आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Editorial About BJP Show India Shining Mission In India, Divya Marathi

पुन्हा जुळवाजुळव? (अग्रलेख)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
१९९९ ते २००३ या आपल्या कार्यकाळाचा ताळेबंद दाखवण्यासाठी भाजपने इंडिया शायनिंगची मोहीम जोरदारपणे उघडली होती. पण प्रत्यक्षात उदारीकरण-खासगीकरण- जागतिकीकरण धोरण घाईघाईने, व्यवस्थेला न जुमानता राबवल्याने या सरकारला आश्चर्यकारकरीत्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. या पराभवाचे विश्लेषण करताना भाजपचे चाणक्य समजले जाणारे प्रमोद महाजन यांनी असे वक्तव्य केले होते की, "एनडीए आघाडी जशी भाजपने बांधली होती तसाच प्रयोग काँग्रेसने केल्याने भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले.' महाजन यांच्या म्हणण्यात तथ्य होते. कारण काँग्रेसने आंध्र प्रदेशात, तामिळनाडू, बिहार, महाराष्ट्र येथे स्थानिक-प्रादेशिक पक्षांची मोट बांधली होती व या पक्षांना मिळालेले यश काँग्रेसच्या पथ्यावर पडून २००४ मध्ये डाव्यांच्या पाठिंब्यावर यूपीए आघाडी प्रत्यक्षात आली होती. हा गटातटाचा, प्रादेशिक पक्षांना हाताशी धरून सत्ता मिळवण्याचा काँग्रेसचा प्रयोग २००९ मध्ये दिसून आला. त्या वेळी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला २०६ जागा मिळाल्या; पण त्यांना द्रमुक, राष्ट्रवादी, समाजवादी पार्टी, बसपा अशा पक्षांना हाताशी घेऊन यूपीए-२ सरकार चालवावे लागले होते. नंतर हे सरकार सतत तीन वर्षे भ्रष्टाचाराच्या आरोपात घेरल्यामुळे २०१४ च्या लोकसभा निवडणुका घोषित होण्याअगोदर हे सर्व घटक पक्ष काँग्रेसच्या बुडत्या जहाजातून पळून जाऊ लागले. या निवडणुकीत भाजपने काँग्रेससह अनेक प्रादेशिक पक्षांची त्यांच्याच प्रदेशात धूळधाण उडवल्याने देशाच्या राजकारणाचा पोतच बदलला. केंद्रात भाजप हा बलवान पक्ष झाला. त्यात हिंदी पट्ट्यातील बहुतांश बडी राज्ये भाजपच्या हातात असल्याने प्रादेशिक पक्षांच्या राजकारणाला वावच शिल्लक राहिला नाही. त्यात भाजपने संसदेत विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसला नाकारल्याने काँग्रेससह सर्व प्रादेशिक पक्षांची राजकीय कोंडी होऊ लागली.
भाजपचा संसदेत व रस्त्यावर मुकाबला करण्याइतपत ताकद व आत्मविश्वास या पक्षांमध्ये नाही, हे या पक्षांना लवकरच जाणवल्याने जी काही कोंडी निर्माण झाली होती, ती फोडण्याची गरज होती. त्याचे प्रयत्न पं. नेहरूंच्या १२५ व्या जयंतीनिमित्ताने काँग्रेसने आयोजित केलेल्या कार्यक्रमात दिसून आले. प्रत्यक्ष या कार्यक्रमाचे निमंत्रण काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी भाजप सोडून सर्व राजकीय पक्षांना दिले होते. त्यानुसार या कार्यक्रमात राजदचे लालूप्रसाद यादव, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे प्रकाश करात, तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी, जनता दल (सं.)चे शरद यादव, माजी पंतप्रधान देवेगौडा, रालोदचे अजितसिंग हे नेते उपस्थित होते. त्यांच्या या उपस्थितीमुळे बिगर भाजपविरोधी मोट बांधण्यास सुरुवात झाली असे म्हणण्यास वाव आहे. या कार्यक्रमात भाजपच्या हिंदुत्वाला रोखण्यासाठी सर्व सेक्युलर विचारसरणीच्या पक्षांनी एकत्र यावे असे थेट व स्पष्ट भाष्य कोणी केले नाही; पण सोनिया गांधी यांनी आपल्या भाषणात नेहरूंच्या लोकशाहीवादी व सेक्युलर मूल्यांची देशाला गरज असल्याचे प्रतिपादन केले. भारत व भारतीयत्व हे सेक्युलर मूल्यांशिवाय अस्तित्वात येऊच शकत नाही आणि सेक्युलरवाद हा केवळ आदर्श नव्हे तर ती देशाला एकसंघ ठेवणारी गरज आहे, असे त्या म्हणाल्या. आजपर्यंतच्या बिगर काँग्रेस राजकारणात सेक्युलरवादाचा मुद्दा काँग्रेसशिवाय अन्य पक्षांकडून उचलला जात नसे. आता बिगरभाजपच्या राजकारणाचे दिवस आल्याने या मुद्द्यावर सर्वच पक्षांना जाग आली आहे. मुख्यत: ज्या प्रादेशिक अस्मितेच्या बळावर हे पक्ष जन्मास आले व वाढत गेले, ते पक्ष काँग्रेसच्या सेक्युलर भूमिकेशी सहमत होतील का, हा प्रश्न आहे. त्यांना आपली भूमिका तपासावीच लागणार आहे. महत्त्वाचे म्हणजे डाव्यांनी २००८ मध्ये अणुकराराच्या मुद्द्यावरून काँग्रेसशी युती तोडली होती, तर २०१२ मध्ये ममतांनी रेल्वे भाड्याच्या मुद्द्यावरून यूपीए सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. गेल्या १० वर्षांत काँग्रेसशी नाते तोडताना सर्वच पक्षांनी काँग्रेसच्या निओलिबरल व विकासवादी धोरणांचा समाचार घेतला होता. या कार्यक्रमाला समाजवादी पार्टी, बसपा, नॅशनल कॉन्फरन्स, द्रमुक, अण्णा द्रमुक हे सर्व एकेकाळचे काँग्रेसचे सहकारी पक्ष उपस्थित नव्हते. या सर्वांच्या अनुपस्थितीचे एक कारण म्हणजे या सर्वांना आपले अस्मितेचे राजकारण सांभाळत भाजपचा अश्वमेध रोखावा लागणार आहे. मुलायमसिंह यांना जनता दल पुनरुज्जीवित करायचा आहे, तर मायावतींना मुलायमसिंह व भाजपचे आव्हान एकाच वेळी मोडून काढायचे आहे. द्रमुक व अण्णा द्रमुक यांच्यामधून विस्तव जात नाही. नॅशनल कॉन्फरन्सने अगोदरच काँग्रेसशी युती तोडली आहे. त्यांना आगामी जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकांत जबर फटका बसेल असे वाटत आहे. डावे आपल्याच पक्षातल्या संघर्षात अडकले आहेत. एकंदरीत नेहरू जयंतीच्या निमित्ताने काँग्रेसने सेक्युलर कार्ड खेळले आहे. त्याला प्रतिसाद लगेचच मिळेल असे वातावरण अद्याप दिसत नाही.