आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Editorial About Bollywood Actor Salman Khan Written By Ramesh Patange

सद्‍सदविवेक जागा ठेवा!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
"सलमानला तुरुंगवास' ही बातमी प्रसिद्धी माध्यमांना ६ आणि ७ मे रोजी भरपूर खाद्य देऊन गेली. सिनेनट सलमान याने तेरा वर्षांपूर्वी मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून ती मुंबईतील वांद्रे येथे पदपथावर झोपलेल्या पाच जणांवर धडकवली. त्यातील एकाचा मृत्यू झाला, चार जण जखमी झाले. सलमानवर सदोष मनुष्यवधाचे कलम लावण्यात आले आणि त्याच्यावरील खटला सुरू झाला. सलमानच्या खटल्याचा निकाल ६ मे रोजी लागला आणि सलमानला पाच वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा झाली; परंतु सलमान तुरुंगात गेला नाही. तो जामिनावर सुटला.
सलमानचा खटला केवळ गुन्ह्यासाठी महत्त्वाचा नसून या खटल्याने आपल्या समाजव्यवस्थेची आणि न्यायव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. पहिला विषय येतो तो आपल्या न्यायव्यवस्थेचा. सलमानच्या गाडीने पाच लोकांना धडक दिली. या खटल्याचा निकाल लागण्यासाठी तेरा वर्षे का लागली? या खटल्यातील मुख्य साक्षीदार रवींद्र पाटील यांचे भयानक हाल का करण्यात आले? खटल्यात उभ्या राहणाऱ्या वकिलांनी ज्या फी घेतल्या आहेत त्यावर कायद्याचे कसलेच बंधन नसावे का? असाच अपराध एखाद्या सामान्य माणसाने केला असता तर त्याचे काय झाले असते? कायद्यापुढे सर्व समान, मग सलमानला शिक्षा होऊनही लगेचच जामीन का देण्यात आला? असा जामीन एखाद्या सामान्य ड्रायव्हरला मिळाला असता का? या खटल्यात साक्षी फिरविण्याचे जे प्रकार झाले, खोटे पुरावे आणण्याचे प्रकार झाले, त्याचे समर्थन वकिलांनी केले हे कोणत्या न्यायाच्या परिभाषेत बसते? एका दिवसासाठी वीस-पंचवीस लाख फी घेणारा वकील समाजाच्या हिताचे कोणते उत्पादक काम करीत असतो? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे समाजातील विचारी व्यक्तींनी शोधली पाहिजेत. इंग्रजांनी दिलेली आणि वकिलांची पोट भरणारी न्यायव्यवस्था आणखी किती काळ चालू ठेवायची?
दुसरा विषय येतो, तो आमच्या राजकीय नेत्यांचा, सिनेमासृष्टीतील नटनट्यांचा. सलमानला भेटायला त्याच्या घरी राज ठाकरे गेले. राज ठाकरेंनी कोणाला भेटावे हा त्यांचा प्रश्न, परंतु न्यायालयाने ज्याला गुन्हेगार ठरविले त्याला भेटून राज ठाकरे काय संदेश देऊ इच्छितात? सिनेमासृष्टीतील अनेकांना सलमानचे भरते आले आणि आम्ही तुझ्या पाठीशी आहोत (म्हणजे काय आहोत) हे दाखविण्याची चढाओढ सुरू झाली. सलमानच्या पाठीशी उभे राहणे म्हणजे तू असे गुन्हे कर, आम्ही तुझ्या मागे उभे राहतो, असे सांगणे आहे का? अभिजित या गायकाने तर कहर केला, हा गायक म्हणतो, ‘कुत्रे जर रस्त्यावर झोपले तर ते कुत्र्याच्या मौतीनेच मरते, रस्त्यावरची माणसे किड्यामुंग्यांप्रमाणेच मरतात, रस्ता त्याने विकत घेतला होता काय?’ अशी संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे. समाजाचे आणि सद्सद्विवेकबुद्धी जागरूक करणाऱ्यांचे अशा वेळी कर्तव्य बनते की त्यांनी सामाजिक बहिष्कार टाकला पाहिजे. जे सलमानच्या पाठीशी उभे आहेत त्यांच्याकडे लोकांनी पाठ फिरविली पाहिजे. त्यांचे चित्रपट पाहणे बंद केले पाहिजे. गुन्हेगारांना संरक्षण देणारा आणि त्याच्या पाठीशी उभा राहणारा हादेखील गुन्हेगारच ठरतो.
