आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Editorial About Corruption In Indian Cricket, Divya Marathi.

स्वच्छ क्रिकेटच्या अपेक्षेत (अग्रलेख)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रिकेटमधील तथाकथित भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी गेला काही काळ बऱ्याच जणांनी कंबर कसली होती. पश्चिम बंगाल क्रिकेट असोसिएशनने केलेल्या तक्रारीवरून सर्वोच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट नियंत्रक मंडळाच्या कारभारात काय सुधारणा करता येतील, याची चौकशी करून अहवाल तयार करण्यासाठी लोढा समिती नेमली. समितीचे अध्यक्ष लोढा हे माजी सरन्यायाधीश आहेत व समितीचे अन्य दोन सदस्यही न्यायाधीशच असल्याने या समितीच्या शिफारशींबद्दल उत्सुकता होती. गेल्या वर्षी जानेवारीत या समितीने काम सुरू केले आणि जुलैमध्ये पहिला अहवाल दिला. त्यानुसार चेन्नई सुपरकिंग्ज व राजस्थान रॉयल्स या आयपीएलमधील दोन संघांना घरी बसवण्यात आले. मंडळाचे माजी अध्यक्ष श्रीनिवासन यांचे जावई मय्यप्पन यांना बेटिंगसाठी दोषी ठरवण्यात आले. याच दरम्यान ललित मोदी प्रकरणाने देश ढवळून निघाला. हे प्रकरण भाजपवर निशाणा साधण्यासाठी पुढे आले असले तरी क्रिकेट मंडळाच्या कारभारकडेही लक्ष वेधले गेले. तसे ते यापूर्वीही अनेक वेळा वेधले गेले होते. देशातील क्रिकेटची लोकप्रियता वादातीत आहे. क्रिकेटवर भारतीय माणूस कमालीचे प्रेम करतो. मात्र क्रिकेट मंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्हे उमटू लागली ती क्रिकेट अतोनात श्रीमंत होत गेल्यावर. त्याआधी क्रिकेट हा आनंद देणारा खेळ होता. हार-जीतवर तावातावाने चर्चा होत असल्या तरी खेळात भ्रष्टाचार घुसल्याचे आरोप होत नव्हते. तथापि, कोणत्याही क्षेत्रात अतोनात पैसा आला की त्या क्षेत्राची सूत्रे गुणवंतांकडून धूर्त माणसांकडे जातात. क्रिकेटचे असेच झाले. १९८३ मध्ये कपिलदेवच्या संघाने विश्वचषक जिंकला तेव्हा खेळाडूंना देण्यासाठी दोन लाख रुपये मिळवताना मंडळाला नाकी नऊ आले होते. पण पुढील वीस वर्षांत मंडळाचा कारभार दहा हजार कोटींवर पोहोचला. पूर्वी काही मोजके राजकारणी क्रिकेटमध्ये रस घेत. खेळावरील खऱ्या प्रेमापोटी ते क्रियाशील होते. मात्र एकदा कोट्यवधी रुपयांचा खजिना दिसू लागल्यावर बडे राजकारणी खेळामध्ये घुसले. पुढे तर राजकारणात जम बसल्यावर क्रिकेट संघटनांमध्ये महत्त्वाच्या पदावर वर्णी लावून घेण्यासाठी विविध डावपेच टाकले जाऊ लागले. आर्थिक, राजकीय स्वार्थ साधून घेण्यासाठी मंडळाचा वापर होऊ लागला. स्पॉट फिक्सिंग, बेटिंग अशा व्यवहारांमुळे क्रिकेटमधील शुद्ध आनंद गेला आणि प्रत्येक जय-पराजय हा संशयाने काळवंडून जाऊ लागला. क्रिकेटवर धरलेली ही काजळी दूर करण्यासाठी लोढा समितीने मूलभूत सुधारणा सुचवल्या आहेत. मात्र त्यांनी सुरक्षित बेटिंगला मान्यता दिली आहे हे विशेष. फुटबॉलमधील फिफा या संघटनेकडून केलेल्या सुधारणांसारख्याच सुधारणा लोढा समितीने सुचवल्या आहेत. सुधारणा उत्तम असल्या तरी त्या अमलात येतील का आणि आल्या तरी क्रिकेट भ्रष्टाचारमुक्त होईल का, याची खात्री नाही. शिफारशी अमलात आल्या तर शरद पवारांपासून अनुराग ठाकूरपर्यंत अनेकांना घरी बसावे लागेल. मंडळातील बहुतेक सर्व बड्या मंडळींचे हितसंबंध धोक्यात येतील. क्रिकेट निवड समितीवरील या मंडळींचे वर्चस्व संपेल. वर्षानुवर्षे एकाच पदावर ठाण मांडून बसता येणार नाही. खेळाडूंना मंडळाचे कर्मचारी असल्याप्रमाणे वागवता येणार नाही. क्रिकेटचे आश्रयदाते म्हणून मिरवणाऱ्या अनेकांना तीन वर्षांच्या वर क्रिकेट मंडळांवर राहता येणार नाही. मुंबई, महाराष्ट्र तसेच गुजरातचे वजन कमी होईल. मंडळासाठी सर्वात कटकटीची सूचना म्हणजे बीसीसीआयला माहिती अधिकाराचा कायदा लागू होईल. संघाची निवड ही क्रिकेटपटूंकडूनच होईल. क्रिकेटच नव्हे तर सर्वच क्रीडा क्षेत्राची स्वच्छता गरजेची झाल्यामुळे यांचे स्वागत होईल. कोणाही व्यक्तीला तीन वर्षांहून अधिक काळ एकाच पदावर सलग राहता येणार नाही ही सर्वात चांगली सूचना आहे व त्याच्या अंमलबजावणीसाठी आग्रह धरला पाहिजे. निवड समितीमधील हस्तक्षेपही दूर केला पाहिजे. सध्या मंडळ पैसेवाले असले तरी जगातील सर्वोत्कृष्ट संघांत भारत नाही हे लांच्छनास्पद आहे. थोडा तटस्थ विचार केला तर गेल्या काही वर्षांत मंडळाने स्वत:हूनच बऱ्याच सुधारणा केल्या आहेत. कितीही टीका केली तरी एक गोष्ट मान्य करावीच लागते की मंडळाने क्रिकेटपटूंना बरे दिवस आणले. आज थोडेफार क्रिकेट खेळणाऱ्यालाही मंडळाने आर्थिक सुरक्षा मिळवून दिली आहे. शशांक मनोहर यांनी कारभार हाती घेतल्यापासून हितसंंबंधी व्यवहारांना चाप लावला आहे व कारभारात पारदर्शकताही आणली आहे. क्रिकेटमध्ये सर्व काही आलबेल नसले तरी हा खेळ भ्रष्टाचाराने लडबडलेला आहे, असेही म्हणणे योग्य ठरणार नाही. परंतु कोणत्याही यशाकडे व श्रीमंतीकडे संशयाने पाहण्याची सवय भारतीयांच्या हाडीमांसी मुरलेली असते. नैतिकतेचा कैफ अनेकांना असतो व त्या कैफात वाद घालणारे अनेक असतात. क्रिकेटमध्ये घुसलेल्या अनेक उपटसुंभांमुळे अशा वाद घालणाऱ्या मंडळींना वजन प्राप्त होते. पण मलिदा खाण्यासाठी क्रिकेटकडे आलेल्यांना मंडळाबाहेर फेकण्याची कामगिरी शशांक मनोहर यांच्या अध्यक्षतेखालील सध्याच्या कार्यकारिणीने बजावली तरी क्रिकेटचे भले होईल.