आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माणुसकी की साटेलोटे? (अग्रलेख)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भेदभाव हाच पाया असलेल्या व्यवस्थेत न्यायही कसा विकला जातो, याचे चपखल उदाहरण म्हणजे आयपीएल नावाच्या क्रिकेटच्या सर्कशीतून प्रचंड पैसा कमावणारे आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी. गर्भश्रीमंत घरात जन्म झालेले आणि आज केवळ पन्नाशीत असलेले ललित मोदी हे गेली पन्नास वर्षे पैशांशीच खेळत आहेत. त्यामुळे ते सतत वादात आहेत. अगदी अमेरिकेला शिक्षणासाठी गेले तेथेही ते शांत बसले नाहीत, त्यांच्याकडे कोकेन सापडले आणि त्यामुळे त्यांना दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली. मात्र पहिल्या गुन्ह्याला असलेल्या ‘सवलती’मुळे त्यांनी तुरुंगवासातून सुटका करून घेतली. असे वादाशी नाते असलेल्या मोदींच्या संगतीमुळे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज्य सध्या अडचणीत सापडल्या आहेत. वाद म्हटला तर अगदी साधा आहे. ललित सध्या ब्रिटनमध्ये आहेत, कारण भारताने त्यांच्याविरोधात लूक आऊट नोटीस जारी केलेली आहे. याचा अर्थ ते सापडतील तेथे त्यांना पकडण्याचे आदेश. कारण त्यांनी आयपीएलच्या प्रसारणाचे हक्क देताना ४५० कोटी रुपयांची हेराफेरी केली आहे. त्यावरून त्यांना आयुक्तपदही सोडावे लागले आहे. त्यांच्या पत्नीला कॅन्सर झाला म्हणून उपचारासाठी तुर्कस्तानला नेताना त्यांच्यासोबत त्यांना जाऊ द्यावे की नाही, असा पेच निर्माण झाला तेव्हा ब्रिटनने त्यांच्या नियमानुसार निर्णय घ्यावा, असे सुषमा स्वराज्य यांनी परराष्ट्रमंत्री असताना सांगितले, म्हणजे एक प्रकारे ललितना मदतच केली, असा आरोप आहे. सुषमा स्वराज यांचे म्हणणे आहे की, त्यांनी मानवतावादी भूमिकेतून ही मदत केली. पण ती मदत फक्त वैद्यकीय कारणासाठीचा प्रवास होता. लंडन-तुर्कस्तान-लंडन असा हा प्रवास त्यांचा झाला, म्हणजे ललित मोदींच्या दृष्टीने स्थिती जैसे थे राहिली. एवढी एकच घटना पाहिली तर सुषमा स्वराज यांचे काही चुकले, असे वाटत नाही. मात्र, या घटनेमागील परीघ पाहिला हे लागेबांधे कसे काम करत असतात, हे लक्षात येते.

सुषमा स्वराज यांनी नैतिक दृष्टिकोनातून राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस आणि विरोधी पक्ष करीत आहेत, तर सरकार आणि सत्तारूढ भाजप स्वराज यांच्या पाठीशी उभा राहिला आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नेतृत्वाला स्वराज यांनी विरोध दर्शविला होता, म्हणून हे प्रकरण शेकवण्यात येत आहे, असेही म्हटले जाते आहे. समाजवादी पक्षाने यात स्वराज यांचे काही चुकले नाही, अशी भूमिका घेतली आहे. भोपाळ वायू दुर्घटनेतील युनियन कार्बाइडचे अधिकारी वॉरेन अँडरसन आणि बोफोर्स प्रकरणात उद्योगपती ओट्टाव्हियो क्वात्रोची या दोघांनाही देशाबाहेर सुरक्षित घालवण्यात काँग्रेसचाच हात होता, असा पलटवार भाजपने केला आहे. पुढील काही दिवस या विषयावरून देशात वादविवाद होत राहतील. मात्र यानिमित्त दिल्लीतील गर्भश्रीमंत वर्तुळात कसे साटेलोटे चालते, याची शेकडो उदाहरणे देशासमोर येतील आणि ती येणे जास्त महत्त्वाचे आहे. देशाची लोकशाही अधिक प्रगल्भ होण्यासाठी हे साटेलोटे जनतेसमोर येण्याची गरज आहे. अर्थसत्ता आणि राजसत्तेचे नाते कधी लपून राहत नाही, मात्र ते फार स्पष्टपणे पुढेही येत नाही. वास्तविक या दोन्ही सत्ता हातात हात घालून एकमेकांना साथ देत असतात. या वादातून सुषमा स्वराज यातून कदाचित बाहेरही पडतील, मात्र या घटनेने त्यांचे घराणेही या प्रकारच्या लाभात कसे भागीदार आहे, हे जगासमोर येईल. विशेषत: स्वराज यांची मुलगी बांसुरी ललित मोदींच्या लीगल टीममध्ये सहभागी होती, सुषमा स्वराज यांचे पती आणि एकेकाळी समाजवादी वर्तुळात असणारे स्वराज कौशल यांना ललित मोदींच्या मदतीने आपला पुतण्या ज्योतिर्मय कौशल यास ब्रिटनमध्ये प्रवेश मिळवून द्यावयाचा होता, तेव्हा सुषमा स्वराज यांनी मोदींशी संपर्क साधला होता, कौशल हे ललित यांच्या गेली दोन दशके जवळचे मानले जातात, कौशल यांचे अनेक उद्योगपतींशीही संबंध आहेत. उच्चभ्रूंच्या वर्तुळात जे काही चालले आहे, त्या हिमनगाचे हे एक टोक आहे. अमेरिकेतील न्यायालय कोकेन बाळगणाऱ्या तरुणाला सोडते, तो भारतात अनेक कंपन्या काढतो, भारतीय टीव्हीच्या पडद्यांवर जे दाखवले जाऊ नये, ते दाखवून तो प्रचंड पैसा कमावतो, केरळमध्ये लॉटरीचा खेळ चालवतो, क्रिकेटला सर्कशीचे रूप देऊन सर्व खेळाडू आणि सिनेकलाकारांना नाचवतो, त्याचे प्रसारण अधिकार चुकीच्या पद्धतीने लाटून कोट्यवधी रुपयांचा धनी होतो, असा ललित मोदी नावाचा किंगमेकर राजकीय मदतीशिवाय उभा राहू शकतो, हे शक्य नाही. केवळ त्याच्या पत्नीवर उपचारासाठीची मदत म्हणून ही घटना असती तर ती माणुसकीच्या भावनेने केलेली मदत, असे म्हणता आले असते. पण ती अर्थ आणि राजसत्तेच्या युतीच्या साखळीची एक कडी आहे. त्यामुळे सुषमा स्वराज अडचणीत सापडल्या आहेत. तुलनेने स्वच्छ मानल्या गेलेल्या स्वराज या वादाच्या बळी ठरतील. कारण नरेंद्र मोदी यांनी देशभर ‘स्वच्छते’ची जी मोहीम हाती घेतली आहे, त्या मोहिमेत आपले घर स्वच्छ ठेवणे, ही पूर्वअट आहे!
बातम्या आणखी आहेत...