तिसरा विषय समाजातील तरुण पिढीसंबंधीचा आहे. चित्रपटाचे आकर्षण, चित्रपट नट-नट्यांचे आकर्षण नवीन नाही; परंतु हे आकर्षण म्हणजे आपली बुद्धी गहाण ठेवून नायक किंवा नायिकेच्या मागे धावणे नव्हे. नायक- नायिका चित्रपटातील कलाकार आहेत तोपर्यंत ठीक असते. त्यांच्या कलेचा आदर करावा हेदेखील चांगले आहे, परंतु ते जीवनातील आदर्श बनू शकत नाहीत. रूपेरी पडद्यावरील त्यांचे दर्शन हे मायावी आणि फसवे असते. ज्या सामान्य नीतितत्त्वांना घेऊन आपण जगतो त्याच्याविरुद्ध व्यवहार नायक आणि नायिकांचा असतो. त्याला काही अपवाद आहेत; परंतु अपवाद नियम होत नाहीत. जेव्हा सलमानसाठी कासावीस होणारे तरुण आणि तरुणी पाहिले की यांचे भवितव्य काय असेल, असा प्रश्न मनात उभा राहतो. त्यांचे आईबाप काय करीत असतात? मुलांना ते कोणते वळण लावतात? चित्रपटसृष्टीतील यथार्थ जाणीव ते किती करून देतात? असे अनेक प्रश्न मनात निर्माण होतात. चित्रपट नायक- नायिकांसाठी वेडे होण्याचा कालखंड आता संपायला पाहिजे. इंटरनेट आणि यू ट्यूबच्या महाजालात कोणताही चित्रपट किंवा गाणे केव्हाही ऐकता येते. त्यासाठी वेडेपिसे होण्याचे काही कारण नाही. ही सर्व करमणूक आहे आणि ती मोल देऊन विकत घ्यायची असते. ज्याचे आपण मोल देतो, त्याला कधी आपण डोक्यावर घेत नाही. नट- नट्यांच्या बाबतीत ही हीच भूमिका हवी. त्यांच्या कलेचे कौतुक व्हावे; पण त्यांना उंबरठ्याच्या बाहेरच ठेवावे.
चौथा विषय प्रसिद्धी माध्यमांचा निर्माण होतो. प्रसिद्धी माध्यमांची तीन कामे आहेत. १) सत्य माहिती लोकांना देणे. २) लोकांचे सामाजिक, राजकीय प्रबोधन करणे. ३) घटना आणि बातम्या यांच्यावर लोकहितकारी भाष्य करणे. आज आमची प्रसिद्धी माध्यमे हे काम करीत आहेत का? सलमान खानचा खटला एका गुन्हेगाराचा खटला आहे. म्हणून त्याची प्रसिद्धी मधल्या पानावर करणे आवश्यक होते. दूरदर्शनवर दहा बातम्या सांगितल्या जातात, त्यातील एक बातमी झाली; परंतु सलमानचा खटला, त्याला झालेली शिक्षा, यावर प्रसिद्धी माध्यमांनी जागा आणि वेळ खर्च केला आहे, तो गंभीर चिंतेचा विषय आहे.
लोकांच्या प्रबोधनाच्या दृष्टीने अनेक घटना घडल्या आहेत. मोदींचा चीनचा प्रवास सुरू झाला आहे. नेपाळच्या भूकंपाचा विषय आहे, बांगलादेशबरोबरच्या कराराचा विषय आहे, दाऊदचा विषय सुरूच आहे. मोदी शासनाला एक वर्ष पूर्ण होत आहे. रुपयाचे मूल्य घसरले की रुपया स्वस्त होतो, वस्तू महाग होतात, व्यावहारिक भाषेत वस्तू खरेदी करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात. चाळीस ते एेंशी रुपये किलोने भाजी घ्यावी लागते आणि दहा ते पंधरा रुपयांना चहाचा कप घ्यावा लागतो. यातील प्रत्येक विषय सर्व नागरिकांच्या जीवनाला स्पर्श करणारा आहे. सलमानला शिक्षा झाली की नाही, तो जामिनावर आहे की नाही यापेक्षा हे सर्व विषय अतिशय महत्त्वाचे आणि गंभीर आहेत. सलमान हा कोणी देशाचा महानायक नव्हे. तो देशाचा नेहरू, पटेल, आंबेडकर नव्हे. आपणच ज्याला पैसे मोजून खूप मोठा केला, नको असलेली त्याची प्रतिमा बनविली, त्याचे एवढे कौतुक कशासाठी?
(ramesh.patange@gmail.com)