आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुपरहीरो बाहुबली (अग्रलेख)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या चर्चेत असलेल्या दाक्षिणात्य चित्रपट "बाहुबली'ने बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड तोडले, असे सांगितले जात आहे. तिकीटबारीची आकडेवारी देणाऱ्यांच्या मते "बाहुबली'ने गेल्या नऊ दिवसांत जगभरात सुमारे ३०० कोटी रुपयांच्या वर धंदा केला असून भारतीय चित्रपट इतिहासात हा एक विक्रम आहे. शिवाय हिंदीत डब झालेल्या "बाहुबली'ने बॉलीवूडमध्येही पहिल्या आठवड्यात ५० कोटी रुपयांचा गल्ला कमावला आहे. आजपर्यंत हिंदीत डब झालेल्या एकाही चित्रपटाने एवढा गल्ला जमा केला नव्हता. एकंदरीत बॉक्स ऑफिसवरील दणदणीत यश व भाषिक मर्यादा ओलांडून लक्षावधी प्रेक्षकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या या चित्रपटाने भारतीय चित्रपटसृष्टीला आत्मविश्वास दिला आहे असे म्हणता येईल. सध्या अशा आत्मविश्वासाची गरजच होती. कारण आजपर्यंत केवळ हॉलीवूड इंडस्ट्रीच एवढ्या बिग बजेटचे चित्रपट तयार करत असे व नवनव्या सुपरहीरोंना भारतीय प्रेक्षकांपुढे घेऊन जात असे. आता बाहुबलीच्या निमित्ताने एक भारतीय सुपरहीरो जन्मास आला आहे असे म्हणता येईल. नवनवे सुपरहीरो जन्मास घालायचे व त्यांना पडद्यावर अविश्वसनीय वाटेल असे सादर करायचे ही हॉलीवूडची खासियत आहे. अशा चित्रपटांचे सादरीकरणातील तंत्र, चित्रपट निर्मितीवरचा लाखो डॉलरचा खर्च आणि जगभर पसरलेल्या वितरण व्यवस्थेमुळे हॉलीवूड इंडस्ट्री भारतीय चित्रपटसृष्टीपुढील मोठे आव्हान होते. हे आव्हान बाहुबलीने थोड्या प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. भले बाहुबलीने हॉलीवूडचे तंत्रज्ञान वापरून आपले बळ दाखवले असेल; पण एका भाषिक चित्रपटाने हॉलीवूडच्या तोडीस तोड चित्रपट निर्माण करण्याचा प्रयत्न तरी केला असे म्हणता येईल. या चित्रपटाच्या यशामुळे हॉलीवूड इंडस्ट्रीला आपल्या व्यवसाय तंत्रात बदल करावे लागतील अशी शक्यता नाकारता येत नाही. कारण आजपर्यंत हॉलीवूडने भारतीय पौराणिक कथांना किंवा या कथांमधील नायकांना प्रत्यक्ष पडद्यावर आणलेले नाही. तसेच थेट भारतीय मातीशी जुळणारा व येथील सामान्य प्रेक्षकांच्या मनात जागा करण्याचा प्रयत्नही हॉलीवूडने केलेला नाही. पण त्याचा अर्थ असा नाही की हॉलीवूड स्वत:च्या मर्जीत चालते. तिच्यामध्ये काळानुरूप बदल करण्याची प्रवृत्ती आहे व त्याचे प्रत्यंतर याअगोदर दिसून आले आहे.
फार लांबची गोष्ट नाही. साधारण १५-२० वर्षांपूर्वी हॉलीवूड इंडस्ट्रीवर मंदीचे ढग पसरले असताना या इंडस्ट्रीने मंदीवर मात करण्यासाठी आशिया व लॅटिन अमेरिकेत दाखवले जाणारे आपले इंग्रजी भाषेतील चित्रपट चिनी, हिंदी, तेलुगू, तामिळ, मल्याळम, स्पॅनिश भाषेत दाखवण्यास सुरुवात केली. अशा डब केलेल्या चित्रपटांमुळे इंग्रजी न समजणारा, मोजकेच इंग्रजी चित्रपट पाहणारा आणि इंग्रजी चित्रपट न पाहणारा नवा प्रेक्षक वर्ग हॉलीवूडला सहज मिळाला. त्याचा परिणाम असा झाला की, या प्रेक्षक वर्गाच्या मनोरंजन करण्याच्या दबावातून हॉलीवूडला आपल्या टिपिकल मारधाड चित्रपटांची मालिका खंडित करावी लागली, कथासंरचना, सादरीकरण यामध्ये बदल करावे लागले. डॉल्बी साउंड, कॉम्प्युटर ग्राफिक्स, आयमॅक्स अशा नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत नवे सुपरहीरो तयार करावे लागले. थोडक्यात, ८०-९० च्या दशकातील इंडियाना जोन्स, रॅम्बो, कमांडो अशा हीरोंची जागा सुपरमॅन, ही-मॅन, बॅटमॅन, एक्स मॅन, हॅरी पॉटर अशा कॉमिक हीरोंनी घेतली.

आता "बाहुबली'मुळे भारतीय उपखंडात एक नवा दबंग नायक जन्मास आला आहे. भारतीय प्रेक्षकांचा असा ग्रह (ठाम विश्वासच) झाला आहे की, हॉलीवूड पडद्यावर प्रेक्षकांना जे अविश्वसनीय दाखवू शकते ते भारतीय चित्रपटसृष्टीला शक्य नाही. हा समज बाहुबलीने पूर्णत: नाही पण थोड्या प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न केला असे म्हणावे लागेल. हा चित्रपट पाहिलेला प्रेक्षक थिएटरच्या बाहेर पडल्यावर चित्रपट बनवणाऱ्याच्या प्रयत्नांना दाद देतो. आपल्याकडे कल्पना व पैसे असतील तर हॉलीवूडच्या तोडीस तोड आपलेही असे बॉक्स ऑफिसवर विक्रम करणारे चित्रपट तयार होतील असे प्रेक्षकांना वाटते. अर्थात "बाहुबली'त वापरलेले ग्राफिक्स ही हॉलीवूडची देण आहे. पण असे विकसित तंत्रज्ञान भारतीय तंत्रज्ञ हाताळू शकतात ही जमेची बाजू आहे. महत्त्वाचे म्हणजे पहिल्यांदाच एखाद्या भाषिक चित्रपटसृष्टीने एखाद्या चित्रपटाच्या निर्मितीवर २०० कोटी रुपये खर्च करण्याचे धाडस दाखवले आहे. हे कौतुकास्पदच आहे. प्रेक्षकांचे मनोरंजन करणे व त्यांना सलग दोन-तीन तास खिळवून ठेवणे हा एक प्रकारे जुगारच समजला जातो. या चित्रपटाचा दिग्दर्शक एस. एस. राजामौली याचा बॉक्स ऑफिसवर गल्ला जमणारा हा सलग नववा चित्रपट आहे हाही एक विक्रम म्हटला पाहिजे. राजामौलीचे वडील के. व्ही. विजयेंद्र प्रसाद यांनी या चित्रपटातील महत्त्वाची पात्रे आठ वर्षांपूर्वी लिहून ठेवली होती. या पात्रांना आहे तसे पडद्यावर आणण्याची किमया त्यांच्या मुलाने दाखवून दिली आहे. एक भारतीय सुपरहीरो जन्मास आला आहे.
बातम्या आणखी आहेत...