आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉम्रेड, तुम्ही हवे आहात (अग्रलेख)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचा वारसा ख-या अर्थाने पुढे नेणारे, ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते, विचारवंत आणि कोल्हापूरकरांचे अण्णा कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर सोमवारी झालेला प्राणघातक हल्ला हा या समाजाचे काही तरी गंभीर बिघडले आहे, हे सांगणारा आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे नेते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात हत्या करण्यात आली तेव्हा महाराष्ट्र असाच बुचकळ्यात पडला होता. आश्चर्य म्हणजे दाभोलकर यांच्यावर ज्या पद्धतीने हल्ला करण्यात आला होता, अगदी तशीच पद्धत याही हल्ल्यात वापरण्यात आली आहे. दाभोलकर यांचे मारेकरी कोण होते, हे अजून स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे पानसरे यांच्या या हल्ल्याच्या घटनेचे गांभीर्य अधिकच वाढले आहे. विशेषत: दाभोलकर जो पुरोगामी वारसा घेऊन पुढे चालले होते, तोच वारसा सांगणाऱ्या नेत्यावरील हा हल्ला पुरोगामी विचारांवरील हल्ला आहे, असे म्हणता येईल. सरकारी यंत्रणा आणि पोलिसांनी या हल्ल्याचे महत्त्व लक्षात घेऊन तपास सुरू केलाच आहे, मात्र हा जो समान धागा आहे, त्यावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. समाजवादी आणि कम्युनिस्ट विचाराचे हजारो कार्यकर्ते- नेते समाजाच्या भल्यासाठी वर्षानुवर्षे लढतात, समानतेचा, धर्मनिरपेक्षतेचा आग्रह धरतात आणि सर्व समाजाला सोबत घेऊनच पुढे गेले पाहिजे, यासाठी वेळोवेळी आंदोलने करतात. त्यामुळेच पुरोगामी महाराष्ट्राची एक वेगळी ओळख देशात निर्माण झाली आहे. अशा पुरोगामी राज्यात होणा-या अशा हल्ल्यांचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. हे भ्याड हल्ले करणारे नेमके कोण आहेत, हे स्पष्ट होत नाही, तोपर्यंत निषेध करायचा तरी कोणाचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. एक मात्र नक्की की, फडणवीस सरकारसमोर या हल्ल्यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. अशा हल्ल्यांमुळे राज्यात जे संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे आणि समाजात ज्या प्रकारची तेढ वाढत चालली आहे, ते समाजाच्या अजिबात हिताचे नाही. त्यामुळे हल्लेखोरांचा शोध घेण्याच्या कामी थोडीही कुचराई होणार नाही, ही जबाबदारी सरकारची आहे.
आपल्या सहा दशकांच्या संघर्षात कॉम्रेड पानसरे यांनी अनेकांचे हितसंबंध दुखावले आहेत, मात्र त्यात त्यांनी कोठेही वैयक्तिक वैरभाव येऊ दिलेला नाही. राज्यातील एक प्रगल्भ नेता म्हणून त्यांची ख्याती आहे. कोल्हापुरातील पारीख पुलावरील भाजीवाल्यांचा लढा असेल, गुंडगिरीविरोधी मोर्चा असेल, गुंडगिरीविरुद्धच्या घोषणा लिहिण्याची स्पर्धा घेण्याची कल्पना असेल, वरुण तीर्थावर होणाऱ्या यज्ञातील नासाडीच्या विरोधातील जनजागरण असेल, लग्नात सहस्र भोजन देणाऱ्या यशवंतराव मोहिते यांच्या ४०० एकर जागेवर कब्जा करण्याचे आंदोलन असेल, तोडकर महाराजांच्या मठाच्या विरोधी संघर्ष असेल किंवा अगदी भारत-अमेरिका अणुकराराच्या विरोधी देशपातळीवरील आंदोलन असो, अशा शेकडो वैविध्यपूर्ण आंदोलनांना त्यांनी चालना दिली आणि पुरोगामित्वाची मशाल सतत तेवत ठेवली. अन्याय, मग तो विद्यार्थ्यांवरचा असो, शेतमजुरांवरील असो, स्त्रियांवरील असो की टोल धोरणामुळे त्रस्त झालेल्या जनतेचा; कॉम्रेड पानसरे त्याविरोधात सतत खंबीरपणे उभे राहिले. ‘शिवाजी कोण होता’ हे क्रांतिकारी पुस्तक लिहिणारे, ‘मुस्लिमांचे लाड’सारख्या पुस्तकातून मुस्लिमांच्या खऱ्या स्थितीचे चित्र मांडणारे आणि भूमिका घेण्यास समाज कचरत असताना पुरोगामी, समतावादी भूमिका घेऊन व्याख्याने, परिषदा, लेखन करून तिचा पाठपुरावा करणारे कॉम्रेड पानसरे हे प्रतिगामी समूह आणि धनदांडग्यांना सततच अडचणीचे ठरले आहेत. त्यांच्यापैकी कोणी माथेफिरू पाठवून हा हल्ला घडवून आणल्याची शक्यता नाकारता येत नाही. पुरोगामी चळवळी करत असलेल्या लढ्यांना खरोखरच समाज किती स्वीकारतो आहे आणि ते यशस्वी होत आहेत काय, असा प्रश्न या चळवळीच्या व्यासपीठांवर अलीकडे सारखा विचारला जातो आहे. या प्रश्नाचे कॉम्रेड पानसरे यांनी दिलेले उत्तर होते, ते म्हणजे ‘लढणाऱ्याचा कधीच पराभव होत नाही.’ आपल्या विचारांवर इतक्या आत्मविश्वासाने वयाच्या ८२ व्या वर्षी मार्गक्रमण करणाऱ्या नेत्यावर गोळ्या झाडून त्याचे विचार संपविण्याचा कुविचार कोणी केला असेल तर तो पुरोगामी महाराष्ट्राचा करंटेपणाच म्हटला पाहिजे. आपल्या भूमिका समाजातील सर्व थरांनी अजून स्वीकारलेल्या नाहीत, हे कॉम्रेड जाणून आहेत आणि म्हणूनच ते या वयात न थकता तिचा प्रसार करण्यात सक्रिय आहेत. कॉम्रेड रुग्णालयात जीवनमरणाची लढाई लढत आहेत. त्यांनी तर स्वत:साठी कधीच काही मागितले नाही, पण या पुरोगामी महाराष्ट्रासाठी आणि ते ज्या दीनदुबळ्यांसाठी आयुष्यभर लढत आहेत, त्यासाठी तरी ते या लढाईत यशस्वी होवोत, अशी प्रार्थना करूया.