आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Editorial About Ban On Liquor At Chandrapur, Divyamarathi.com

झिंगलेल्या यमदूतांना चाप (अग्रलेख)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘काठोकाठ भरू द्या प्याला, फेस भराभर उसळू द्या’ ही तल्लफ कित्येकांना येते.
दु:ख रिचवण्यासाठी ते मद्याचा प्याला जवळ करतात. आनंद झाला तर तो प्याल्यातूनच ओसंडतो. रितेपणा प्याल्यात बुडतो. धुंदीचा षौक असणारे बहाणे शोधत राहतात. गरीब-श्रीमंत, ग्रामीण-शहरी, ज्ञानी-मूर्ख, स्त्री-पुरुष यांसारख्या कोणत्याही भेदांना बाटलीपाशी अजिबात थारा नाही. प्रांतागणिक मद्याचे प्रकार आणि सवयी बदलतात हाच काय तो फरक. मेंदूला चेतवणाऱ्या, किंचित ग्लानी आणणाऱ्या, क्वचित उद्दिपित करणाऱ्या रंगीबेरंगी द्रव्याची भुरळ भल्याभल्यांना पडते. प्राचीन काळातल्या ऋषी-मुनींच्या सोमरसपानाचे दाखले दिले जातात. युद्धात तांडव करणारे वीर माफक मद्यपान करून बेभान होत असल्याचे संदर्भ आहेत. गायकांच्या सुरांना आणि वादकांच्या बोटांनाही मदिरेची साथसंगत लागते म्हणे. द्राक्ष, तांदूळ आदीपासून बनणाऱ्या मद्याच्या औषधी गुणांचे वर्णन आयुर्वेदात आहे. एवढेच काय, मोहाची फुले मनमुराद चाखून गुंगणाऱ्या मर्कटांच्याही गंमतकथा वाचायला मिळतात. एकूणात काय तर मद्यपानाचा इतिहास हा जवळपास मानवी इतिहासाइतकाच जुना. अर्थात म्हणून कोणी मद्यपानाचे गोडवे गाऊ लागला तर मात्र अजिबातच योग्य ठरणार नाही. मद्य ही माणसाची गरज असू शकत नाही. मद्य मानवाचे अन्न नाही. मद्याविना माणसाचे काहीएक बिघडत नाही. मानवी आरोग्य संवर्धनासाठी किंवा सुधारण्यासाठी मद्याची (अल्कोहोल) आवश्यकता नसते, हे शास्त्रीय सत्य आहे. मद्यपानाला अनावश्यक प्रतिष्ठा प्राप्त करून देणाऱ्यांना हे वास्तव उच्चारवाने सांगितले पाहिजे. मद्यपान हा वैयक्तिक आसक्तीचा, आवडीचा विषय असू शकतो. शिवाय, महाराष्ट्रात जोपर्यंत सज्ञान व्यक्तींसाठी मद्यपान कायदेशीर आहे, तोवर आक्षेप घेण्याचेही कारण उरत नाही. गुजरात, केरळ, बिहार वगैरे राज्यांनी मद्यविक्रीवर बंदी आणलेली आहे. महाराष्ट्रातही प्रायोगिक तत्त्वावर चंद्रपुरात दारूबंदी आहे. राज्यात सरसकट दारूबंदी आणावी हा गांधीवाद्यांचा जुना आग्रह आहे. मात्र, मद्यविक्रीतून मिळणाऱ्या हजारो कोटींच्या महसुलाची नशा सरकारला सोडवत नाही. ऊस, द्राक्षापासून तयार होणाऱ्या मद्यामुळे शेतकऱ्यालाही चार पैसे अधिकचे मिळत असल्याचा ‘सामाजिक’ विचार यामागे असल्याचे सांगितले जाते. दारूबंदी तर सोडाच, पण ज्वारीसारख्या धान्यपिकापासूनही मद्यार्क निर्मिती करू द्या, म्हणजे कोरडवाहू शेतकऱ्याचेही भले होईल, अशी मागणी शेतकरी संघटना करतात. कोणी काय खावे, काय प्यावे, हा मूलभूत अधिकार झाला. त्यात इतरांनी लुडबूड करण्याचे कारणच नाही, हा ‘मानवाधिकारा’चा फणासुद्धा उभा असतोच. या सर्वाचा मथितार्थ इतकाच की सरसकट दारूबंदी किंवा समाजात रुजत असलेली मद्यपानाची सवय मुळापासून खुडणे सोपे नाही.
मद्यपींना लगाम घालणे मात्र अशक्य नाही. देशात सर्वाधिक वेगाने शहरीकरण होणाऱ्या महाराष्ट्रासाठी हा मुद्दा जास्त महत्त्वाचा आहे. मद्याच्या आहारी जाऊन गुन्हेगारी कृत्ये करणाऱ्यांचे प्रमाण जसे लक्षणीय तसेच गुन्हा करण्यासाठी जाणूनबुजून मद्याचा आधार घेणाऱ्यांचे प्रमाणही मोठे आहे. कौटुंबिक समस्या आणि महिलांच्या शोषणात मद्याची भूमिका खलनायकाची असल्याचे ‘क्राइम रेकॉर्ड’मधून अधोरेखित होते. वैयक्तिक मद्यप्रेम समाजासाठी त्रासदायक ठरत असेल तर त्याला पायबंद बसलाच पाहिजे. सुसाट रस्ते-महामार्गांवरून मद्यपी जणू यमदूताच्या रूपात बेधुंद विहरत असतात. सलमान खान किंवा जान्हवी गडकरसारख्या एखाद्-दुसऱ्या ‘सेलिब्रिटी’मुळे अशा यमदूतांची चर्चा ऐरणीवर येते. पण त्यापलीकडेही समाजातले बहुतांश मद्यपी बिनदिक्कत वाहने चालवत असतात. कारण घरात बसून, कुटुंबासमवेत मद्यप्राशन करण्याची प्रथा अद्याप भारतीय समाजव्यवस्थेत रुळलेली नाही. मद्यपान उरकून घर गाठणारे अधिक. या मद्यपींना यापुढे स्वत: वाहन चालवत घर गाठण्याची ‘स्टंटबाजी’ करता येणार नाही. वाहन चालवणाऱ्याच्या रक्तात मद्याचा अत्यल्प अंशदेखील आढळला तर त्याच्यावर कठोर कारवाई करावी, असा निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. मोटर वाहन कायदा अधिक कठोर करण्याची सूचनाही न्यायालयाने राज्य सरकारला केली आहे. न्यायालयाच्या या भूमिकेमागे व्यापक जनहिताचा दृष्टिकोन असला तरी यातून काही व्यावहारिक अडचणी निर्माण होऊ शकतात. दुचाकी, चारचाकीधारक मद्यपींना यापुढे चण्या-फुटाण्याबरोबरच शुद्धीतल्या ‘चालका’चीही सोय करावी लागेल. मुक्काम करू देणाऱ्या ‘मधुशाला’ शोधाव्या लागतील. घरात ‘बसण्या’चा पर्याय असेलच. यामधून नव्या सामाजिक समस्या जन्माला येण्याचा धोका आहे. वाहतूक पोलिसांना नवे कुरण उपलब्ध होईल ते वेगळेच. रस्ते अपघातात जायबंदी होऊन लाखोंच्या नशिबी आयुष्यभराचे अपंगत्व येते. अपघाती मृत्यूंमुळे लाखो कुटुंबे उद्ध्वस्त होतात. या प्रमाणात काही अंशांची जरी घट होणार असेल तरी न्यायालयाच्या निर्देशाचे सार्थक होईल.