आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रम्प यांचा धुडगूस (अग्रलेख)

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेतल्या अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रचारादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी ओबामा प्रशासनाच्या इराक व अफगाणिस्तान धोरणाची यथेच्छ टिंगल उडवली होती. अफगाणिस्तानातून अमेरिकी फौजा टप्प्याटप्प्याने मागे घेण्याचे आश्वासन ओबामा यांनी त्यांच्या कार्यकाळात पुरे केले. त्याचबरोबर इराकमधूनही अमेरिकी फौजा माघारी घेतल्या होत्या. त्यावर ट्रम्प नाराज होते. अमेरिकेचा अफगाणिस्तान प्रश्नामधील एकूणच सहभाग ‘विनाशकारी’ होता, असे वक्तव्य त्यांनी केले होते. 

‘विनाशकारी’ म्हणजे काय? याबाबत त्यांनी स्पष्ट मते व्यक्त केली नाहीत, पण अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर दोन महिन्यांतच म्हणजे शुक्रवारी अफगाणिस्तानवर महाबॉम्ब टाकून ट्रम्प यांनी जगाला चिंता वाटावी असे वातावरण तयार करून ठेवले. आपल्याच भूमिकेमध्ये सातत्य नसणे, कुणाचीच पर्वा न करता चक्रमपणे एकाएकी निर्णय घेणे हे ट्रम्प यांच्या कारभाराचे एकूण स्वरूप झाले आहे. आता ट्रम्प यांच्या बेजबाबदार गुणामुळे जग पुन्हा दुभंगते की काय अशी भीती निर्माण झाली आहे. ज्या अफगाणिस्तानच्या ननगरहर प्रांतात अमेरिकेने हा महाबॉम्ब टाकला त्या प्रांतात तोराबोरा टेकड्या आहेत. याच टेकड्यांमध्ये न्यूयॉर्कमध्ये ९/११ चा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर अमेरिकेने अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन लपला असल्याच्या संशयावरून तुफान बॉम्बवर्षाव केला होता. 

आता या ननगरहर प्रांतात इसिसच्या दहशतवाद्यांनी आसरा घेतल्याच्या संशयावरून अमेरिकेने हा मोठा हल्ला केला. अमेरिकेतील प्रसारमाध्यमेही ट्रम्प यांच्या अशा आततायी वर्तनाने चकीत झालेले आहेत. राष्ट्रवादाच्या उन्मादामुळे अमेरिकेतील प्रसारमाध्यमांमध्येही फूट पडल्यासारखे वातावरण दिसत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे खुद्द ट्रम्प यांनी महाबॉम्ब टाकण्याचा निर्णय घेतला असे न सांगता अमेरिकेच्या लष्कराला योग्य ते काम करण्याच्या सूचना दिल्याचे म्हटले आहे. अमेरिकेचे लष्कर अमेरिकेच्या हितासाठी त्यांना योग्य वाटेल ते निर्णय घेईल, अशीही पुस्ती त्यांनी जोडली आहे. 

अमेरिकेने अफगाणिस्तानमधील ननगरहर प्रांत महाबॉम्ब टाकण्यासाठी का निवडला याची राजकीय कारणे अनेक आहेत. एक म्हणजे या प्रांतात इसिसच्या दहशतवाद्यांनी मोठ्या प्रमाणात घुसखोरी केली असून तेथे ते नव्या पलटणी उभ्या करत आहेत. हा प्रांत पाकिस्तानच्या सीमारेषेनजीक असल्याने तेथून येणाऱ्या बेरोजगार तरुणांना इसिस अफगाणिस्तानचे लष्कर व तालिबानपेक्षा अधिक पैसे देते. त्याचबरोबर या प्रदेशातून अमली पदार्थ, शस्त्रास्त्रांची तस्करी मोठ्या प्रमाणात होते. 

इसिसने अफगाणिस्तानात आपले बस्तान बसवण्याच्या दृष्टीने शेकडो गुहा व बोगदे तयार केले आहेत. इसिसची ही येथील सगळी सामरिक सज्जता एका हल्ल्यात नेस्तनाबूत करण्यासाठी अमेरिकेने हा हल्ला घडवून आणल्याचे समजते. काही आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या मते गेल्या महिन्यात मॉस्कोमध्ये रशिया-चीन-पाकिस्तानचे अधिकारी व तालिबानचे काही नेते यांच्यामध्ये एक बैठक होऊन त्यामध्ये अफगाणिस्तानच्या प्रश्नाविषयी चर्चा झाली. ही चर्चा म्हणजे तिन्ही देशांनी अफगाणिस्तानच्या नव्या राजकीय बांधणीत दाखवलेले स्वारस्य होते. भविष्यात रशियाच्या फौजांनी अफगाणिस्तानात पुन्हा प्रवेश केल्यास अमेरिकेला शह मिळू शकतो व त्यामुळे प. आशियात इसिसला व तालिबानला अप्रत्यक्ष बळ मिळू शकते अशी भीती अमेरिकेला या बैठकीनंतर वाटू लागली होती. परिणामी महाबॉम्बसारखा पर्याय वापरून रशिया, पाकिस्तान, चीनच्या मनसुब्यांना सुरुंग लावण्याचा अमेरिकेचा हा प्रयत्न होता. 

यापुढे भविष्यात अमेरिका कोणत्याही थराला जाईल असा अंदाजही लावू शकतो. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेने सिरियात ५९ टॉम हॉक क्षेपणास्त्रे डागून असाद सरकार व रशियाला इशारा दिला होता. त्यात काही दिवसांपूर्वी रशियाशी मैत्रीची भाषा करणारे ट्रम्प, रशियासोबतचे संबंध खूप खालावले असल्याचे आता सांगत आहेत. हा सगळा युद्धज्वर ट्रम्प यांना अमेरिकेतील राजकारण पाहता सोयीचा आहे. कारण अमेरिकेचे लष्करी सामर्थ्य अजूनही अबाधित आहे व ते पूर्वीच्या राजवटीच्या-ओबामा राजवट- तुलनेत  वाढले आहे अशा डरकाळ्या ट्रम्प आतापासून फोडू लागले आहेत. 

अमेरिकेत रिपब्लिकन पक्षाची सत्ता जेव्हा येते तेव्हा ते जगाच्या कानाकोपऱ्यात धुडगूस घालतात हा इतिहास आहे. ट्रम्प हे त्याच रिपब्लिकन पक्षाचे नेते आहेत. पण त्यांचा व्यक्तिविशेष म्हणजे त्यांना अन्य रिपब्लिकन नेत्यांपेक्षा आपण वेगळे आहोत हे दाखवण्याची हौस आहे. जगाचा उद्धार आपणच करू शकतो व अमेरिकेचे हित आपल्यालाच जास्त कळते अशा आविर्भावात त्यांचे राजकीय निर्णय घेणे सुरू आहे. त्याची झळ जगाला बसणार यात शंका नाही.
बातम्या आणखी आहेत...