आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोनीकडील वारसा (अग्रलेख)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
योग्य निर्णय, योग्य वेळी, सहजतेने घेणे हे यशस्वी नेतृत्वाचे वैशिष्ट्य. हे वैशिष्ट्य मैदानाप्रमाणेच कर्णधारपदावरून पायउतार होतानाही धोनीने दाखवले. फलंदाजी व यष्टिरक्षण ही धोनीची क्रिकेटमधील दोन क्षेत्रे. या दोन्ही ठिकाणी ‘टायमिंग’ महत्त्वाचे. निवृत्त होताना धोनीने टायमिंग साधले. त्याच्या खेळात आता वय दिसू लागले होते. डावपेचांतील चमक कमी होत होती. खेळातील नव्या पिढीची शैली वेगळी होती. त्यांना त्यांचा खेळ खेळायचा होता. हा बदल धोनीने बरोबर टिपला. आता उरलेली थोडी वर्षे त्याच्यातील कलंदर फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. धोनीची काहीशी रांगडी फटकेबाजी एकेकाळी उच्चभ्रू क्रिकेट समीक्षकांना पसंत नव्हती. कपड्यांचे धुपाटणे व धोनीची बॅट यात फारसा फरक नाही, असे बोलले जाई. पण रांचीसारख्या छोट्या शहरातील हा छोकरा समीक्षकांकडे दुर्लक्ष करून आपली शैली खुलवत राहिला आणि बघताबघता यशशिखरावर पोहोचला. स्वत:बरोबर संघाला यश मिळेल हेही पाहिले. संघाला अडचणीतून बाहेर काढण्यास धोनीची मदत झाली नाही, असे क्वचितच घडले. द्रविडप्रमाणे धोनी हेही अत्यंत भरवशाचे कुळ झाले.
 
धोनीचा उदय हा भारतीय क्रिकेटमधील महत्त्वाचा टप्पा होता. क्रिकेट व हिंदी चित्रपट हे भारतीय समाजाचे आरसे आहेत. भारतीय समाज कसा बदलत आहे हे जाणून घ्यायचे असेल तर मैदानावर व पडद्यावर चाललेल्या घडामोडी पाहाव्यात. गेली दोन दशके भारतीय समाज आत्मविश्वासाकडे वाटचाल करत आहे. धोनी हे त्याचे एक प्रतीक. स्वातंत्र्योत्तर काळात सर्व समाजाप्रमाणे क्रिकेटही ब्रिटिश संस्कृतीखाली दबलेले होते. उच्च मध्यमवर्गीयांचे ते राखीव कुरण होते. नशिबाने मिळणाऱ्या एखाद-दुसऱ्या विजयानेही समाजात कौतुकाची भरती येई. बड्या संघासमोर भारताचा संघ दबूनच राही. संघात आत्मविश्वासाचा पहिला स्फुल्लिंग टाकला तो सुनील गावसकरने. वेस्ट इंडीजच्या तोफखान्यासमोर ही बटुमूर्ती हेल्मेट न घालता कणखरपणे उभी राहिली आणि भारतीयांनी डोळे विस्फारले. गावसकरला भक्कम आधार होता तो अजित वाडेकर या कुशल कर्णधाराचा. धोनीमध्ये आज प्रकर्षाने दिसणारे अनेक गुण वाडेकर यांच्यामध्ये सुप्तरूपात होते. मात्र, त्या वेळी त्याला वाव मिळाला नाही, कारण तेव्हाचे भारतीय क्रिकेटही बाल्यावस्थेत होते. गावसकरने टाकलेला हा स्फुल्लिंग चेतवला कपिल देवने. आपण आक्रमक क्रिकेट खेळू शकतो, विजय खेचून आणू शकतो, या आत्मविश्वासाची जाणीव ही कपिलची देणगी. कपिलच्या गोलंदाजीत त्वेष असे. प्रतिस्पर्धी संघाची सलामीची जोडी पन्नासच्या आत फोडण्याची जिद्द असे. कपिलचा हा त्वेष व जिद्द उचलली सौरभ गांगुलीने. 

भारतीय क्रिकेट संघ उघडपणे आक्रमक झाला. ‘अरे ला कारे’ करण्याची हिंमत आली व लॉर्ड््सच्या मैदानावर दादाने त्याचे प्रदर्शनही केले. शिष्ट लोकांनी नाके मुरडली तरी भारतीय जनता खुश होती. दबलेल्या समाजाला आत्मविश्वास मिळत होता. याच दरम्यान बीसीसीआयची सूत्रे दालमिया यांच्याकडे आली. ‘डॉलरमियां’नी पैशाबरोबर भारतीय क्रिकेटचे ‘मंडलायझेशन’ केले. लहान शहरांतील कनिष्ठ मध्यमवर्गीयांसाठी क्रिकेटची दारे उघडली. क्रिकेटमधील गुणवत्ता एकदम विस्तारली. धोनी हे त्याचे उत्तम उदाहरण. गावसकरचा कणखरपणा, कपिलचा त्वेष, दादाची आक्रमकता या गुणांना धोनीने जोड दिली ती थंड, स्थिर बुद्धीने विचार करण्याची. या गुणांच्या मानसिक व्यवस्थापनाची. स्वत:बरोबर संघातील गुणांचे काटेकोर व्यवस्थापन केल्यानेे धोनी ‘कॅप्टन कूल’ बनला. त्याची व्यवस्थापनाची कला यापुढेही क्रिकेटला उपयोगी पडू शकते. फुटबॉलमधील सर अॅलेक फर्गुसनप्रमाणे धोनी यशस्वी संघ व्यवस्थापक होऊ शकतो. धोनीच्या थंड डोक्याचा प्रभावामुळे प्रतिस्पर्धीही दबून असत, असा अनुभव सहकाऱ्यांनी नोंदला आहे. स्वत:सह परिस्थितीवर विलक्षण नियंत्रण असणारा माणूस, अशी धोनीची ख्याती झाली व प्रतिस्पर्धी संघांच्या कर्णधारांनीही ती उघडपणे मान्य केली. 

गोंधळ, गडबड, अराजक हे भारतीय समाजाचे वैशिष्ट्य. पण या समाजातही थंड डोक्याने, यशाचा विचार करणारे लोक उद्योगापासून राजकारणापर्यंत विविध क्षेत्रांत चमकत आहेत. क्रिकेटमधील बदलांची प्रतिबिंबे समाजातही आढळतील. हा धोनी इफेक्टही म्हणता येईल. त्यांची संख्या कमी असली तरी नगण्य नाही. पूर्वी क्रिकेट हा नशिबावर सोपवला जात असे. आता यशाचे भारतीयांना व्यसन लागले आहे. गावसकर, कपिल, गांगुली, द्रविड, सचिन, सेहवाग, धोनी, विराट यांना मैदानावर पाहताना आत्मविश्वासाची लहर शरीरात चमकून जाते. खेळातील पैशावरून नाके मुरडणे हा किरकिऱ्या लोकांचा उद्योग असतो. खेळातील विजयातून समाजात चैतन्य उसळते व त्याचे परिणाम अन्य क्षेत्रांवरही होतात. भारताला यशाची चटक लावण्याची कामगिरी महेंद्रसिंग धोनीने केली. हे त्याचे योगदान मोठे आहे.
बातम्या आणखी आहेत...