आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुकूल कामगिरी (अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्लीत चार वर्षांपूर्वी झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेने भारताला भरभरून दिले होते आणि नेलेही होते. कलमाडी यांच्या कथित भ्रष्टाचाराच्या चर्चेत रममाण झालेल्या या देशाने त्या वेळी क्रीडाक्षेत्राला मिळालेल्या गतीकडे दुर्लक्ष केले. राष्ट्रकुल घोटाळा खणताना, भारताच्या अनेक क्रीडापटूंच्या उज्ज्वल भवितव्याची पाळेमुळेही नष्ट केल्याचे कुणाच्या लक्षात आले नाही. 38 सुवर्णपदकांसह भारताने पदकांचे शतक ओलांडून राष्ट्रकुल प्रमुख ब्रिटनलाही नवी दिल्लीत मागे टाकले होते. चार वर्षांनंतर पुन्हा एकदा आपण ‘बॅकफूट’वर आलो आहोत.

ग्लासगो येथील नुकत्याच संपलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताने पहिल्या पाचात स्थान कायम राखण्यात धन्यता मानली. खरे तर चार वर्षांपूर्वी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या भ्रष्टाचाराच्या काळ्या कृत्याचा फटका पदाधिकार्‍यांपेक्षा खेळाडूंना अधिक बसला. सरकारने प्रशिक्षण सोयी, सुविधा, परदेशी प्रशिक्षकांच्या नियुक्त्या आणि परदेशातील मोठ्या स्पर्धांवरील सहभागाचा खर्च आदींना कात्री लावली. 300 कोटींचे अनुदान 100 कोटींवर आले. आयओसीने आयओएवर बंदी घातली आणि खेळाडू व त्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम यांच्यातील महत्त्वाचा एक दुवाच त्यामुळे निखळला गेला. दर्जेदार देशी व परदेशी प्रशिक्षक, चांगले प्रशिक्षण कॅम्प आणि परदेशातील मोठ्या स्पर्धांमधील सहभाग यामुळे निर्माण झालेली गतीच नष्ट झाली. तत्कालीन केंद्रीय क्रीडामंत्री अजय माकन यांनी तर कलमाडी आणि भारतीय ऑलिम्पिक महासंघ याविरुद्ध आघाडी उघडली होती. त्यांची भाषणे आणि प्रत्यक्ष कृती यात विसंगती होती. त्यांच्याच कारकीर्दीत खेळाच्या खर्चाचे अंदाजपत्रक कमी झाले. खेळाडूंच्या परदेश दौर्‍यांवर निर्बंध आणले गेले. परदेशी प्रशिक्षकांच्या नियुक्त्या रद्द झाल्या.

खेळाडूंच्या प्रशिक्षणावरच्या खर्चाला कात्री लागली. देशातील प्रमुख क्रीडा प्रशिक्षण केंद्रांपैकी पतियाळा आणि बंगळुरू येथील कॅम्पची अवस्था अतिशय वाईट आहे. अशा परिस्थितीतही खेळाडूंनी ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत मिळवलेली 15 सुवर्णपदके, 30 रौप्यपदके व 19 कांस्यपदके अशी एकूण 64 पदकांची कामगिरी उत्कृष्टच म्हणावी लागेल. गेल्या काही महिन्यांच्या कालावधीत भारतीय ऑलिम्पिक संघटनाच अस्तित्वात नव्हती. भारतीय बॉक्सिंग फेडरेशनवरील बंदी अजूनही आहे. मुष्टियोद्ध्यांना प्रशिक्षक देण्यासही मज्जाव करण्यात आला होता. परदेशी स्पर्धांमधील सहभागच बंद झाल्यामुळे अनुभवही नाही. 2010च्या 7 पदकांच्या तुलनेत 2014च्या स्पर्धांमधील 5 पदके ही मुष्टियोद्ध्यांची कामगिरी खरोखरच कौतुकास्पद म्हणावी लागेल. त्यापैकी चार मुष्टियोद्धे अंतिम फेरीत पराभूत झाले, हेही नसे थोडके. गत स्पर्धेच्या तुलनेत नेमबाजी स्पर्धेतील काही क्रीडा प्रकार या वेळी रद्द करण्यात आले होते. तरीही भारतीय नेमबाजांनी या वेळी 17 पदके पटकावली. मल्लांनी 5 सुवर्णपदकांसह 13 पदकांवर हक्क प्रस्थापित केला. वेटलिफ्टर्सनी अपेक्षेप्रमाणे हात दिला व 3 सुवर्णपदकांसह 12 पदके मिळवली. ज्युडो या क्रीडा प्रकारात याआधी भारताच्या हाती फारसे काही लागायचे नाही. या वेळी भारतीयांनी ज्युडोत चक्क 2 रौप्य व 2 कांस्यपदके पटकावली.

हॉकीत भारताने आपले रौप्यपदक राखले असले तरीही बलाढ्य ऑस्ट्रेलियापुढे आपला निभाव लागत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. पी. कश्यपने सय्यद मोदीनंतर तब्बल 32 वर्षांनी भारताला राष्ट्रकुल बॅडमिंटनचे पुरुष एकेरीचे विजेतेपद मिळवून दिले, हेही अभिमानास्पद म्हणावे लागेल. बॅडमिंटन या खेळातील महिला विभागाचा आलेख मात्र उंचावण्याऐवजी खाली घसरला. उगवती तारका पी. व्ही. सिंधू उपांत्य फेरीत गारद झाली, तर ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांना महिला दुहेरीचा मुकुट स्वत:कडे ठेवण्यात अपयश आले. दीपा कर्मकारने जिम्नॅस्टिक्समध्ये कांस्यपदक पटकावून सर्वांना धक्का दिला असला तरीही दिल्लीत पदक पटकावणार्‍या आशिषकुमारने मात्र निराशा केली. दीपिका पल्लिकल व ज्योत्स्ना चिनप्पा यांनी स्क्वॅश महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावून नवा मानाचा तुरा देशाच्या क्रीडा इतिहासात खोवला. विकास गौडाने थाळीफेकीचे सुवर्णपदक पटकावून अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेच्या एकूण 3 पदकांच्या कामगिरीत आपले नाव गाजवले. गतवेळच्या पाच पदकांच्या तुलनेत टेबल टेनिसच्या वाट्याला या वेळी मात्र एकच पदक आले.
यजमान इंग्लंडने आणि स्कॉटलंडने राष्ट्रकुल स्पर्धेत यंदा आपली कामगिरी उंचावणे अपेक्षित होते. मात्र सहभागी खेळाडू आणि अधिकारी यांनी ‘ग्लासगो’पेक्षा नवी दिल्लीत झालेल्या स्पर्धा, आयोजनाच्या पातळीवर अधिक उत्तम असल्याचे प्रशस्तिपत्रक दिले. कुस्ती रेफरी वीरेंद्र मलिक यांच्याविरुद्धच्या विनयभंगाच्या तक्रारीमुळे आणि आयओए सचिव राजीव मेहता यांच्यावरील मद्यधुंद अवस्थेतील मोटार चालवण्याच्या आरोपामुळे भारताची अप्रतिष्ठा झाली. गेल्या दोन वर्षांतील दुष्टचक्र आता संपल्याची ग्वाही क्रीडापटूं्च्या राष्ट्रकुल स्पर्धांमधील यशाने दिली आहे. विजेतेपदाच्या व पदकांच्या रुळावर खेळाडूंची गाडी आली आहे. या गाडीला वेगात धावण्यासाठी नव्या सरकारक़डून आर्थिक पाठबळाचे इंधन हवे आहे.