्ष हा काही नवा नाही. परवेझ मुशर्रफ यांनी पाकिस्तानच्या लष्करप्रमुखपदी असताना पंतप्रधान नवाझ शरीफ यांची सत्ता उलथवून स्वत:च्या हातात देशाची सूत्रे घेतली होती व त्यानंतर पाकिस्तानचे राजकारण घुसळून निघाले होते. अत्यंत महत्प्रयासाने तेथे लोकशाही पुन्हा प्रस्थापित झाली व दोन सार्वत्रिक निवडणुका तेथे पार पडल्या. राहिल शरीफ यांची पूर्ण कारकीर्द ही तशी संयमाची होती. शरीफ सरकारशी संघर्ष टोकाचा जाऊ नये म्हणून त्यांनीही काळजी घेतली होती. तेच वातावरण कायम राहील या अपेक्षेने नवाझ शरीफ यांनी बाजवा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

बाजवा यांच्या अनुभवाचा फायदा ताणलेल्या अफगाणिस्तान-पाकिस्तान संबंधांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी होणार आहे. पण चीन व रशियाशी संबंध अधिक दृढ करण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली जाऊ शकते. बाजवा यांच्या नियुक्तीमागे आणखी एक कारण सांगितले जातेय ते हे की, पाकिस्तानच्या उत्तरेकडील आदिवासी भागात तालिबान टोळ्यांनी पुन्हा आपला जम बसवण्यास सुरुवात केली आहे. काही वर्षांपूर्वी पाकिस्तानच्या लष्कराने या टोळ्यांच्या विरोधात ‘जर्ब-ए-अज्ब’ नावाची मोहीम उघडून दहशतवाद्यांचे जाळे उद्ध्वस्त केले होते. पण आता पुन्हा परिस्थिती चिघळू लागली आहे. एकीकडे अफगाणिस्तानची सीमा व दुसरीकडे भारताची सीमा अशा दोन्ही सीमांवरची परिस्थिती हाताळण्याचे काम बाजवा यांना करावे लागणार आहे.

बाजवा यांची नियुक्ती पाकिस्तानच्या लोकशाहीएवढी भारताच्या दृष्टीनेही महत्त्वाची आहे. त्याचे कारण भारतात मोदी सरकार सत्तेवर येऊन अडीच वर्षे झाली आहेत. या कालावधीत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकपुरस्कृत दहशतवादी गटांच्या कारवायांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. जम्मू-काश्मीरच्या राजकारणावरही पाकिस्तानचा प्रभाव पडत आहे. ही भारतासाठी चिंताजनक बाब आहे. काही दिवसांपूर्वी भारताच्या लष्कराने पाकिस्तानच्या वाढत्या दहशतवादी कारवाया पाहून सीमापार जाऊन पाकिस्तानच्या चौक्या उद््ध्वस्त केल्या होत्या. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये रोज चकमकी झडत आहेत. बाजवा यांची बहुतांश कारकीर्द प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीकची परिस्थिती हाताळण्यात गेल्यामुळे त्यांचा अनुभव पाक लष्कराला कामी येऊ शकतो. कदाचित भारत-पाकिस्तान संबंधांमधील तणाव कमीही होऊ शकतो किंवा पाकिस्तान आपली रणनीतीही बदलू शकते. भारताचे माजी लष्करप्रमुख बिक्रम सिंह यांनी बाजवा यांच्या नेमणुकीनंतर भारतीय लष्कराने सावध राहावे असे म्हटले आहे, हासुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण काँगोमधील यादवी हाताळण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या शांतिसेनेत बिक्रम सिंह यांनी काही काळ काम केले होते व त्यांच्या हाताखाली बाजवा होते. बाजवा यांचे यादवी हाताळण्याचे कौशल्य उत्तम होते. पण ते काम संयुक्त राष्ट्राचे होते, आता परिस्थिती बदलली असून बाजवा यांच्यासाठी देशहिताला प्राधान्य असेल याकडे बिक्रम सिंह यांनी लक्ष वेधले आहे. एकुणात भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये शांतता प्रस्थापित होण्यात ही नवी लष्करनियुक्ती महत्त्वाची ठरावी, अशी अपेक्षा आहे.
बातम्या आणखी आहेत...