आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Editorial About AFGHANISTAN Nato Issue Divya Marathi

मध्य आशियातील धुमसते राजकारण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या वर्षाच्या अखेरीस अफगाणिस्तानातून नाटोच्या फौजा परतत आहेत. त्याच प्रक्रियेचा भाग म्हणून किरगिझस्तानातील मानस येथील हवाई तळ अमेरिकेने मोकळा केला आहे.

अफगाणिस्तानातील नाटोच्या तालिबानविरोधी लढ्यात या तळाला अनन्यसाधारण महत्त्व होते. त्यानंतर मानसबरोबरच किरगिझस्तानातील अन्य विमानतळांचा विकास करण्याचा करार ‘रोसनेफ्त’ या रशियन कंपनीने केला आहे. त्याद्वारे रशियाने सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या या क्षेत्रातील आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. रशिया आणि अमेरिका यांच्यातील सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर या घटनाक्रमाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. पुढे किरगिझस्तानात हवाई वाहतूक केंद्र (एव्हिएशन हब) सुरू करण्याचा रशियाचा प्रयत्न आहे. तसे झाल्यास भारतालाही त्यापासून बराच लाभ मिळू शकतो.

किरगिझ सरकारने या सुविधांच्या विकासासाठी परकीय गुंतवणूकदारांना आमंत्रित केले आहे. त्यानुसार रशियाच्या ‘रोसनेफ्त’ या खनिज तेल उत्पादन क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने किरगिझस्तानातील दहा विमानतळांचा विकास करून त्यांचा वापर करण्यासंबंधीचा करार केला आहे. या वापरापोटी किरगिझस्तानला दरवर्षी एक अब्ज डॉलर भाडेही दिले जाणार आहे. परिणामी सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या या देशातील प्रमुख विमानतळांवर रशियाला नियंत्रण मिळेल. ‘रोसनेफ्त’ किरगिझस्तानातील विमानतळांचा विकास करून त्यातील मानस विमानतळाला आशिया आणि युरोप यांच्यातील हवाई वाहतूक मार्गावरील मध्यवर्ती सुविधा केंद्र (एव्हिएशन हब) बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. तेथे युरोप आणि आशियादरम्यान जाणाऱ्या प्रवासी व मालवाहू विमानांना आवश्यक त्या अत्याधुनिक सुविधा पुरवल्या जातील. युरोप आणि आशियाला जवळच्या मार्गाने जोडणाऱ्या सेतूची भूमिका बजावण्यासाठी रशिया अतिशय उत्सुक आहे. त्यासाठी रशियाने देशांतर्गत रस्ते आणि विशेषकरून सक्षम लोहमार्गांचे जाळे विणण्यास सुरुवात केली आहे. आज युरोप आणि आशिया यांच्यातील व्यापार प्रामुख्याने भूमध्य सागर, सुएझ कालवा, हिंदी महासागर आणि दक्षिण चीन सागर या मार्गे चालतो. पृथ्वीच्या वाढत्या तापमानामुळे बर्फ वितळू लागल्याने नजीकच्या काळात उत्तर ध्रुवीय महासागरही जलवाहतुकीसाठी खुला होईल. तरीही हे मार्ग वेळखाऊ असल्याने ट्रान्स सैबेरियन लोहमार्गाला नवे मार्ग संलग्न करून पश्चिम, दक्षिण, आग्नेय, तसेच पूर्व आशिया आणि युरोप यांच्या दरम्यानचा व्यापार आपल्या भूप्रदेशावरून जाऊ देण्यास रशिया इच्छुक आहे. यामुळे वेळेची बचत होतानाच रशियालाही ट्रान्झिट शुल्क मिळेल.

