आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Editorial About Advani, MM Joshi Axed From BJP Parliamentary Board India, Divya Marathi

मार्गदर्शकांचा वानप्रस्थ (अग्रलेख)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अडवाणी, जोशी यांना ‘सन्मानाने निवृत्ती’ पत्करावी लागण्यात धक्कादायक काहीच नाही. असे झाले नसते तरच आश्चर्य वाटले असते. लोकसभेत पूर्ण बहुमत मिळताच मोदींनी सरकार व त्यानंतर पक्षावर पकड बसवण्यास सुरुवात केली. अमित शहांची नेमणूक हे त्यातील पहिले पाऊल. अडवाणींच्या गच्छंतीमुळे हे नियंत्रण पूर्ण झाले. अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांना मार्गदर्शक मंडळात म्हणजेच ‘राजकीय वृद्धाश्रमात’ नेऊन बसवण्यात आले. मोदी व राजनाथही तेथे असले तरी या दोघांना पक्षावर पकड ठेवणाऱ्या इतर समित्यांमध्येही जा-ये करण्याची मुभा आहे. अडवाणी व जोशींना तशी नाही. वृद्धाश्रमात बसून रामनाम घेण्याव्यतिरिक्त आता त्यांना काम नाही. मात्र, याबद्दल या दोघांनाही तक्रार करण्यास जागा नाही. ही वेळ त्यांनी स्वत:वर ओढवून घेतली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विश्वास संपादन करून मोदी यांनी पक्षाकडे मोर्चा वळवला तेव्हापासून अडवाणींचा मोदींना विरोध होता. पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मोदींचे नाव येऊ नये यासाठी अडवाणींनी आटापिटा केला. अडवाणी व त्यांच्या कंपूने मोदींना अडचणीत आणण्याचे नाना प्रयोग केले; पण त्यामुळे पक्ष कार्यकर्ते व जनतेच्या मनातून ते उतरत गेले. पंतप्रधान होण्याचे स्वप्न अडवाणींना २००९ मध्ये साधले नाही. त्यानंतर त्यांची लोकप्रियता ओसरत गेली. देशातील बदलते वारे व मोदींना मिळणारा जनसामान्यांचा पाठिंबा अडवाणींनी लक्षातच घेतला नाही. तसा तो घेतला असता तर आजही पक्षात त्यांचे वजन राहिले असते. निवडणूक प्रचारातील मोदींचा झंझावात पाहता त्याच वेळी अडवाणींनी निवडणुकीतून माघार घेणे इष्ट ठरले असते. पण मोदींना बहुमत मिळणार नाही आणि अन्य पक्षांकडून आपले नाव सुचवले जाईल या आशेवर अडवाणी राहिले. जनमताचा त्यांचा अंदाज पुरता चुकला. मोदी पंतप्रधान झाल्यावरही अडवाणींनी प्रशंसापर उद््गार कधी काढले नाहीत. पक्षात वाजपेयींची जागा अडवाणींना मिळवता आली नाही. राजकारण करत असतानाच राजकारणाच्या पलीकडे जाऊन स्वत:चे स्थान उंचावण्याचे कसब वाजपेयींकडे होते. अडवाणींना ते कधीही साधले नाही. उलट इंदिरा गांधींना विरोध करणाऱ्या मोरारजी व अन्य काँग्रेस नेत्यांप्रमाणे अडवाणी वागत राहिले. इंदिरा गांधींसारखी कार्यशैली असणाऱ्या मोदींनी मोरारजींप्रमाणेच अडवाणींना अडगळीत टाकले.

भाजपमधील हे सत्तासंक्रमण आहे व अडवाणी अडगळीत जाण्याइतके ते साधे नसून पक्षात काही आमूलाग्र बदल होत असल्याचे हे संकेत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजप हे जास्तीत जास्त एकरूप होत असणे हा यातील महत्त्वाचा बदल आहे. १९८४ च्या निवडणुकीनंतर भाजप फारच अडचणीत सापडला होता. रथयात्रेची मोहीम आखून अडवाणींनी पक्षाला पुन्हा लोकांत स्थान मिळवून दिले. मात्र, पक्षाला व्यापक चेहरा मिळाला तो वाजपेयींमुळे. अन्य पक्षांच्या पुढाऱ्यांना आकर्षित करण्याची क्षमता वाजपेयींकडे होती व मुत्सद्दी म्हणून आंतरराष्ट्रीय ख्यातीही होती. वाजपेयी-अडवाणी यांच्यामुळे पक्षाला सत्ता मिळाली असली तरी संघनिष्ठा सत्तास्थानी आली नाही. किंबहुना, या दोघांमुळे ती पातळ झाली, अशी तक्रार संघातून होऊ लागली. भाजपवर हिंदुत्वाचा पक्का रंग बसवू देण्यास वाजपेयी व अडवाणी तयार नव्हते. वाजपेयींना हात लावण्याची संघाची हिंमत नव्हती, पण अडवाणींना जिना प्रकरणात संघाचा प्रसाद मिळाला, तरीही मोदी सत्तेवर येईपर्यंत भाजपला उदार, पुरोगामी व उच्चभ्रूंच्या वर्गात मान्य होईल, असा चेहरा देण्याची धडपड अडवाणींनी केली. एकेकाळी अडवाणींवर कठोर प्रहार करणारे दिल्लीतील पत्रकार मोदी पुढे येताच अडवाणींबाबत सौम्य होऊ लागले, ते या धडपडीमुळे. संघाची हिंदुत्वनिष्ठ कडवी चौकट अधिक सर्वसमावेशक केल्याशिवाय पंतप्रधानपद मिळणार नाही, असा अडवाणींचा दृष्टिकोन होता, पण असे करताना ते भाजपचे व पर्यायाने संघ परिवाराचे वेगळेपण गमावून बसत होते. भारतातील उच्चभ्रू व तथाकथित सर्वमान्य बुद्धिजीवींना मान्य असलेली वैचारिक चौकट पूर्णपणे नाकारण्याची हिंमत दाखवणारा नेता संघाला हवा होता. मोदींमुळे तो मिळाला. अडवाणींबाबत संघाचा अपेक्षाभंग झाल्याने त्यांना वृद्धाश्रमात पाठवण्यात आले. रथयात्रेच्या वेळी ज्या जागेवर अडवाणी होते, तेथे आज मोदी आहेत. त्या वेळी भाजपला बहुमत मिळाले असते तर वाजपेयींची जी स्थिती झाली असती ती आज मोदींनी अडवाणींची करून ठेवली आहे. वाजपेयींचा मान राखत अडवाणींनीही त्यांना वृद्धाश्रमातच पाठवले असते. उपपंतप्रधानपद स्वीकारून तशी सुरुवातही झाली होती; पण ते काम फसले. अडवाणींचे वय पाहता हिंदू संस्कृतीनुसार त्यांना संन्यासाश्रमाची वाट धरायला हवी होती. त्यांनी वेळीच तसे न केल्याने संघाने त्यांना वानप्रस्थी पाठवले. त्याबद्दल तक्रार असण्याचे कारण नाही.