आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाषिक अभिवृद्धीसाठी... (अग्रलेख)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी सारस्वतांच्या महाकुंभास यावर्षी डाेंबिवलीसारख्या उपनगरात प्रारंभ झाला. यानिमित्ताने महामंडळाच्या साहित्य संमेलनाचे विकेंद्रीकरण हाेऊ लागले अाहे, ही चांगली बाब ठरावी. मात्र एरवी साहित्य संमेलनांमध्ये अाेसंडणाऱ्या युवा पिढीने पाठ फिरवली असली तरी शालेय विद्यार्थ्यांची गर्दी लक्षवेधी ठरली. संमेलनाध्यक्ष पदावरून बाेलताना डाॅ. अक्षयकुमार काळे यांनी मराठी भाषेची अभिवृद्धी अाणि मराठी संस्कृतीच्या भवितव्याचा उहापाेह केला. अर्थातच प्रत्येक संमेलनात यावर चर्चा, वाद हाेतच राहिले अाहेत; त्यात नवे काय? असा प्रश्न काहींना पडू शकताे. 

एक मात्र खरे की, मराठी संस्कृतीच्या भवितव्याची काळजी वाहण्यापेक्षादेखील भाषिक अभिवृद्धीसाठी प्रयत्न करणे अपरिहार्य, किंबहुना काळाची गरज अाहे. त्यासाठी वैचारिक मंथन हाेणे अत्यावश्यक ठरते, कारण ती एक सतत चालणारी प्रक्रिया अाहे. या निरंतर सातत्यातूनच मराठी मने जागरूक हाेतील अाणि उत्स्फूर्त कृतिपूर्णतेकडे वळतील, असे अपेक्षित अाहे. डाॅ. काळे यांच्या मते, ‘अाम्हाला अामच्या भाषेचा, संस्कृतीचा विचार एकूणच भारतीय अाणि वैश्विक संस्कृतीशी जसा जाेडून करावा लागताे तसाच हिंदी अाणि इंग्रजीचादेखील विचार क्रमप्राप्त ठरताे. मुळात मराठी संस्कृती ही वैश्विक संस्कृतीचा अपरिहार्य भाग अाहे. सद्य:स्थितीत आम्हाला इंग्रजीचे अवास्तव प्राबल्य नको वाटत असले तरी इंग्रजीतून शिकलाे नाही तर जगण्याचेच वांधे होतील, असा भयगंड रुजला अाहे. परिणामी नैसर्गिक सहजता लाेप पावते अाहे.

भाषिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न पिढी तयार हाेण्याएेवजी भौतिक साधनप्राप्तीची क्षमता असणारी पिढी निर्माण हाेत असल्यामुळे मराठी भाषा, मराठी संस्कृती यांच्या संवर्धनासाठी हाेत असलेले प्रयत्न ताेकडे ठरत अाहेत. अामचा भाषाभिमान हा स्वतंत्र अाणि परिपक्व मनाची उत्पत्ती असायला हवा तरच तिची अभिवृद्धी हाेऊ शकते. काळाच्या अाेघात भाषाशुद्धीची कल्पना अाता कालबाह्य ठरते अाहे. शब्दसंपत्ती ही विनिमय प्रक्रियेत अाणून भाषा विकसित करणे शक्य अाहे. हल्लीच्या इंटरनेटच्या युगात तर वेगाने वाढत असलेली वैश्विक ज्ञानसमृद्धी मराठीत कशी अाणायची, हा गंभीर प्रश्न अाहे. 

ज्ञानभाषा अाणि परिभाषेची निर्मिती हाेत असली तरी ज्ञानसंक्रमणात यशस्वी ठरते का? त्यासाठी ज्ञानभाषा साहित्याप्रमाणेच शैक्षणिक प्रवाहात अाणण्याची गरज अाहे. यावर या ९० व्या साहित्य संमेलनास उपस्थित सारस्वतांनी चिंतन करायला हवे. खरे तर बहुजन समाजाला किमान परिचयाचे असेच शब्द ज्ञानभाषेत हवेत, मग ते काेणत्याही भाषेतून, बाेलीतून अालेले का असेनात! माधव ज्युलियनांची ‘मराठी राजभाषा’ नसल्याची खंत मिटली असली तरी ज्ञानभाषेचा दर्जा मिळण्यासाठी तसेच स्थैर्य अाणि अभिवृद्धीसाठी सातत्याने प्रामाणिक प्रयत्न व्हायला हवेत, अशी माफक अपेक्षा अाहे.
 
मराठी भाषेतील लेखनाचा संख्यात्मक विकास हाेत असला तरी काही अपवाद वगळता गुणात्मकदृष्ट्या साहित्यिक महत्तेची अर्हता त्यांना प्राप्त करता अालेली दिसत नाही. मराठी साहित्याला जागतिक सांस्कृतिक क्षेत्रात स्थान का मिळत नाही? यासंदर्भात बा. सी. मर्ढेकरांनी जे विवेचन केले त्यावर या संमेलनात मंथन जरूर व्हायला हवे. ज्ञानेश्वर, तुकारामांसारखे अवघे विश्व जाणणाऱ्या, अापल्या प्रतिभा सामर्थ्याने ते उजळवणाऱ्या श्रेष्ठ लेखकांची अपेक्षा माय मराठीला असणे गैर नाही. सूक्ष्म सामाजिक भान असलेले भालचंद्र नेमाडे, श्याम मनाेहर यांसारखे लेखक ‘नाेबेल’च्या ताेडीचे अाहेत. त्यांचे साहित्य सर्व भारतीय भाषांसह जगभर इंग्रजी, युराेपीय भाषेतून पाेहाेचवण्यासाठी राज्य सरकारने प्रकल्प हाती घ्यावा, हा विष्णू खरे यांचा मुद्दा कालसापेक्ष ठरावा. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठी साहित्यातील वैचारिक क्रांतीत वैश्विक झेप घेण्याची ताकद असल्याचे स्पष्ट करत सारस्वतांना अाश्वस्त केले. ही बाब निश्चितच अानंददायी ठरावी. 

मराठी लेखक मुळातच अार्ष महाकाव्याला बळी पडत अाला. त्यात ज्ञानेश्वरांसारखाच एखादा जाे ज्ञानेश्वरीनंतर अमृतानुभव लिहिताे; तर भावनाविकारांच्या सूक्ष्म अभ्यासातून, अभिजात संवेदनशीलतेने पुराणकालीन सामाजिक स्थिती, जीवनमूल्यांचा नव्याने अन्वयार्थ मांडणाऱ्या दुर्गा भागवत, इरावती कर्वे अपवादच ठरतात. एखाद्या भाषेत निर्माण हाेणारी श्रेष्ठ साहित्यकृती, भाषेची गुणात्मकता अाणि निरामयपणे घेतला जाणारा रसास्वाद यातून श्रेष्ठ वाङ््मयीन संस्कृती अाकार घेत असते. मात्र मुद्दा असा अाहे की, अापल्या समाजातील जातीय, धार्मिक, प्रादेशिक अाणि लिंग, वर्ण, वर्गभेद अाडमार्गाने साहित्य प्रांतात घुसखाेरी करत असतील, पूर्वद्वेष अाणि वैमनस्याची बीजे पेरत असतील तर ते साहित्य दुरभिमानाचे प्रतिनिधित्व नाही का करणार? जाती-भेदाच्या संकुचित सीमा जर अाेलांडता येत नसतील तर श्रेष्ठ साहित्याची, मराठीच्या संवर्धन अाणि भाषिक अभिवृद्धीची अपेक्षा तरी कशी बाळगायची?
बातम्या आणखी आहेत...