आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशीवादाला सलाम! (अग्रलेख)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठीत जसा तुकाराम आहे, नामदेव ढसाळ आहे तसा भालचंद्र नेमाडेसुद्धा आहे, असे पु. ल. देशपांडे व दि. पु. चित्रे सातत्याने सांगत होते. त्यावर आता भालचंद्र नेमाडे यांना जाहीर झालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराने शिक्कामोर्तब केले आहे. ‘कोसला’, ‘टीकास्वयंवर’,‘हिंदू’ साठी नेमाडे स्मरणात राहतील. त्यातही कोसला खास. कोसलाने मराठीत पहिल्यांदा ‘न’ नायक चितारला. याच कोसलाने मध्यमवर्गीय साहित्यकांना डुलकी घेताना पकडले. ‘कोसला ते हिंदू’ हा नेमाडेंचा पाच दशकांचा लेखनप्रवास. त्यात "इसापनीती'तल्या कथेप्रमाणे दिपवून टाकणार्‍या भन्नाट गोष्टी आहेत. मराठीत अलीकडे झाडाझडती, तणकट, बारोमास अशा समर्थ कादंबर्‍या आल्या. त्याचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष श्रेय नेमाडे यांना आहे. कथेला त्यांनी क्षुद्र वाङ्मय ठरवले. त्यामुळे कथाकारांचे हात थांबले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनही त्यांच्या कचाट्यातून सुटले नाही. संमेलने जत्रेप्रमाणे असावीत हा त्यांचा आग्रह. लेखक-वाचकांना कट्ट्यावर बसून बोलता आले पाहिजे, असा त्यांचा हेका. त्यामुळे हा माणूस अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांना कधी गेला नाही. त्यांच्या या टोकदार टीकेमुळे साहित्य संमेलनाला लोकांनी गांभीर्याने घेणे बंद केले. पुढे सकल, विद्रोही अशी पर्यायी संमेलने उभी राहिली. लेखक माध्यमांशी कधीही शत्रुत्व पत्करत नाहीत. लेखक नेहमी बिचारा प्राणी असतो असे चित्र दिसे. पण नेमाडेंनी, ‘वृत्तपत्रे वाचल्याने भाषा बिघडते,’ असे जाहीर केले.

दैनिकांच्या रविवार पुरवण्या आणि दिवाळी अंकांनाही त्यांनी व्यवस्थित सोलून काढले. साठ-सत्तरच्या दशकांत सांस्कृतिक प्रभुत्वाला शह देण्याच्या कोणी भानगडीत पडत नव्हते. तेव्हापासून नेमाडी तोफ धडाडते आहे. लघुनियतकालिकवाले अनेक बंडखोर होते. पण नेमाडे अगदी बिनीचे शिलेदार निघाले. नेमाडेंनी आपली बंडखोरी ‘हिंदू’पर्यंत टिकवली. जागतिकीकरणाचे वारे जोरात असताना नेमाडेंनी देशीवाद आणला. देशीवाद उजव्या शक्तींना पूरक असल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला. पण नेमाडे आपला तिरकस दृष्टिकोन आपल्या शैलीत मांडत राहिले. दंतकथा बनून राहिलेल्या अनेक लेखकांची त्यांनी एका फटकार्‍यात माती केली. त्याच वेळी मोडीत काढलेल्या लेखकांची समकालीन प्रस्तुतता सांगितली. रडका लेखक ठरवलेल्या साने गुरुजींना नेमाडेंनी सर्वोत्कृष्ट कादंबरीकार म्हणून पुढे आणले. व्यंकटेश माडगूळकर मराठीतला नोबेल पुरस्काराच्या तोडीचा लेखक असल्याचे नेमाडेंनीच छातीठोकपणे सांगितले. नेमाडेंनी जसे प्रकाशकांना ठोकले, तसे लेखकरावांनाही झोडपले. संपादकांना धारेवर धरले तसेच प्राध्यापकांच्या संशोधनाची हेटाळणीही केली. नेमाडेंसारखे टीकाकार खरे तर समाजाची गरज असते. कारण टीकाकार एक प्रकारे जागल्यांचं काम करत असतात.

नेमाडेंच्या लिखाणाचे दोन टप्पे करावे लागतील. एक "हिंदू'पूर्व कादंबर्‍यांचा आणि दुसरा "हिंदू'च्या लिखाणाचा. पहिल्या पर्वात नेमाडे साहित्यातील अनिष्ट प्रवृत्ती सांगतात, तर दुसर्‍या पर्वात ते भारतीय इतिहासावर भाष्य करताना िदसतात. "हिंदू' कादंबरी लिहिताना त्यांनी सखोल अभ्यास केलेला दिसतो. दोन दशकांच्या या प्रदीर्घ अभ्यासात त्यांना बर्‍याच गोष्टी वेगळ्या दिसल्या. त्यांचे त्यांनी नवे अन्वयार्थ लावले. त्यामुळे "हिंदू' लिखाणाच्या काळात ते अधिक सामाजिक घडामोडींवर भाष्य करताना दिसतात. म्हणून "हिंदू'च्या खर्ड्याइतके महत्त्व त्यांनी "हिंदू'च्या प्रकाशनाच्या आगेमागे केलेल्या विधानांनाही आहे. ‘मराठ्यांचे पहिले राज्य शिवाजीचे नव्हे, अहमदनगरची निजामशाही आहे.’ ‘भारतातले चारही सम्राट अवैदिक परंपरेतले आहेत.’ या इतिहासातल्या बाबी नेमाडे यांनी पहिल्यांदा पुढे आणल्या. साहित्यिकांत समाजाच्या धारणा बदलण्याची शक्ती असते, हे अलीकडच्या काळात खर्‍या अर्थाने नेमाडे यांनीच दाखवून दिले आहे. त्यासाठी त्यांनी कठोर भूमिका घेतल्या. अगदी अलीकडची त्यांची ‘इंग्रजी शाळा बंद करा’ ही ताजी टिप्पणी. नेमाडे सलाम ठोकण्याच्या पात्रतेचे यासाठीच होतात.

स्वत: शेतकरी असून कधी ग्रामीण साहित्याचा त्यांनी टेंभा मिरवला नाही. खान्देशी असून कधी प्रांतवाद दाखवला नाही. इंग्रजीचे प्राध्यापक असून मातृभाषा सोडली नाही. भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर हल्ला झाला त्या वेळी नेमाडे म्हणाले होते, ‘ब. मो. पुरंदरे प्रभृतींनी मुळात इतिहासाची भिंत तिरकी बांधली. त्यामुळे ती त्यांच्याच अंगावर पडली.’ अशी भूमिका घ्यायला धाडस लागते. नेमाडे असं धाडस कायम दाखवत आले आहेत. चांगल्या कादंबरीकाराचा मी बंदोबस्त केलाय, असे नेमाडे म्हणत असले तरी आजचे दृश्य त्याच्या अगदी उलट आहे. कारण ग्रामीण महाराष्ट्रात सध्या लिहिता झालेला लेखक मोठ्या संख्येने आहे. तो नेमाडेंच्या ‘कोसला’ची कॉपी करतो आहे. त्यामुळे त्याचे जीवनानुभव व्यर्थ जाताना दिसतात. अशा वेळी नेमाडेंना ओलांडून पुढे जाणारा लेखकच वेगळे देऊ शकणार आहे. त्याची वाट आपण पाहायला हवी. तोच लेखक कदाचित मायमराठीला पाचवा ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून देणार आहे.