आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"कोर्ट'ची पायरी! (अग्रलेख)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या शतकाच्या पूर्वार्धात म्हणजे साधारण तीस ते चाळीसच्या दशकात मराठी चित्रपटांचा (प्रभातचे चित्रपट) एक प्रकारे दबदबा होता. चित्रतपस्वी व्ही. शांताराम व त्यांच्या सहकाऱ्यांना चित्रपट माध्यमाची ताकद लक्षात आल्याने व या मंडळींना हे नवमाध्यम तंत्रज्ञानाधिष्ठित असल्याचे लवकर कळल्याने त्यांनी मराठी चित्रपटाला मनोरंजनाच्या चौकटीत न अडकवता त्याला व्यापक सामाजिक भान देण्याचा प्रयत्न केला. हे भान देताना त्यांनी हा सिनेमा बंदिस्त केला नाही की त्याचा फॉर्म्युला केला नाही की तो प्रेक्षकशरण केला नाही. दुर्दैवाने एवढी भक्कम पायवाट तयार असूनही मराठी सिनेमा प्रभातच्या अस्तानंतर विषयांबरोबरच तंत्रज्ञानाच्या पातळीवरही वेगाने घसरत गेला व एक वेळ अशी आली की, व्हिडिओ पायरसी व बॉलीवूडच्या आक्रमणात मराठी चित्रपट अखेरचा श्वास मोजत होता; पण संदीप सावंत यांच्या "श्वास'ने अक्षरश: मराठी चित्रपटसृष्टीला जीवनदान दिले. उत्तम विषय, उत्कृष्ट मांडणी व अभिनय यांच्या पातळीवर या चित्रपटाने सुवर्णकमळ ते ऑस्कर अशी धडक मारली. या स्थित्यंतरामुळे मराठी चित्रपटसृष्टीत ऊर्जा निर्माण होऊन कलाकारांना या माध्यमाची ताकद, त्याचा आवाका लक्षात यायला लागला. त्यानंतर विषय, मांडणी, अभिनय, तंत्रज्ञान, वितरण यांच्या पातळीवर मराठी चित्रपटाने कात टाकण्यास सुरुवात केली. आता पुढील वर्षी होणाऱ्या ऑस्कर पुरस्कारामधील सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपट वर्गवारीत भारतीय चित्रपट म्हणून "कोर्ट' चित्रपट पाठवण्याचा निर्णय फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने घेतल्याने भारतीय (मराठी) चित्रपटाने एक मोठा टप्पा गाठला आहे. टप्पा यासाठी की, या चित्रपटात काही पात्रांचे संवाद मराठी असले तरी अन्य पात्रांचे संवाद हिंदी, इंग्रजी, गुजराती आहेत व तो एका अर्थाने बहुभाषिक भारताचे प्रतिनिधित्व करतो आहे. त्यातच या चित्रपटाने एकंदरीत सर्वच बॉलीवूड, मॉलीवूड, टॉलीवूड किंवा अन्य प्रादेशिक भाषांमध्ये होणाऱ्या चित्रपटांपेक्षा वेगळी, हटके, प्रस्थापित झालेल्या चित्रपटमूल्यांना धक्का देणारी मांडणी केल्याने त्याची दखल केवळ देशीच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही आवर्जून घेण्यात आली. भारतातील सामाजिक प्रश्न, विविध जातींमधील सुप्त असा संघर्ष व प्रस्थापित व्यवस्था यांना प्रतिमांच्या भाषेत धाडसाने मांडल्याने या चित्रपटाचा दिग्दर्शक व लेखक चैतन्य ताम्हाणे अभिनंदनाला पात्र आहे.
आता पुढची लढाई आहे ती ऑस्कर पुरस्कारासाठी. कारण ऑस्करसाठी येणारे चित्रपट अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स अँड सायन्सेसच्या शेकडो सदस्यांकडून पाहिले जातात. प्रत्येक चित्रपटावर मतदान केले जाते. या सदस्यांनी चित्रपट पाहावा, त्यावर मत बनवावे म्हणून लॉबिंग करावे लागते. लॉबिंग म्हणजे लाच देणे नव्हे, तर चित्रपटातील निर्मिती मूल्ये, वैश्विक सत्य या सदस्यांना पटवून द्यावे लागते. जे चित्रपट निर्माते-वितरक खर्च उचलू शकतात, त्या सर्वांनाच ऑस्कर मिळते असेही नसते, पण अशा प्रयत्नांमुळे चित्रपटाविषयी सदस्यांची मते वळवता येतात, हे मात्र नक्की. "कोर्ट' हा तसा कमी बजेटचा चित्रपट आहे व बॉक्स ऑफिसवरही खूप हिट झाला असेही नाही. त्यामुळे या चित्रपटाच्या निर्माते-वितरकांपुढे आर्थिक संकट निश्चितच आ वासून उभे राहिले असेल. या चित्रपटातील काही कलाकारांनी लोकवर्गणी किंवा संस्थात्मक मदतीसाठी आवाहन केले आहे, असे आवाहन करणे चुकीचेही नाही. ते रास्तच आहे. कारण यासारखे चित्रपट खऱ्या अर्थाने सामाजिक दस्तऐवज मांडणारे असतात व ते दीर्घकाळाने निर्माण होत असतात. कोर्टचे यश केवळ तो उत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट म्हणून नाही, तर त्याला विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरांवर, फिल्म महोत्सवांमध्ये २७ पुरस्कार मिळालेले आहेत. जगातल्या बहुतांश प्रतिष्ठेच्या वर्तमानपत्रांनी, मीडिया हाऊसेसनी, दिग्गज समीक्षकांनी या चित्रपटाच्या मांडणीची स्तुती केली आहे, त्याची वाखाणणी केली आहे. एकंदरीत ज्या वर्तुळात अशा चित्रपटांचे प्रमोशन व्हावे लागते, तो टप्पा "कोर्ट'ने गाठला आहे. तरीही मानाचा ऑस्कर पटकावयाचा असेल तर अजून ताकदीने प्रयत्न करण्याची गरज आहे. राज्य सरकारने ऑस्कर लॉबिंगसाठी मदतीचा हात पुढे करण्याची गरज आहे. चित्रपट निर्मितीला सरकार अनुदान देत असतेच, पण सरकारने एवढ्या मर्यादेत काम न करता उत्तम चित्रपटांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रमोशनसाठी जोमाने प्रयत्न करण्याची गरज आहे. काही वर्षांपूर्वी आशुतोष गोवारीकर यांचा "लगान' ऑस्करच्या अंतिम फेरीत गेला होता, त्यामागचे कारण म्हणजे अभिनेता आमिर खानने "लगान'साठी मोठ्या प्रमाणात लॉबिंग केले होते. नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांनी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आर्थिक निधी जमा करण्याचे एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. तसेच प्रयत्न "कोर्ट'साठीही व्हावेत म्हणून मराठी, हिंदी किंवा अन्य प्रादेशिक चित्रपटसृष्टीने, चित्रपट रसिकांनी पुढे येण्याची गरज आहे. आपण सर्वांनी ऑस्कर पुरस्कार मिळावा म्हणून "कोर्ट'ची बाजू घेतली पाहिजे.