आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थरार ‘किक’चा (अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येत्या महिनाभरात भारतीयांची रात्रीची झोप उडणार आहे. आजपासून ब्राझीलमध्ये सुरू होणार्‍या विश्वकप फुटबॉल स्पर्धेने सध्या तमाम क्रीडाविश्वाला ग्रासले आहे. 68 हजार प्रेक्षक क्षमतेच्या साओपावलोच्या नव्या कोर्‍या कोरिंथिआस स्टेडियमवर गुरुवारी उद्‍घाटन सोहळा होईल. 25 मिनिटांच्या या आटोपशीर सोहळ्यात 600 नर्तक, जिम्नॅस्ट, ट्राम्पोलिन कलाकार, उंच काट्यांवर चालणारे कलाकार, जेनिफर लोपेझचे संगीत, रॅप संगीताचा अमेरिकन बादशहा पीटबुलचे ‘ओले ओला’ आणि ब्राझीलची गायिका क्लॉडिया लेटीचा कर्णमधुर आवाज यांनी आटोपशीर सोहळा होईल. ब्राझीलची मार्शल आर्ट कला नृत्याच्या रूपात सादर होईल. दिवसा होणार्‍या या सोहळ्यात फटाक्यांची आतषबाजी दिसणार नाही. मात्र, त्यानंतरच्या यजमान ब्राझील आणि क्रोएशिया यांच्यातील रोमहर्षक लढतीपुढे सारे काही फिके असेल. 1500 कलाकारांची उपस्थिती ही 2010 च्या विश्वचषक उद्‍घाटन सोहळ्याचे आकर्षण होते. बिशप डायमंड टूटू यांची उपस्थिती हे आकर्षण होते. 2006 च्या स्पर्धेत जर्मनीने 150 माजी विश्वविजेत्यांना समारंभात आणून सर्वांनाच थक्क केले होते. 1998 च्या स्पर्धेत फ्रान्सने ‘मॅजिकल गार्डन’ची जादू सर्वांना दाखवली होती. ब्रिटनने शाळकरी मुलांना 16 देशांचे राष्ट्रध्वज आणि गणवेश घालून उतरवले होते. पण 2014 च्या विश्वचषक स्पर्धेच्या उद््घाटन सोहळ्याने ब्राझीलच्या नैसर्गिक संपत्तीला, खजिन्याला, लोकांना आणि फुटबॉलला, साम्बा संगीताला कुर्निसात केला आहे. प्रचंड उकाडा, कामामुळे झालेली दमछाक, तरीही चेहर्‍यावरचे स्मितहास्य कमी होऊ न देण्याची कला साध्य केलेल्या ब्राझीलवासीयांना सलाम. खंडप्राय असणार्‍या या देशाने आंतरराष्ट्रीय राजकारणात कधीही ‘बिग ब्रदर’ची भूमिका बजावली नाही. मात्र गेल्या दशकात त्यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली. भूकंपग्रस्त हैती या देशाच्या पुनर्वसनात ‘युनो’ची भूमिका बिंबवली होती. जागतिक पर्यावरणाची काळजी करणार्‍या देशांमध्ये ते अग्रेसर राहिले. इराणच्या आण्विक धोरणांच्या विरोधात उभे राहिले. पोर्तुगिजांचे वर्चस्व असणार्‍या या देशाच्या 90 कोटी लोकसंख्येच्या चेहर्‍याचा रंग कधी आणि कसा बदलत गेला ते कुणालाच कळले नाही. सप्तरंगी, बहुरंगी, बहुढंगी व्यक्तिमत्त्वाच्या नागरिकांच्या या देशाने ‘रेनबो नेशन’ अशी स्वत:ची ओळख निर्माण केली. जगातील प्रत्येकाला आसरा दिला. भारतात जशी दहा-बारा मैलांवर भाषा बदलत गेली तशीच या महाकाय देशाची पोर्तुगीज ही राष्ट्रभाषा असली तरीही तब्बल 170 पोटभाषा तयार झाल्या. भाषेची एवढी प्रचंड विविधता असणार्‍या या देशाने सांस्कृतिक वारसा जपतानाही तीच गोष्ट साध्य केली. बोलीभाषेची एवढी विविधता, संपन्नता असूनही या देशात स्पॅनिश ही भाषा बोलली जात नाही हेही एक आश्चर्य आहे. उष्ण कटिबंधाच्या, सोनेरी वाळूचे किनारे असणार्‍या या देशात हिमवर्षावही होतो, हेही न पटणारे एक सत्य आहे. अ‍ॅमेझॉनच्या विळख्यात जवळजवळ निम्मा देश आला आहे. तरीही जगातील एक आघाडीचा शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. सांबा म्युझिक आणि सुपरमॉडेलच्या या देशाची सर्वाधिक ‘सोयाबीन’ निर्यात करणारा देश, अशीही ओळख आहे. मका, ऊस, कापूस यांचेही प्रचंड उत्पादन देणार्‍या या देशाचा विमान उत्पादन करण्यात जगात तिसरा क्रमांक लागतो, हेही खरे वाटत नाही. 1964च्या लष्करी राजवटीत उदयाला आलेल्या ‘एम्ब्रार’ या विमान उत्पादन करणार्‍या कंपनीने बोइंग व एअरबसच्या प्रवासी विमान उत्पादनावर भर दिला आहे. या क्षेत्रात ‘एम्ब्रार’ जगात अव्वल आहे, तर ‘पेट्रोब्रास’ या ब्राझीलमधील सरकारी मालकीच्या कंपनीने तेल उत्पादनात पहिला क्रमांक कायम राखला आहे. कार्निव्हल आणि साम्बा म्युझिक व फुटबॉल यापलीकडचा हा देश आगळावेगळा आणि मोठा आहे. या देशातही राजकारण आहे, भ्रष्टाचार आहे. मात्र या देशाची जगण्याची तºहा वेगळी आहे. जीवनातील दु:ख ते सांबा, जॅझ, रॅप संगीतात विसरतात. कार्निव्हलमध्ये अंगावर ल्यालेल्या रंगीबेरंगी गणवेश, वेशभूषेसारखे त्यांचे जीवन आहे. या शतकात ब्राझीलने नैसर्गिक संपत्ती, सांस्कृतिक वैभव किंवा इतिहासात रममाण न होता कात टाकली. शेतीसह पेट्रोकेमिकल्स, खाण उत्पादन, हायड्रोलिक एनर्जी, अन्य ‘उत्पादन क्षेत्रात’ त्यांनी कमालीची प्रगती गेली. त्यामुळे गेल्या 14 वर्षांत श्रीमंत आणि गरिबांमधील आर्थिक तफावत कमी कमी होत गेली. बेरोजगारी कमी होण्याचा वेगही कमालीचा होता. विश्वचषक फुटबॉल (2014) आणि ऑलिम्पिक (2016) या जगातील दोन मोठ्या स्पर्धांचे यजमानपद मिळाल्यानंतर या देशाला मोठा हुरूप आला. नवी स्टेडियम्स, नवी हॉटेल्स, नव्या सोयी-सुविधांमध्ये प्रचंड गुंतवणूक व्हायला लागली. पर्यटन व्यवसायालाही वेग आला. जगातील सातव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असणारा लॅटिन अमेरिकेतला हा सर्वात मोठा देश खर्‍या अर्थाने आता पुढे येत आहे. विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन हे त्या प्रगतीचे एक पाऊल आहे.