आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षणातून व्हावा लोकशाहीचा संस्कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लहान मुले स्वतःचाच विचार करतात आणि मनासारखे घडले नाही तर आकांडतांडव करतात. त्यांची प्रवृत्ती क्रौर्याकडे झुकत असते. दया, करुणा, समता, न्याय या संकल्पना त्यांच्यामध्ये संस्कारातून रुजवाव्या लागतात.हा संस्कार शिक्षणातून मिळावा अशी विचारवंतांची अपेक्षा असते.
नाशिकचे सचिन जोशी हे एक झपाटलेले व्यक्तिमत्त्व आहे. सध्या शिक्षणक्षेत्र म्हणजे एक बाजार झाला आहे. शाळा आणि कॉलेजेस काढून खोऱ्याने पैसा ओढण्याचीच प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात आढळते. अशा वेळी मुलांच्या पुस्तकी शिक्षणाकडे लक्ष पुरवण्यापेक्षा त्यांना निसर्गाचा आणि भवतालाचा अनुभव देऊन त्यांचे आयुष्य अनुभवाने समृद्ध करण्याचा प्रयोग त्यांनी सुरू केला. शाळेच्या संचालकांशी पटल्याने ते संस्था सोडून बाहेर पडले आणि ज्या पालकांशी प्रयोगामध्ये निकटचे नाते निर्माण झाले होते, त्यांच्याच मदतीने त्यांनी एस्पेलिअर ही शाळा काढली. प्रत्यक्ष अनुभव घेऊन शिक्षण घेण्याचा हा प्रयोग इतका यशस्वी झाला की त्यांच्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी मोठ्या रांगा लागायला लागल्या, तरीही वर्गातल्या मुलांची संख्या मोजकीच ठेवून त्यांच्यावर वैयक्तिक नाते जोडून संस्कार करण्यावर त्यांनी भर दिला.
त्यांना त्यांच्यासारखेच ध्येयवेडे शिक्षक आणि पालक भेटले. त्यांच्या मदतीने त्यांनी झोपडपट्टीत राहणाऱ्या दारिद्र्य रेषेखालच्या कुटुंबांमधील दुर्लक्षित मुलांसाठी एज्युकेशन ऑन व्हील्सचा प्रयोग सुरू केला. बसमधून शिक्षक मंडळी आठवड्यातील ठरावीक दिवशी एकेका झोपडपट्टीत जायची. बसमध्ये आणि बाजूला सरकता शामियाना लावून एका वेळी निरनिराळ्या वयाच्या चाळीस मुलांना शिक्षण दिले जाई. अनेक मुले आणि मुली या शाळेत शिकून नंतर कॉलेजमध्येसुद्धा गेली.

वाढत्या शहरीकरणामुळे खेड्यातून नाशिक शहरामध्ये माणसांचा ओघ प्रचंड प्रमाणात वाढला. त्यापैकी हातावर पोट भरणाऱ्यांची मुले रस्त्यावर खेळतच मोठी होतात. त्यांच्या शिक्षणाचा विचारही कोणी करत नाही. गुंडांच्या टोळ्यांमध्ये सुरुवातीला उमेदवारी करायला लागून नंतर ते सराईत गुंड होतात. जिममध्ये जाऊन शरीर कमावणे, खंडणी गोळा करणे, सुपारी घेऊन समाजात दहशत निर्माण करणे, खिसे कापणे, गळ्यातल्या साखळ्या लांबवणे, असे सारे करत करत ते सराईत गुन्हेगार होतात. निवडणुकांच्या वेळी त्यांचा चांगलाच उपयोग होत असल्याने राजकीय पुढाऱ्यांचे आणि भ्रष्ट नोकरशाहीचे संरक्षण त्यांना लाभते. यामुळे समाजाचा पोतच बिघडून गेला आहे.

