आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लाचार आणि स्वाभिमानी (अग्रलेख)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशातील सर्वात प्रगत आणि पुरोगामी समजल्या जाणार्‍या महाराष्ट्रात शेतकरीराजा आत्महत्या करतो आहे आणि सरकारला वाटतात त्या सर्व उपाययोजना करूनही तो स्वत:चा जीव का देतो आहे, हे कोणाला कळेनासे झाले आहे. त्यामुळे अर्थतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, समाज, माध्यमे आणि सरकार चिंतेत आहे. बरे, या आत्महत्या आताच होत आहेत, असे नाही. गेली काही दशके त्या सुरूच आहेत. त्या थांबाव्यात यासाठी सरकारने समित्या नेमून झाल्या, स्वयंसेवी संस्थांनी स्वतंत्र प्रयत्न करून पाहिले, माध्यमांनीही स्वतंत्र अहवाल तयार केले. एवढेच नव्हे, तर त्या त्या अहवालानुसार सरकारने काही उपाययोजना करून पाहिल्या आणि हा क्रम गेली किमान तीन दशके सुरूच आहे. तरीही आत्महत्या थांबलेल्या नाहीत.

महाराष्ट्र शासनाच्या आकडेवारीनुसार वर्षभरात राज्यात ७२४ शेतकर्‍यांनी, तर उर्वरित देशात या काळात ११२ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. याचा अर्थ देशात सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रातील शेतकरी करत आहेत! त्यामुळे त्याची चिंता दिवाकर रावते यांना आणि सरकारला लागली आहे, ही चांगली गोष्ट आहे. दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना मदत दिली, सवलतीत वीज दिली, शैक्षणिक शुल्क माफ करून झाले, तरीही आत्महत्या का थांबत नाहीत, असा प्रश्न मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित झाला आणि पुन्हा एक अभ्यास समिती स्थापण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांना करावी लागली. आता ही अभ्यास समिती काय शोधून काढते, हे पाहायचे.

आतापर्यंतच्या समित्यांना कळले नाही, ते आम्हाला कळले, असा आमचा दावा नाही, मात्र सरकार या प्रश्नाविषयी खरोखरच गंभीर असेल तर शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचा वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची वेळ आली आहे. सवलती, अनुदान, मदत असे माणसाला लाचार करणारे तुकडे फेकण्याची पद्धत आता रूढ झाली आहे. हे तुकडे आज घेतले जातात, कारण पैशीकरण झालेल्या व्यवस्थेत जगण्याचे सगळे मार्ग पैशांच्या वाटेने जाऊ लागले आहेत. संसार रेटण्यासाठी या तुकड्यांचा उपयोग होतोच. मात्र, त्यामुळे भारतीय माणसांत असलेला स्वाभिमान ठेचला जातो. असा स्वाभिमान ठेचला गेलेला बहुतांश भारतीय समाज आज गटागटाने ते ‘परवडणारे’ आयुष्य जगतो आहे. असे लाचार आयुष्य नाकारायचे तर नेमके करायचे तरी काय, असा गहन प्रश्न त्याच्यासमोर निर्माण झाला तेव्हा त्यातील अनेकांनी शहरे जवळ केली.

शहरातील ती न झेपणारी गती आणि अगतिकता स्वीकारली आणि आपणही त्यातलेच आहोत, असे मूकपणे जाहीर करून टाकले. पण तो स्वाभिमान रक्तात पुरेपूर भिनला आहे, त्या शेतकरी समाजातील काही जणांनी तसे करण्यास नकार दिला. मात्र, त्याच्या लक्षात आले की आता मुले आपले ऐकत नाहीत. त्यांच्या मागण्या आपण पूर्ण करू शकत नाही. ज्या इंग्रजी शिक्षणाचा बोलबाला आहे, ते शिक्षण आपण मुलांना देऊ शकत नाही. एवढेच काय, पण आपल्या मुलीबाळींचे लग्न करण्याचे कर्तव्य बजावण्यातही आपण कमी पडतो आहोत. नव्या जगाच्या स्पर्धेत आपला निभाव लागत नाही आणि हे दु:ख व्यक्त करण्यासाठीची ठिकाणेही राहिली नाहीत. धरणीमातेची पूजा म्हणून केला जाणारा हा व्यवसायच आतबट्ट्याचा झाला आहे. जो तो येतो आणि शेती कशी करायची ते सांगतो, कसे जगायचे ते सांगतो आणि तू किती जुनाट जगणे जगतोस, याची सारखी जाणीव करून देतो. ही जी भावना नव्या व्यवस्थेने आज समाजात निर्माण केली आहे, ती त्याला आत्महत्या करायला भाग पाडते आहे. त्याच्या स्वाभिमानाला अशा किती ठेचा लागल्या आहेत, त्याची गणती नाही. याही परिस्थितीत त्याने उभे राहण्याचा प्रयत्न केला खरा; पण व्यवस्थेने खेळाचे सर्व नियमच बदलून टाकले आहेत. जो पैसा त्याला कुचकामी वाटत होता, तोच त्याला आता नाचवितो आहे. हे नाकारलेपण आजचे नाही.

गेल्या शतकापासून ते त्याच्या मागे लागले आहे. केवळ एकविसाव्या शतकाच्या गोष्टी करणार्‍या राजकीय नेत्यांना, शेतीतज्ज्ञ म्हणून पोट भरण्यासाठी नोकर्‍या करणार्‍यांना, शेतकर्‍यांच्या प्रश्नांचे राजकारण करून त्या पैशीकरणाच्या व्यवस्थेत पळून जाणार्‍या म्होरक्यांना आणि शेतीमाल किती महाग झाला, यावरून गळा काढणार्‍या मध्यमवर्ग म्हणवणार्‍या उपर्‍यांना हे नाकारलेपण कसे कळणार? आजच्या व्यवस्थेने अशा सर्वांना लाचार करून सोडले आहे. कसदार शेती आणि रसदार आयुष्य इतिहासात जमा झाले, असा हा असंवेदनशील प्रवास या शतकांनी केला आहे आणि सरकारांनी त्यात नित्यनियमाने तेल ओतण्याचे काम केले आहे. हे नाकारलेपण काय असते, हे समजून घेण्याची पात्रता ज्या क्षणाला आधुनिक समाज मिळवेल, त्या क्षणाला शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबतील, असे आमचे मत आहे. ते समजले की मग त्यासाठी काय करायला हवे, हे सांगण्यासाठी तज्ज्ञांची गरज लागत नाही. निखळ संवेदनशील मन मात्र लागते.