अठराव्या शतकाच्या उत्तरार्धापासून मध्य आशियाई क्षेत्रावर रशियाचा प्रभाव राहिला आहे. तो प्रभाव टिकवून ठेवण्यासाठी किरगिझस्तानशी नुकत्याच केलेल्या कराराचा रशियाला उपयोग होणार आहे. ११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर अमेरिकेने आंतरराष्ट्रीय दहशतवादाविरोधात लढा सुरू केला आणि अफगाणिस्तानातील तालिबानी सत्ता आणि अल-कायदाचे जाळे नष्ट करण्यासाठी मध्य आशियात किरगिझस्तान आणि उझबेकिस्तानात प्रामुख्याने तळ उभारले. अलीकडे उझबेकिस्तानमधील तळ बंद करण्यात आले आहेत. जर्मनीतील रामस्टाइन येथील नाटोच्या तळावरून मानस येथील तळावर विमानाने रसद आणून ती पुढे अफगाणिस्तानात लढत असलेल्या नाटोच्या फौजांना पुरविली जात असे. खैबर खिंडीतून येणाऱ्या मदतीवर पाकिस्तानी तालिबानींकडून सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांमुळे तो मार्ग अतिशय धोकादायक झाला आहे. या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानातील नाटोच्या फौजांना मदत पुरविण्यासाठी मानसचे विमानतळ हा महत्त्वाचा पर्याय होता.
या विमानतळाच्या वापराचा करार जुलै २०१४ मध्ये संपला आहे. मॉस्कोला अनुकूल असलेले अल्माझबेक आतमबायेव्ह हे सध्या किरगिझस्तानचे राष्ट्रपती आहेत. करार संपल्यावर अमेरिकेने मानसमधून परत जावे, असे आतमबायेव यांनी पदभार स्वीकारल्याबरोबर स्पष्ट केले होते. या वर्षी अफगाणिस्तानातून अमेरिकेचे सैन्य माघार घेत आहे. त्यांना सुरक्षित बाहेर जाण्याच्या दृष्टीनेही मानसच्या तळाचे अनन्यसाधारण महत्त्व होते. अफगाणिस्तानची मध्य आशियाशी भिडलेली सीमा, रशिया आणि चीनचे तेथे गुंतलेले हितसंबंध आणि वाढता प्रभाव, तसेच अल-कायदाच्या कारवाया वाढण्याची शक्यता गृहीत धरून अमेरिका तेथून पूर्णपणे माघार घेईल, असे वाटत नाही. या क्षेत्रात प्रभाव टिकवून ठेवण्यासाठी अमेरिकेचे लष्करी अस्तित्व तेथे राहण्याची शक्यता आहे. आज युक्रेन आणि क्रिमियाच्या मुद्द्यावरून मॉस्को आणि वॉशिंग्टन यांच्यात वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही शक्यता अधिक वाढली आहे. परिणामी भविष्यात मध्य आशियाई देशांमधील नेतृत्वांच्या विरोधात लोकप्रिय क्रांत्यांना पाश्चात्त्यांची सहानुभूती मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा धोका टाळण्यासाठी रशिया प्रयत्नशील आहे.
अमेरिकेच्या माघारीनंतर अफगाणिस्तानात तालिबानी शक्ती पुन्हा उचल खाण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे. तसे झाल्यास मध्य, पश्चिम आणि दक्षिण आशियाबरोबरच रशिया आणि चीनच्या सुरक्षेसमोर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. त्यामुळे मध्य आशियात ‘शांघाय सहकार्य संघटने’च्या माध्यमातून चीनने आपला प्रभाव बराच वाढवलेला आहे. जगातील दुसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीनला आपल्या विकासाचा वेग राखून ठेवण्यासाठी ऊर्जा तसेच खनिज साधनांची नितांत गरज आहे. मध्य आशिया या दोन्ही बाबतीत समृद्ध असल्याचे मानले जाते. मध्य आशियाई क्षेत्राशी असलेल्या भौगोलिक संलग्नतेमुळे या क्षेत्रातील प्रचंड खनिज साठ्यांची सहजतेने आयात करणे चीनला शक्य होत आहे. मध्य आशियाई देशांना विविध प्रकारची मदत देऊन तेथील नैसर्गिक साधनसंपत्तीचे उत्खनन करण्यास चीनने सुरुवात केली आहे. मात्र चीनचा या क्षेत्रातील प्रभाव ठरावीक मर्यादेच्या पलीकडे वाढणे रशियाला आपल्या राष्ट्रहितांवर प्रतिकूल परिणाम करेल, असे वाटते. म्हणूनच चीनचाही प्रभाव मर्यादेतच राहावा, याचाही मॉस्कोकडून प्रयत्न होत आहे. किरगिझस्तानातील मानस विमानतळावर हवाई वाहतूक केंद्र सुरू करण्याच्या रशियाच्या निर्णयाचा भारतालाही लाभ होऊ शकतो. सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या मध्य आशियाई क्षेत्राशी जोडले जाण्याचा आणखी एक पर्याय या निमित्ताने भारताला उपलब्ध होऊ शकतो. आज भारत आणि किरगिझस्तानमध्ये द्विपक्षीय व्यापार ३.७१ कोटी डॉलर आहे. त्यात आणखी वाढ होण्यासाठी बराच वाव आहे. किरगिझस्तानच्या उत्तरेला वसलेल्या कझाकिस्तानशी भारताचे ऊर्जा, खनिज संपत्ती, सांस्कृतिक, आर्थिक अशा विविध क्षेत्रांमध्ये संबंध विकसित होत आहेत. त्याबरोबर किरगिझस्तानच्या दक्षिणेला वसलेल्या ताजिकिस्तानशी भारताला सामरिक संबंध विकसित करण्यातही या हवाई सुविधा केंद्राची मदत होऊ शकते. मध्य आशियात पायाभूत सुविधांचा विकास करण्यात भारत सक्रियपणे भाग घेत आहे. अफगाणिस्तानच्या उत्तरेला वसलेल्या ताजिकिस्तानशी भारताने लष्करी क्षेत्रात संबंध विकसित करत तेथे ऐनी हवाईतळाचा विकास केला आहे. त्या हवाई तळावर आपली लढाऊ विमाने व हेलिकॉप्टर तैनात करण्याचा भारताचा प्रयत्न आहे. अफगाणिस्तानातील भारतविरोधी कारवायांवर नियंत्रण ठेवतानाच पाकिस्तानवरही दबाव ठेवण्यासाठी भारताला या तळाची मदत होणार आहे. सध्या त्या तळावर भारतीय जवान ताजिक सैनिकांना प्रशिक्षण देत आहेत. त्यामुळे किरगिझस्तानच्या मानस विमानतळावरील हबचा भारताला व्यापाराच्या तसेच आपल्या सामरिक हितसंबंधांच्या संरक्षणाच्या दृष्टीनेही उपयोग होऊ शकतो. आज भारताला रशिया आणि युरोपला जवळच्या व्यापारीमार्गाने जोडण्यासाठी इराणमार्गे ‘उत्तर-दक्षिण वाहतूक मार्ग’ विकसित केला जात आहे. त्यालाच इराणमधील छाबार बंदराशी महामार्ग आणि लोहमार्गांनी जोडण्यात येणार असून त्यांची एक शाखा अफगाणिस्तान आणि मध्य आशियाकडेही जाणार आहे. त्याला आणखी एक पर्याय म्हणून किरगिझस्तानशी सहकार्य वाढवून मानस येथील हवाई सुविधा केंद्राचा भारत निर्माण लाभ उठवू शकतो.

(आंतरराष्ट्रीय सामरिक संबंधांचे अभ्यासक)
Parag12951@gmail.com