आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Editorial About BJP Government And Narendra Modi Effect

भाजपची परराष्ट्रनीती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधानपदाची शपथ घेताना भारताचे शेजारी व मित्र देशांच्या प्रमुखांनी (सार्क देशांचे प्रतिनिधी) उपस्थित राहावे म्हणून नरेंद्र मोदींनी सर्वांना दिलेले निमंत्रण हे भारताच्या बदलत्या परराष्ट्र धोरणाचा एक भाग आहे. नरेंद्र मोदींचे सरकार सत्तेवर आल्यावर ते पाकिस्तान व बांगलादेशाबाबत कठोर भूमिका घेतील असे वातावरण भाजपने देशात तयार केले होते. शिवाय खुद्द नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकींच्या प्रचारादरम्यान भारत-पाक सीमेवर भारतीय जवानांच्या नृशंस हत्येचा मुद्दा हाती घेत पाकिस्तानला धडा शिकवण्याची भाषा केली होती व यूपीए सरकारच्या पाकिस्तानविषयीच्या मवाळ भूमिकेवर कडाडून टीका केली होती. पण सत्ता हाती आल्यानंतर एका रात्रीत शेजारील देशांशी संबंध राखणे ही तारेवरची कसरत व कठीण परीक्षा असते याचे भान मोदींसह भाजपला आले ते बरे झाले. मोदींच्या निमंत्रणाबाबत पाकिस्तानने अजून कोणती अधिकृत भूमिका घेतलेली नाही. पण शरीफ आल्यास भारत-पाकिस्तान संबंधांना वेगळे वळण लागेल. मोदींनी व्यापार व आर्थिक साहचर्याच्या माध्यमातून पाकिस्तानबरोबरच्या संबंधांबाबत सुधारणा होतील असे एका मुलाखतीत म्हटले होते. त्याला शरीफ यांनी दिलेला प्रतिसाद असा निष्कर्ष निघू शकतो. या शपथविधीला अफगाणिस्तान, मालदीव, भूतान, नेपाळ, बांगलादेशचे प्रमुख उपस्थित राहतील अशी शक्यता आहे. यूपीए-2 सरकारच्या कार्यकाळात तिस्ता नदी पाणीवाटप व बांगलादेश निर्वासितांच्या मुद्यावरून संसदेत महत्त्वाचे विधेयक भाजपने आणू दिले नव्हते. तसेच तृणमूल काँग्रेसनेही विरोध केला होता. आता बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना या भारतभेटीवर आल्यास हे प्रश्न उभय देशांना पुन्हा तपासून पाहावे लागतील. आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा धोका पाहता अफगाणिस्तानबरोबरही भारताला आपले संबंध अधिक दृढ करावे लागतील तशीच परिस्थिती श्रीलंकेबाबतही आहे. श्रीलंकेचे अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांच्या मोदींच्या शपथविधीनिमित्ताने होणार्‍या भारतभेटीवर एमडीएमकेचे नेते वायको, अण्णाद्रमुकच्या नेत्या जयललिता व द्रमुकने आताच तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. श्रीलंकेतल्या तामिळ निर्वासितांच्या समस्या व त्यांचा श्रीलंका सरकारवरील संताप मोदींनी समजून घेतला पाहिजे अशी भूमिका हे प्रादेशिक पक्ष घेत आहेत. हा सगळा माहोल पाहून मोदींना आपली पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घ्यावी लागतील.