याचा नीट अभ्यास करून सचिन जोशी यांनी एव्हरी चाइल्ड काउंट्स ही योजना आपल्या सहकाऱ्यांच्या साहाय्याने राबवली. नाशिक महानगरपालिकेनेसुद्धा उत्तम सहकार्य केले आणि एक हजाराच्या वर मुलांना नगरपालिकेच्या शाळेत प्रवेश मिळवून दिला. त्या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध विचारवंत संदीप वासलेकर आले होते. या प्रयोगांची ख्याती सगळीकडे झाली. अशा अभिनव संकल्पना राबविल्याबद्दल सचिन जोशी यांच्या शाळेला ‘डिझाइन फॉर चेंज’चा जागतिक पुरस्कार मिळाला. एवढेच नव्हे, तर त्यांना युरोपमधल्या वर्ल्ड फोरम फॉर डेमोक्रसी या संस्थेच्या २०१६च्या परिषदेसाठी व्याख्याता म्हणून निमंत्रण आले आहे. युरोपियन राष्ट्रांच्या पार्लमेंटने विचारांच्या देवाणघेवाणीसाठी ही संस्था स्थापन केली आहे.

त्यांच्या या परिषदेसाठी युरोपीय देशांचे सर्व पंतप्रधान उपस्थित असतात. अनेक नोबेल पारितोषिक विजेते या परिषदेत भाग घेत असतात. विचारवंत आणि शासक यांच्या विचारमंथनातून भविष्यात राबवण्यासाठी संकल्पना विकसित करण्याचा हा प्रयत्न आहे. या वर्षीचा विषय “लोकशाही आणि समता : शिक्षण यात काही भूमिका निभावू शकेल का?’ हा आहे. या परिषदेला वक्ता म्हणून एखाद्या भारतीय व्यक्तीला पहिल्या प्रथमच निमंत्रित केले जात आहे. ही आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. न्यायी आणि सर्वांना समान लेखणाऱ्यांच्या हातात सत्ता सोपवली जावी यासाठी लोकशाहीची संकल्पना मांडण्यात आली. राज्य कोणी करावे हे सर्वसंमतीने किंवा बहुमताने ठरावे, अशी व्यवस्था करण्यात आली. पण मानवाची नैसर्गिक प्रवृत्ती स्वार्थाकडे असते. लहान मुले स्वतःचाच विचार करतात आणि मनासारखे घडले नाही तर आकांडतांडव करतात. त्यांची प्रवृत्ती क्रौर्याकडे झुकत असते. दया, करुणा, समता, न्याय या संकल्पना त्यांच्यामध्ये संस्कारातून रुजवाव्या लागतात. हा संस्कार शिक्षणातून मिळावा अशी विचारवंतांची अपेक्षा असते.

आज घराघरातून आणि समाजातूनही अजून अनिष्ट रूढींचेच संस्कार होताना दिसतात. समतेचे, न्यायाचे, घटनेतल्या आदर्श तत्त्वांचे संस्कार कोण करणार? हे संस्कार शिक्षणात करायचे असतात. आता भारतात आठ कोटी मुले शाळेत जातच नाहीत किंवा काही काळ जाऊन सोडून देतात. दारिद्र्य हे याचे मुख्य कारण आहे. त्यांचा आपल्यावर अन्याय करणाऱ्या समाजावर रोष असणे साहजिक आहे. सुडाची भावना पोसली जातच असते. त्यात त्यांना चांगले आयुष्य घालवायची संधीच मिळाली नाही तर ते गुन्हेगार गुंड बनण्याचा धोका असतो. निवड करण्याचे योग्य शिक्षण देताच त्यांना आपण मतदानाचा अधिकार देणार आहोत. मग ते गुंडांनाच मतदान करतील आणि आपल्यावर गुंडच राज्य करतील. हे प्रत्यक्षात घडायलाही लागले आहे. म्हणूनच सचिन जोशी यांच्या प्रयत्नांकडे जागतिक विचारवंतांचे लक्ष वेधले गेले आहे. आपणही नुसती सचिन जोशी यांची पाठ थोपटून भागणार नाही. त्यांचे प्रयोग आणि विचार यांचा प्रसार व्हायला हवा. कारण त्यावर भारताचे आणि आपलेही भविष्य अवलंबून आहे.
बातम्या आणखी आहेत...