आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अग्निझेप! (अग्रलेख)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पहिले, दुसरे महायुद्ध असो वा शीतयुद्ध किंवा शीतयुद्धानंतरच्या कालखंडामध्ये एक गोष्ट सिद्ध झाली आहे. ती म्हणजे जे राष्ट्र विज्ञान-तंत्रज्ञानाच्या संशोधनात अग्रेसर आहे, ज्या राष्ट्राची अर्थव्यवस्था अत्यंत मजबूत आहे तसेच शस्त्रास्त्रे व संरक्षण सामर्थ्याच्या दृष्टीने जे राष्ट्र प्रबळ आहे, त्या देशाकडे साहजिकच जगाचे पुढारपण येते. या गोष्टींमुळेच अमेरिकेकडे जगाचे पुढारपण चालून गेले. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या दौर्‍यानंतर काही दिवसांतच म्हणजे शनिवारी भारताने स्वदेशी बनावटीच्या अण्वस्त्रवाहू अग्नी-५ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी पार पाडली. पाच हजार किलोमीटरचा टप्पा गाठू शकणार्‍या अग्नी-५च्या टप्प्यात चीनची महत्त्वाची शहरे तसेच प्रसंगी युरोपलाही लक्ष्य करण्याचे सामर्थ्य आहे. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ)चे मावळते संचालक अविनाश चंदर हे अग्नी क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतावर शेजारी राष्ट्रांशी युद्धाचे पाच प्रसंग आले. चीनशी झालेले युद्ध वगळता भारताची बाकीची युद्धे पाकिस्तानशी झाली असून त्यात भारताला विजय प्राप्त झाला आहे.

पाकिस्तान हा भारतापेक्षा संरक्षणदृष्ट्या पहिल्यापासूनच कमकुवत होता. एका बाजूला चीन, कोरियाशी संधान बांधून पाकने अणुबॉम्बचे तंत्रज्ञान तस्करीच्या मार्गाने हस्तगत केले, तर दुसर्‍या बाजूला अमेरिकेकडून प्रचंड मदत मिळवून लष्कर अद्ययावत करण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. शेजारी राष्ट्रांच्या कुरापतखोर वर्तनाकडे भारत कानाडोळा करू शकत नाही. भारतात स्वदेशी बनावटीची शस्त्रास्त्रे बनवण्याचे प्रमाण अल्प आहे. भारतीय लष्कराला लागणार्‍या संरक्षण सामग्रीपैकी ७० टक्के सामग्री इतर देशांतून आयात केली जाते. त्यामुळेच अमेरिकेसारख्या मोठ्या शस्त्रास्त्र उत्पादक देशांना भारताची बाजारपेठ कायम खुणावत असते. जागतिक स्तरावरील अद्ययावत शस्त्रास्त्रांच्या तोडीची किंवा त्याहून सरस अशी शस्त्रास्त्रे जर भारतातच निर्माण होऊ लागली, तर त्यासाठी होणारा खर्च व शस्त्रात्रांचे सुटे भाग, देखभालीचा खर्च हे सारे देशाच्या आवाक्यात राहू शकेल.

डीआरडीओ जरी शस्त्रास्त्रनिर्मितीच्या संशोधनात व्यग्र असली तरी तिच्या कामाचा झपाटा हा काळाच्या गतीनुुसार वेगवान नव्हता. त्यामुळेच डीआरडीओचे संचालक अविनाश चंदर यांना त्या पदावरून दूर करून तेथे तुलनेने तरुण व्यक्तीची नेमणूक करण्याचे मोदी सरकारने ठरवले आहे. ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेऊनच अग्नी-५च्या यशस्वी चाचणीकडे पाहावे लागणार आहे. चंदर यांच्या संकल्पनेतून स्वदेशी बनावटीच्या अग्नी क्षेपणास्त्र विकासाचा कार्यक्रम साकारला गेला. दक्षिण आशियाच्या राजकारणाचा विचार केला तर भारतासाठी पाकिस्तान ही कायमची डोकेदुखी बनले आहे. चीन पाकला भारताविरोधात नेहमी फूस लावत असतो.

पाकिस्तानला जरब बसावी म्हणून त्या देशाचा नकाशा लक्षात घेऊन अग्नी-१, अग्नी-२, अग्नी-३ ही क्षेपणास्त्रे विकसित करण्यात आली होती. अग्नी-५ हे देशातील सर्वाधिक क्षमतेचे क्षेपणास्त्र आहे. जमिनीवरून जमिनीवर मारा करण्यासाठी वापरण्यात येणार्‍या अग्नी-५ क्षेपणास्त्राचा लष्करात समावेश झाल्यानंतर भारताची अण्वस्त्रविरोधी क्षमता कित्येक पटींनी वाढणार आहे. चीनने भारतावर आक्रमण केले तेव्हा भारतीय लष्कराकडे साधनसामग्रीचा मोठा तुटवडा होता. लष्कर अद्ययावत न राखल्याने आणि संरक्षण व्यवस्थेविषयी अनास्था दाखवल्यानेच भारताचा चीनबरोबरच्या युद्धात पराभव झाला होता. नेहरूंच्या कारकीर्दीतील ही मोठी घोडचूक इंदिरा गांधी यांनी आपल्या कारकीर्दीत कधीच केली नाही. इंदिरा गांधींनी १९८०च्या दशकाच्या प्रारंभी भारतात क्षेपणास्त्रांची निर्मिती करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले होते. कालांतराने राष्ट्रपती बनलेले डॉ. अब्दुल कलाम यांचाही स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमात महत्त्वाचा सहभाग होता. इस्रो, डीआरडीओ व सार्वजनिक क्षेत्रातील संरक्षण उत्पादन समूहांच्या सहकार्यातून पृथ्वी, त्रिशूल, आकाश, नाग, अग्नी, शौर्य, ब्रह्मोस, अस्त्र, हेलिना, प्रहार अशा क्षेपणास्त्रांच्या विकासाचा कार्यक्रम राबवणे सुरू झाले.

जगात कुठेही युद्ध होऊ नये, सर्वत्र शांतता, सलोख्याचे वातावरण असावे हा विचार आदर्शवादी असला तरी प्रत्यक्ष व्यवहारात तसे घडत नसते. जगात सध्या विविध ठिकाणी २१ हून अधिक युद्धे सुरू असून त्यामागे धार्मिक, आर्थिक, राजकीय अशी अनेक कारणे आहेत. संरक्षणदृष्ट्या अत्यंत प्रबळ असलेल्या राष्ट्रावर दुसरी राष्ट्रे सहसा आक्रमण करण्यास धजावत नाहीत. दुर्बल राष्ट्राला स्वत:चा आवाज नसतो. हे संयुक्त राष्ट्रांच्या आजवरच्या कामकाजातूनही जगासमोर वारंवार उघड झाले आहे. ओबामा यांच्या दौर्‍यादरम्यान भारत व अमेरिकेमध्ये अणुकरारातील सर्व अडथळे जसे दूर सारले गेले तसेच संरक्षण उत्पादने निर्मितीसंदर्भातही सहकार्य वाढवण्यावर एकमत झाले. या घडामोडी व अग्नी-५ची यशस्वी चाचणी यांची योग्य सांगड घातली तरच भारताच्या संरक्षण सज्जतेमागील धडपडीचे गमक लक्षात येऊ शकेल.