आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तान कसा वठणीवर येईल?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची रशियातील उफा येथे भेट झाली, चर्चा झाली आणि एक संयुक्त पत्रक प्रकाशित झाले. मुंबईवरील बाँबहल्ल्याचा सूत्रधार लखवी याच्या आवाजाची ध्वनिफीत पाकिस्तानने देण्याचे मान्य केले; परंतु उफा येथील पत्रकावरील शाई सुकण्यापूर्वीच शरीफ यांचे सुरक्षा सल्लागार सरताज म्हणाले, ‘या घोषणापत्राला कागदाइतकीही किंमत नाही. काश्मीर सोडून चर्चा शक्य नाही. लखवीच्या ध्वनिफिती मिळणार नाहीत. इत्यादी.' पाकिस्तान एवढे बोलून थांबला नाही, त्याने प्रचंड गोळीबार सुरू केला. त्यात एक जवान आणि नागरिक ठार झाले. पाकिस्तान असा गोळीबार सुरू करतो तेव्हा सीमेपलीकडून भारतात दहशतवादी घुसवायचे असतात, असा त्याचा अर्थ केला जातो. भारतीय जवान त्याला जशास तसे उत्तर देत आहेत, ही गोष्ट वेगळी; परंतु गोळीबाराची वेळ लक्षात घेतली तर उफात शरीफ मोदी यांच्याशी काय बोलले, याला विशेष महत्त्व देण्याचे कारण नाही.

१९४७ मध्ये पाकिस्तानचा जन्म झाला. १९४८ला त्यांनी काश्मीरवर आक्रमण केले. एकतृतीयांश काश्मीर पाकिस्तान बळकावून बसला. १९६५ मध्ये भारतावर दुसरे आक्रमण केले. पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी खंबीर उत्तर दिले. आपल्या सेनेने मोठा मुलूख जिंकला. पुढे ताश्कंद करार झाला. हा करार धाब्यावर बसवून १९७१ मध्ये पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले. इंदिरा गांधी यांनी पूर्व पाकिस्तानला पाकिस्तानपासून वेगळा करून टाकला. बांगलादेशची निर्मिती झाली. झुल्फिकार अली भुट्टोंबरोबर सिमला करार झाला. या कराराचेही पाकिस्तानने पालन केले नाही. जनरल झिया यांनी भारताबरोबर दहशतवादी छुपे युद्ध सुरू केले. त्याला नाव दिले ‘ऑपरेशन टोपाझ'. नंतर पाकिस्तानच्या लष्कराने आणि आयएसआयने दहशतवादाला परराष्ट्र धोरणाचा भाग बनवले. मुशर्रफ दहशतवाद्यांना निर्लज्जपणे म्हणत की, ते स्वातंत्र्ययोद्धे आहेत. त्यांना प्रशिक्षित करून भारतात पाठवण्याचा पाकिस्तानने सपाटा लावला. मुंबई, इंदूर, जयपूर, बंगळुरू, दिल्ली अशा अनेक ठिकाणी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी क्रूर हल्ले केले. युद्ध करून, दहशतवादी हल्ले करून किंवा सीमेवर सतत गोळीबार करून हातात काही पडत नाही, असे स्पष्ट असतानाही पाकिस्तान सतत कुरापती का काढतो? या प्रश्नाचे उत्तर पाकिस्तानच्या जन्मकथेत आहे. पाकिस्तान हे अनैसर्गिक राज्य आहे. आणि ते इंग्रजांनी कुटील नीतीचा अवलंब करून निर्माण केले. जिना यांना पाकिस्तान निर्मितीचे श्रेय दिले जाते; परंतु जिनांचे नेतृत्व इंग्रजांनीच उभे केले. १९४२ नंतर इंग्रजांनी मुसलमानांच्या प्रश्नांवर जिना सोडून कोणाशीही बोलण्यास नकार दिला होता. पाकिस्तानचा जिनांचा सिद्धांतही हास्यास्पद होता. जिना पहिले कारण देत की, बहुसंख्य मुसलमानांना हिंदूंच्या छत्राखाली राहायचे नाही आणि दुसरे कारण देत की, मुसलमान स्वतंत्र राष्ट्र आहेत. बलुचिस्तान, पंजाब, सिंध, सीमांत प्रांत, पूर्व बंगाल हे मुसलमानबहुल प्रदेश होते. ते जर भारतात राहिले असते तर तिथे त्यांचेच राज्य राहिले असते. मुख्यमंत्री मुसलमानच झाला असता. मुसलमान स्वतंत्र राष्ट्र आहे, हा हास्यास्पद सिद्धांत आहे, कारण बांगलादेशी, पंजाबी, सिंधी, बलुची मुसलमान यांच्यात मशिदीत जाण्याशिवाय कसलीही एकवाक्यता नाही.

