आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आततायी भाजप (अग्रलेख)

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तर प्रदेश व उत्तराखंड या जवळजवळ असलेल्या राज्यांमध्ये नेत्रदीपक विजय मिळवूनही भाजपच्या थिंक टँकला काँग्रेसमुक्त भारत करण्याची फारच घाई दिसतेय. दोनच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशमधील विजयानंतर आपल्या पक्ष कार्यकर्त्यांसमोर भाषण करताना निवडणुका हा लोकशाहीतला एक उत्सव असतो व लोकांचा सहभाग हा देशहिताचा असतो, असे प्रतिपादन केले होते. त्यांनी पाचही राज्यांच्या मतदारांचे आभार मानले. मोदींचे असे सांगणे व त्याच्या बरोबर उलटी कृती पक्षाने करणे हा मोठा विरोधाभास झाला. मणिपूर व गोवा या राज्यात त्रिशंकू परिस्थिती असली तरी जनतेचा कल भाजपकडे नव्हे, तर काँग्रेसकडे आहे. भलेही मतदारांनी स्पष्ट कौल दिला नसेल, पण मतदारांनी संसदीय राजकारणाच्या कक्षेत काँग्रेसला विधानसभेत परीक्षेला सामोरे जाण्यास सांगितले आहे. 

या परीक्षेत आमदारांच्या घोडेबाजारापासून, बंडखोरी, पक्ष फोडाफोडी, अपक्षांची साथ, मंत्रिपदाची लालूच असे अनेक मार्ग आहेत हे मार्ग दोन्ही पक्षांना उपलब्ध आहेत. पण आपल्यापेक्षा अधिक जागा मिळवूनही काँग्रेसला ही संधी देण्याची तयारी भाजपची दिसत नाही. भाजपने गोव्यात सत्ता स्थापन करण्याची एवढी घाई केली की पक्षश्रेष्ठींनी ताबडतोब संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना राजीनामा द्यायला लावून गोव्याची सूत्रे हाती घेण्याचे फर्मान सुनावले. देशाच्या संरक्षण खात्याचा मंत्री बदलण्याचा वेगवान निर्णय गोव्यासारख्या लहान राज्यात सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे का, हा प्रश्न भाजपला पडलेला दिसत नाही. दुसरीकडे काँग्रेसने आपल्यावर अन्याय झाला म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावणे हा आणखी एक गमतीशीर प्रकार झाला. 

सत्तेसाठी साठमारी कशी करायची याचे ज्ञान आपल्याला अवगत नाही, असा काँग्रेसचा आव कोणालाच पटण्याजोगा नाही. सर्वोच्च न्यायालयाने म्हणून काँग्रेसला कानपिचक्या देताना पर्रीकर सरकार स्थापन करताना आपण कुठे होता आणि याचिकेमध्ये आमदारांच्या पाठिंब्याचा उल्लेख का नाही केला, असे प्रश्न विचारले. पर्रीकर घोडेबाजार करत आहेत, असा आरोप करायचा असेल तर त्याला पुरावे देणे भाग आहे, असेही न्यायालयाने काँग्रेसला बजावले. कायद्याच्या परिभाषेत राजकारणाची मांडणी करताना अनेक कसरती करायला लागतात. काँग्रेसला तसा युक्तिवाद न्यायालयात करता आला नाही. न्यायालयाने मात्र घटनेच्या चौकटीत आपला निर्णय देऊन भाजपला १६ मार्चला विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यास सांगितले. पर्रीकरांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे; पण ती घेताना अपक्ष व अन्य पक्षांच्या आमदारांना कॅबिनेट मंत्रिपद द्यावे लागले ही चांगली राजकीय संस्कृती नाही. त्या उलट काँग्रेसला सत्ता स्थापन करण्याची संधी देऊन ते सरकार टिकते की नाही याची वाट पाहणे अधिक संयुक्तिक ठरले असते.

या घटनेच्या निमित्ताने काँग्रेसमध्ये दुबळेपणा, हताशपणा आला आहे पुन्हा दिसून आले. गोव्यातील सत्ता नजीक असतानाही काँग्रेसने ज्या प्रकारे हे प्रकरण हाताळले हा त्या पक्षाचा बेजबाबदारपणा आहे. भाजप चुकतो आहे हे दाखवताना स्वत:च्या पक्षातील असंतुष्टांना शांत करण्याची तातडीने गरज होती हे पक्षाला समजले नाही. मणिपूरबाबतही हीच परिस्थिती आहे. दीडेक वर्षापूर्वी उत्तराखंडमध्ये काँग्रेस सरकारबाबत असाच घटनात्मक पेच निर्माण झाला होता. अरुणाचल प्रदेशमध्ये एका रात्रीत संपूर्ण पक्ष हायजॅक झाला तरी पक्षश्रेष्ठींकडून त्याबाबत कोणतीही युद्धपातळीवर हालचाल नाही. संघटनात्मक मरगळ, नेत्यानेत्यांमधील धुमश्चक्री व गटातटांचे राजकारण ही काँग्रेसची मुख्य समस्या आहे. 

उत्तर प्रदेशसह अन्य चार राज्यांतल्या निकालानंतर व त्यात तीन राज्ये काँग्रेसकडे आल्यानंतरही पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांपुढे येण्याचे कष्ट घेतले नाहीत. भाजपशी वैचारिक लढाई आहे व भाजपने केलेल्या ध्रुवीकरणाच्या विरोधात आपला पक्ष लढेल, असे मत त्यांनी निकालानंतर तीन दिवसांनी व्यक्त केले. या वेळकाढूपणामागे कोणती अपरिहार्यता होती, असा प्रश्न काँग्रेसला जिंकून देणाऱ्या मतदारांच्या मनात नक्कीच येऊ शकतो. राहुल गांधी यांनी पक्षात फेररचना करण्याची गरजही बोलून दाखवली असली तरी ती करणार कोण? दर वेळी याच पद्धतीच्या घोषणा केल्या जातात. 

वास्तवात काँग्रेसमध्ये क्रांतिकारी असे काही घडत नाही. काँग्रेसला आलेले मंदत्व भाजपने हेरल्याने त्यांनी गोवा व मणिपूरमध्ये सत्तेसाठी मुसंडी मारली; पण संसदीय लोकशाहीच्या संकेतांना धाब्यावर बसवण्याचा भाजपचा उद्योग योग्य वाटत नाही. या पक्षाचे ‘पार्टी विथ डिफरन्स’ हे घोषवाक्य राजकारणातील स्वत:चे वेगळे वैशिष्ट्य दाखवणारे असले तरी या पक्षाला राज्यघटनेच्या नियम, संकेत व परंपरेच्या चौकटीत राजकारण करावे लागणार आहे, याचे भान हवेच.
बातम्या आणखी आहेत...