आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिहारची अटीतटी (अग्रलेख)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिहारमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या आतापर्यंतच्या कामावर मतदान होणार की मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या कारकीर्दीला मतदार साथ देणार, हे आजपासून बरोबर दोन महिन्यांनी म्हणजे आठ नोव्हेंबरला स्पष्ट झालेले असेल. मोदी यांच्यावर दिल्लीकरांनी विश्वास दाखवला नाही, त्यामुळे दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला हार पत्करावी लागली. त्या पार्श्वभूमीवर नितीशकुमार यांच्यासारखा कसलेला नेता मोदी यांच्या समोर उभा आहे. पंतप्रधान विरुद्ध एका राज्याचे मुख्यमंत्री असा हा सामना होणार आहे आणि देशाच्या आगामी राजकारणाच्याच नव्हे, तर सरकारच्या वाटचालीच्या दृष्टीनेही तो महत्त्वाचा आहे. केंद्र सरकारची कामगिरी सुधारायची असेल आणि जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करावयाची तर मूलभूत आर्थिक सुधारणा करण्याशिवाय पर्याय नाही आणि त्या करण्यासाठी राज्यसभेत बहुमत हवे. पण ते लगेच मिळणार नसल्याने बिहारचा विजय खेचून आणला तर विरोधकांची तोंडे बंद करता येतील, असा विचार करून मोदींनी बिहारच्या प्रचारात पूर्ण शक्ती लावली आहे.

अरब अमिरातीच्या दौर्‍यावरून परतताना थेट प्रचारसभेला बिहारमध्ये जाऊन त्यांनी या निवडणुकीचे महत्त्व अधोरेखित केले आहे. शिवाय बिहारच्या जनतेला भरभक्कम पॅकेजही बहाल केले आहे. सुरुवातीस सुसाट निघालेल्या मोदी सरकारला विरोधकांनी राज्यसभेत बहुमत नसल्याची जाणीव तर करून दिलीच, पण अनेक विषयांवर धारेवर धरले. सरकार ज्याला विकासाचा अजेंडा म्हणते, तोच पुढे जाऊ न देण्यात विरोधक यशस्वी झाले आहेत. बिहार निवडणुकीपर्यंत हा अजेंडा रोखण्याचा हेतू स्पष्ट आहे. मोदी यांच्या आर्थिक सुधारणांना मोकळे सोडले तर आपल्या हातात मुद्दाच राहणार नाही, हे काँग्रेस आणि त्याच्या मित्रपक्षांना चांगले माहीत होते. मोदी यांनी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत, हा मुद्दा विरोधक आता निवडणुकीत वापरू शकतील. दिल्ली हे छोटे राज्य असल्याने त्या पराभवाकडे तेवढ्या गांभीर्याने पाहिले गेले नाही, मात्र बिहारमध्ये तसे काही झाले तर केंद्रातील काही समीकरणेही बदलू शकतात हे नक्की.

बिहार विधानसभेच्या २४३ मतदारसंघांतील पाच टप्प्यांत होणार्‍या निवडणुका मोदी त्यांच्या विरोधकांच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत. विशेषतः काँग्रेसकडे केवळ १० टक्के मतदार राहिला आहे. त्यात वाढ न झाल्यास कालपर्यंत छोटे असलेले पक्ष काँग्रेसला आणखी अडचणीत आणतील आणि तो पक्ष आणखी मागे खेचला जाईल. अस्तित्वाच्या लढाईसाठी नितीशकुमार आणि लालूप्रसाद तब्बल २५ वर्षांनी एकत्र आले आहेत. ज्या समाजवादी विचाराच्या लढाईने या दोघा नेत्यांची सुरवात झाली होती, त्याचे नावही ते आता घेऊ शकत नाहीत. बिहारचा विकास केला आणि प्रशासन सुधारले, असे नितीशकुमार म्हणू शकतात, मात्र ज्यांच्यामुळे बिहारात ‘जंगलराज’ आले त्या लालूंना निवडणुकीत सोबत घ्यावे लागले आहे. एवढेच नव्हे, तर गंभीर गुन्ह्यांमुळे निवडणूक लढवण्यास अपात्र असलेल्या लालूंनी तब्बल १०० जागा पदरात पाडून घेतल्या आहेत. सरकार आलेच तर आपल्या इशार्‍यावर चालले पाहिजे, असे डावपेच लालू करणार, तर लालूंना एका मर्यादेत ठेवण्यासाठी नितीशकुमार प्रयत्न करणार, असा हा पेच आहे. समविचारी म्हणवणार्‍या मुलायमसिंह यांनी या आघाडीला मध्येच सोडून दिले आहे. अर्थात त्यामुळे फार मोठा फरक पडण्याची शक्यता नाही. पण काँग्रेसच्या विरोधावर उभ्या राहिलेल्या या पक्षांना काँग्रेसला सोबत घेऊन प्रथमच निवडणूक लढवण्याची वेळ आली आहे. शिवाय ज्या जीतमराम मांझी यांना नितीशकुमार यांनी गादीवर बसवले होते, ते मांझीही विरोधात गेले आहेत.

पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य करून बिहारी जनतेत ‘बिहारी’ अस्मिता पेटवत राहणे, याशिवाय नितीशकुमार यांच्यासमोर मार्ग नाही. बिहारच्या निवडणुकीत जातीची समीकरणे नेहमीच महत्त्वाची ठरली आहेत. मतदान यंत्रांवर उमेदवारांचे नाव आणि फोटो वापरणे, अपंगांसाठी खास व्यवस्था करणे आणि सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्याची व्यवस्था असे बिहारमध्ये प्रथमच होते आहे. तसेच नक्षलवादाने प्रभावित ४७ मतदारसंघांत कडक सुरक्षा व्यवस्था राहील, अशी काळजी घेतली जाते आहे. उद्देश हा की या लोकशाही प्रक्रियेत सर्वांना निर्भीडपणे सहभाग घेता यावा. गेल्या निवडणुकीत ९१ जागांवर विजय मिळवून आणि लोकसभा निवडणुकीत एनडीएला ४० पैकी ३१ जागा मिळवल्याने भाजपचे पारडे जड वाटत असले आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, ‘स्वराज अभियान’चे संस्थापक योगेंद्र यादव यांचाही अभ्यास तेच सांगत असला तरी अभ्यास आणि राजकारण यात मोठा फरक असतो. त्यामुळेच या निवडणुकीविषयी सर्व देशाला कुतूहल असणार आहे. जेडीयूप्रणीत महाआघाडी आणि भाजपप्रणीत महायुती अशा या सामन्याकडे अखेर नरेंद्र मोदी जिंकणार की नितीशकुमार जिंकणार, याच दृष्टीने पाहिले जाणार, एवढे नक्की.