पाकिस्तानची निर्मिती इंग्लंड आणि अमेरिकेला काहीही करून हवी होती. आज पाकिस्तानात जी भूमी गेली आहे, ती इंग्लंड आणि अमेरिकेच्या दृष्टीने सामरिकदृष्ट्या महत्त्वाची भूमी आहे. एका बाजूला रशिया, दुसऱ्या बाजूला चीन आहे. पाश्चात्त्य जगाची अर्थव्यवस्था चालवणारे तेलसाठे अरबस्तानात आहेत. भारताची महासत्ता होण्याची क्षमता महाप्रचंड आहे. रशिया, चीन, भारत आणि तेलसाठे यांच्यावर करडी नजर ठेवण्यासाठी पाकिस्तानची भूमी अमेरिकेला आणि इंग्लंडला हवी होती. जिना ते नवाझ शरीफ यांच्यापर्यंत पाकिस्तानच्या प्रत्येक प्रमुख नेत्याचा इतिहास बघितला तर तो पूर्णपणे अमेरिकाशरण असतो. लियाकत अली खान आणि झुल्फिकार भुट्टो यांनी वेगळा मार्ग धरण्याचा प्रयत्न केला. लियाकत अलींचा खून झाला आणि झुल्फिकार भुट्टोंना झियांनी फासावर लटकवले. म्हणजे भुट्टोंचादेखील कायदेशीर खून झाला. या दोन्ही खुनांत अमेरिका गुंतलेली आहे. रशिया अफगाणिस्तानात शिरला तेव्हा अमेरिकेला पाकिस्तानच्या भूमीचाच उपयोग झाला. चीनशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी हेन्री किसिंजर गुप्तपणे पाकिस्तानातून चीनमध्ये गेले. ९/११च्या घटनेनंतर अफगाणिस्तानवर हल्ला करण्यासाठी सगळा पाकिस्तानच मुशर्रफ याने अमेरिकेच्या झोळीत टाकला.

पाकिस्तानचा प्राण इंग्लंड, अमेरिका अथवा त्यांच्या नाटो संघटनेत आहे. पाकिस्तानच्या कटकटी कायमच्या मिटवणे भारताला सैनिकीदृष्ट्या अशक्य नाही, परंतु सामरिकदृष्ट्या शक्य नाही. १९७१च्या युद्धात पूर्ण पाकिस्तान नष्ट होण्याची भीती अमेरिकेला वाटल्यानंतर अमेरिकेने आपले सातवे आरमार बंगालच्या उपसागरात आणले. नंतर अनेक वर्षांनी जी गुप्त कागदपत्रे उघड झाली त्यात निक्सन यांनी भारतातील काही शहरांवर अणुबाँब टाकण्याचा विचार सुरू केला होता, अशा बातम्या आल्या. पाकिस्तानला वाचवण्यासाठी अमेरिका कोणत्या स्तराला जाईल, हे यावरून लक्षात यावे.

मग पाकिस्तानला कसे वठणीवर आणता येईल? त्याचे एका वाक्यात उत्तर जशास तसे वागून. आपण प्रेते मोजत बसण्याचे सोडून दिले पाहिजे आणि पाकिस्तानलाही प्रेते मोजण्यास भाग पाडले पाहिजे. सिंधी मुसलमानांची सिंधू देश या नावाने चळवळ चालू आहे. बलुची मुसलमानांना पाकिस्तानात राहायचे नाही, आणि पख्तुनी पठाणांना पख्तुनीस्तान पाहिजे आहे. खान अब्दुल गफार खान यांची ती चळवळच होती. भारताने या सर्वांना पाठिंबा दिला पाहिजे. मैत्रीचे कितीही करार केले तरी पाकिस्तान आपला कधीही मित्र बनू शकत नाही. कारण त्याचे अस्तित्वच मुळी भारतापुढे अनंत प्रश्न निर्माण करण्याकरिता झालेले आहे. पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी ती गोष्ट मनापासून स्वीकारलेली आहे. अांतरराष्ट्रीय राजकारणाचा विचार करता वाटाघाटी, चर्चा, परस्परांच्या भेटीगाठी, अशी सर्व नाटकं करत राहावी लागतात; परंतु नाटक हे नाटक असते आणि व्यवहारातील रोजचे जीवन वेगळे असते. हे लक्षात घेऊन. ‘भले त्यासी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी।' या भावनेने व्यवहार केला पाहिजे.
(ramesh.patange@gmail.com)