नोटाबंदीच्या विरोधातील जनभावनांची सरकारला जाणीव करून देण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने ६१ दिवसांनंतर सोमवारी आंदोलन केले. याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. नोटाबंदीनंतरच्या अडचणी चीड यावी इतक्या तीव्र नाहीत, असा एक निष्कर्ष यातून काढावा लागतो किंवा मोदींबद्दल तीव्र चीड असली तरी काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यावर जनतेचा विश्वास नाही, असा दुसरा अर्थ निघतो. राजकीय परिणामांसारखीच संदिग्धता आर्थिक परिणामांबाबत आहे. देशातील करसंपदा १४ टक्क्यांनी वाढल्याचे अर्थमंत्री जेटली यांनी सांगितले. नोटाबंदीनंतर बऱ्याच व्यापाऱ्यांनी, व्यावसायिकांनी व नागरिकांनाही जुन्या नोटा देऊन करभरणा केल्यामुळे ही जमा वाढलेली दिसते. म्हणजे तो तात्पुरता फायदा आहे. नोटाबंदीचे दुष्परिणाम जसे तात्पुरते, तसा हा फायदाही तात्पुरता म्हटला पाहिजे. लोक अजूनही मोदींच्या बाजूने आहेत, हे विदर्भ व मध्य प्रदेशातील निकालांवरून म्हटले तरी कन्झ्युमर सेंटिमेंट इंडेक्स, म्हणजे ग्राहकांचा मूड कसा आहे हे सांगणारा निर्देशांक पाहिला तर विश्वास कमी झालेला दिसतो. जानेवारीत या निर्देशांकाने आठ अंशांनी
आपटी खाल्ली. नोटाबंदीच्या मधल्या काळात हा निर्देशांक खूप वर चढला होता. मात्र, पन्नास दिवस पूर्ण झाल्यावर मोदींनी केलेल्या भाषणानंतर तो घसरण्यास सुरुवात झाली. मोदींबद्दलच्या अपेक्षा भाषणातून पूर्ण न झाल्याने ग्राहकांचा मूड बदलत गेला. नोटाबंदीच्या यशाबद्दल लोक जितके नि:शंक ३० डिसेंबरपूर्वी होते तितके आता राहिलेले नाहीत हे यातून दिसून येते. याचा राजकीय परिणाम काय होईल हे सांगणे कठीण आहे. मोदींचा मोठा पराभव होण्याची ही ‘शुभचिन्हे’ आहेत, असे विरोधक म्हणतील व त्यानुसार लेख वगैरे लिहून कामालाही लागतील. तथापि, नोटाबंदीच्या फायद्याबद्दल लोकांमध्ये थोडी नाराजी येत असली तरी राजकीय नेता म्हणून मोदींवरील विश्वासाला तडा जात आहे, असे वाटत नाही. चुकीचा का होईना, निर्णय घेण्याची धमक तरी या व्यक्तीत आहे, असे म्हणणारे लोक बरेच आहेत. या निर्णयात व्यक्तिगत स्वार्थ वा भ्रष्टाचार दिसत नाही ही मोदींसाठी जमेची बाजू. ती विरोधकांकडे नाही. नोटाबंदीमुळे कुणी भिकेला लागलेले नाही. उलट बेरोजगारीचा दर ऑक्टोबरपेक्षाही कमी आहे. ग्रामीण भागातील रोजगारांवर गदा आलेली नाही. हे कशामुळे होत आहे हे अद्याप अर्थशास्त्रज्ञांना उमगलेले नाही. रोजगार व महागाई हे दोन्ही आटोक्यात असल्यामुळे नोटाबंदीचे राजकीय चटके मोदींना बसलेले नाहीत.