आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगण्यासाठीचा जल्लोष!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निवडणुकांची रणधुमाळी आणि आयपीएलचे नाट्य संपून पंधरवडाही होत नाही तोच एक नवा थरार सर्वांच्या भेटीला येत आहे आणि तो दोन्हींपेक्षा वेगळा आहे. आज भारतामध्ये फुटबॉल हा जनसामान्यांना आकर्षित करणारा खेळ नसला, तरी क्रीडाप्रेमींना निश्चितच त्याचे अप्रूप आहे. भले भारत फुटबॉलमध्ये कुठेच नसेल, परंतु तरीही आज विश्व जवळ आलेले आहे! जग सर्वच दृष्टीने जोडले गेले आहे. त्यामुळे कुठेही कोणतीही मोठी घटना घडत असेल, तर तिच्यापासून कोणीही आज अलिप्त राहू शकत नाही आणि फुटबॉल विश्वचषक ही तर त्या खास रसिकांसाठी मोठी पर्वणीच आहे. सामान्य जनांना अनभिज्ञ असला, तरी त्यांच्यासाठी हा विषय प्रचंड कुतूहलाचा आणि आनंदाचा आहे. या वेळी ब्राझील काय करणार? आफ्रिकेतील कोणता देश करिश्मा दाखवणार आणि अंतिम विजेता कोण असेल, अशा चर्चा आता रंगत आहेत. मागच्या विश्वचषकाच्या वेळचा ‘पॉल ऑक्टोपस’ही नव्याने सर्वांना आठवतो आहे. त्या वेळच्या किश्शांवर चर्चा होते आहे.
वस्तुत: जगण्यासाठी सतत कोणत्या ना कोणत्या जल्लोषाची आवश्यकता असतेच. मग तो सिनेमा असेल किंवा करमणुकीचा कार्यक्रम असेल. काहीही असू शकेल. अगदी गल्लीमध्ये उड्या मारून लोकांचे लक्ष वेधून घेणारा लहान मुलगाही असेल. लोकांना सतत अशा जल्लोषाची तीव्र गरज असते आणि गंमत म्हणजे त्यांना हा जल्लोष त्यांच्या जीवनापासून वेगळा असावा लागतो. मुळात रोजचे जिणे इतके बिकट आणि असह्य झाले आहे की, त्यातून चार घटका विरंगुळा हा विरंगुळाच असावा लागतो. त्यामुळे प्रबोधनात्मक सिनेमे यशस्वी होऊ शकत नाहीत. लोकांना आपले वाटत नाहीत. जे आपल्या जीवनात नाही, ते पाहण्यामध्ये सर्वांत मोठी मजा असते. तृप्ती असते. त्यात खरी गंमत असते. आपण जे करू शकत नाही ते किमान दुसरी व्यक्ती तरी करते आहे, हे बघण्यातही अपरोक्ष समाधान आहे.
अर्थात, असे असले तरीही अशा मनोरंजनाद्वारे किंवा जल्लोषाद्वारे दर्शकांना खूप गोष्टी मिळतात. सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे आहे त्या स्थितीमध्ये संघर्ष करून पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. जेव्हा एखादा तरुण टीव्हीवर बिकट आव्हानाला सामोरा जात असलेला आणि प्रत्येक वेळेस हिमतीने फटके मारणारा विराट कोहली पाहतो, तेव्हा त्याच्या अंगावरही मूठभर मांस चढते. त्यालाही ऊर्जा मिळते. त्या दृष्टीने तर अशा जल्लोषाचे महत्त्व विलक्षण आहे. त्यातून मिळणारी प्रेरणा मोठी आहे. ज्यांना समज आहे आणि ज्यांना बघण्याची दृष्टी आहे त्यांच्यासाठी ही खरोखर पर्वणीच आहे. खेळाडूंना प्रचंड मानसन्मान असतो, ते अत्यंत प्रतिष्ठित असतात, सर्व सुखसोयी त्यांना उपलब्ध असतात, ही फक्त एक बाजू झाली. समज असलेली व्यक्ती दुसरी बाजूसुद्धा बघतच असते. फ्रान्सच्या झिदानसारख्या खेळाडूची मेहनत, कारकीर्दीच्या उत्तरार्धात त्याची शारीरिक फिटनेससोबतची झुंज, अभ्यासू वृत्ती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जिंकण्याची तीव्र विजिगीषू वृत्ती! रसिक त्यापासून अलिप्त राहू शकत नाहीत.
अशा खिळवून ठेवणार्‍या जल्लोषाचे महत्त्व या अर्थाने वेगळे आहे. एका समालोचकाने अशा प्रकारच्या स्पर्धांना meditative viewer-ship असलेल्या स्पर्धा म्हटले आहे. हे बघताना रसिक गुंगून जातात. स्वत:ला हरवून जातात. काही वेळ शांती आणि विश्रांती तर मिळतेच, पण इतरही गोष्टी मिळतातच. घेणार्‍यांना त्यातून प्रेरणाही मिळते. प्रोत्साहन मिळते. जर रसिक सुजाण असतील, तर त्यांच्यासाठी असा जल्लोष हा एक मोटिव्हेशनचा रिफ्रेशर कोर्ससुद्धा ठरू शकतो! विचारशील दृष्टीला त्यामध्ये खूप काही मिळू शकते.

त्यामुळे सर्वच चाहते निव्वळ मनोरंजनाच्या भूमिकेतून हा आनंद लुटतात, असा विचार करता येणार नाही. विशेषत: फुटबॉल विश्वचषक बघणार्‍या भारतीय चाहत्यांपैकी काही थोड्या लोकांना निश्चितपणे काही प्रश्न पडत असतीलच. भारतामध्ये क्रिकेटेतर खेळांची व खेळाडूंची स्थिती आणि त्यांच्या समोरचे प्रश्न हेसुद्धा प्रश्न मनात येणारच. कारण क्रीडाप्रेमी देशप्रेमीसुद्धा असतात. पेले, झिदान, मेस्सी असे खेळाडू बघत असताना आपण काही वेगळ्या पद्धतीचे तेंडुलकर, सेहवाग आणि विराट मुकतोय ही जाणीवही निश्चितच होणार. अशा जल्लोषामुळे इतका विचारही केला जात असेल, तर तो जल्लोष अधिकच उत्तुंग ठरतो.
स्पर्धांच्या बाबतीत एक गोष्ट सतत मनावर ठसवली जाते आणि ती म्हणजे हार-जीत हा वस्तुत: फारच नगण्य फरक आहे. इतका लक्षवेधक खेळ ही खरी गंमत आहे! गोल करण्याचे असंख्य प्रयत्न केले जातात आणि ते जवळजवळ तशाच प्रकारे अडवले जातात. मोक्याच्या क्षणी असलेली हिंमत आणि विचारशक्ती! इतक्या असंख्य आणि एकापेक्षा एक सरस गोष्टी ज्यामध्ये आहेत तिथे एक-दोन गोलमुळे हार-जीत ठरते आणि म्हणूनच ती नगण्य ठरते. कोण जिंकले किंवा हरले यापेक्षा किती दर्जेदार खेळ झाला हेच मनावर जास्त ठसते.
जीवनालाही हीच गोष्ट लागू पडते. प्रत्येक जण आपले काम करतो; खेळामध्ये आपल्याला असलेली भूमिका पार पाडतो. त्यामध्ये जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करतो. परिणाम मनासारखा होतोच असे नाही. परिणाम नेहमी मनासारखा होईलच असे तर नसतेच. त्यामुळे परिणामाची तमा सतत करण्यामध्ये अर्थ नसतो. खेळताना जीव ओतून खेळावे आणि खेळ संपल्यावर एकमेकांशी हास्यविनोद करत परतावे हाच याचा संदेश आहे.
फुटबॉल विश्वचषकाचे महानाट्य कालपासून सुरू झाले आहेच. आता महिनाभर रोमांचक लढती आणि बॉलचा पाठलाग रोज पाहायला मिळेल. स्टेडियमवरचा प्रेक्षकांचा रोरावता आवाज, मेक्सिकन लाटा पाहायला मिळतील. टीव्ही किंवा संगणकासमोर बघणार्‍यांमध्ये पैजा लागतील. दर्शकांसाठी मेजवानी आणि पर्वणी येईल. त्वेषाने चर्चा घडतील. हिरिरीने एकमेकांना त्याबद्दल माहिती दिली जाईल. सर्व सोशल मीडियामध्ये त्याबद्दल उत्साहाने आणि आक्रमकतेने चर्चा केली जाईल. पण हे सर्व होत असताना थोडी सजगता ठेवली, तर त्या जल्लोषाचा आनंद आणखी वाढेल आणि हा जल्लोष दर्शकांना रिक्त ठेवणार नाही. हा केवळ एक खेळ आहे. एक तात्पुरता थरार आहे आणि एका दिवसाची ही रंगत आहे. त्यापेक्षा मोठे सत्य त्यामागे असलेली कित्येक वर्षांची मेहनत आहे. असंख्य लोकांचे परिश्रम आहेत. फक्त खेळाडूच नाही, तर त्यांचे डॉक्टर्स, प्रशिक्षक, सहायक आणि ग्राउंडस्टाफ यांच्याही मेहनतीचे हे फळ आहे. हीसुद्धा एक मोठी तपश्चर्या आहे. प्रत्यक्ष चालू असलेला खेळ हे तर त्याचे शिखर आहे; पण त्या आधीचा प्रवास कित्येक संघर्षपूर्ण रस्त्यांवरून झालेला आहे आणि असाच प्रवास प्रत्येकाला प्रत्येक मार्गावर करावा लागतो आणि शेवटी त्यातून मिळणार्‍या हार-जीतच्याही पुढे जावे लागते. जल्लोष अनुभवताना ही सजगता असेल, तर हा जल्लोष सोन्याहून पिवळा होईल आणि बघणार्‍यांनाही तो समृद्ध करेल.
(niranjanwelankar@gmail.com)