आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रेट ‘ड्राइव्ह’.. (अग्रलेख)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूझीलंडविरुद्धची क्रिकेटमालिका दणदणीत विजयाने जिंकून भारतीय संघाने तमाम देशवासीयांना दिवाळीची हवीहवीशी भेट दिली आहे. आपापल्या आईचे नाव असलेली जर्सी धारण करत नोंदवलेला हा विजय दिवाळी पाडव्याचा गोडवा अनेकार्थांनी वाढविणारा आहे. कुठलाही विजय हा प्रेरणादायी असतोच, पण ज्या पद्धतीने भारतीय संघाने हा विजय नोंदविला तो खरोखरच प्रदीर्घकाळ लक्षात राहावा आणि मनावर खोलवर ठसा उमटावा असा आहे. सोबतच आईविषयीची कृतज्ञता व्यक्त करणारा संदेश दीपोत्सवाच्या औचित्याने दिला जाणे हा एक वेगळा आणि सकारात्मक विचार असल्याचे म्हणावे लागेल.

भारतीय संस्कृतीमधील सर्वात महत्त्वाचा समजला जाणारा आणि काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत एकाच वेळी साजरा होणारा सण म्हणजे दिवाळी. प्राचीन भारतीय परंपरेपासून हा काळ मंगल पर्व म्हणून ओळखला जातो. अशा या काळात प्रतिस्पर्ध्यांवर विजय संपादन करण्याची मजा काही वेगळीच. भारतीय क्रिकेट संघाने कसोटी तसेच एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडचा धुव्वा उडवून ही मजा मनमुराद उपभोगण्याची संधी चाहत्यांना दिली. कसोटीत आर. अश्विन आणि एकदिवसीय मालिकेत अमित मिश्रा या दोघांनी लक्षणीय यश मिळवत फिरकीची जादू पुन्हा एकवार सिद्ध केली. फलंदाजीत मात्र विराट कोहलीचा अपवाद वगळता अन्य कुणाची चमकदार कामगिरी झालेली नाही. असे असले तरी विजयासारखे दुसरे काहीच नसते. त्यामुळे तूर्त दिवाळीच्या निमित्ताने संपूर्ण देशाचा जो ‘सेलिब्रेशन’ मूड आहे, त्यात या विजयाची भर पडली आहे. पण त्याहीपेक्षा अधिक लक्षवेधक ठरतो तो आपल्या खेळाडूंनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने केलेला आईचा गौरव. क्रिकेटपटूंमार्फत स्त्री सबलीकरणाचा संदेश नव्या पिढीला दिला जाणे याला एक वेगळा अर्थ आहे. कारण सध्याचे बहुतेक क्रिकेटपटू युवा वर्गाचे ‘आयकॉन’ आहेत. क्रिकेटची अमाप लोकप्रियता तर त्यामागे आहेच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे कारण आहे तो क्रिकेटमधील करिअरसाठी जवळपास पूर्णांशाने कळीचा ठरणारा गुणवत्ता हा निकष. अत्यंत सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेले धोनीसारखे युवक आपल्या कर्तृत्वाच्या प्रकाशाने साऱ्या क्रिकेटविश्वाचे डोळे दिपवून टाकू शकतात ते त्यामुळेच. भारतीय संघातील इतरही बहुतेक खेळाडू हे अशाच सामान्य परिस्थितीतून आलेले असल्याने तरुणांना ते आपलेसे वाटतात आणि समाजमाध्यमांसह प्रत्यक्ष जीवनातही त्यांना ‘फॉलो’ करण्यात नवी पिढी धन्यता मानते. दाढी राखण्याच्या फॅशनचे उदाहरण त्यासाठी अगदी बोलके ठरावे. गेल्या काही काळापासून विराटसह संघातले अनेक खेळाडू दाढीधारी झाल्याने सध्या युवावर्गातही हा ‘ट्रेंड’ चांगलाच लोकप्रिय आहे. कुठल्याही लहान-मोठ्या शहरांतील महाविद्यालयांच्या आसपास चक्कर टाकल्यास दाढीचे खुंट वाढवलेले आणि क्रिकेटपटूंसारखे हेअरकट केलेले तरुण सहजपणे नजरेस पडतात. मुद्दा असा की, जर या खेळाडूंचे सहज म्हणून केलेले स्टाइल स्टेटमेंट तरुणाईत एवढे लोकप्रिय होत असेल तर त्यांनी एखादी बाब जाणीवपूर्वक केल्यास ती समाजमनावर उत्तमरीत्या ठसल्याशिवाय राहणार नाही. मैदानावर उतरताना या खेळाडूंनी आईच्या नावाची जर्सी घालून तिचा बहुमान करण्याचा उपक्रम त्यादृष्टीने महत्त्वाचा आहे. स्त्री सक्षमीकरणाचा प्रमुख उद्देश या कृतीमागे आहे आणि क्रिकेट विश्वातील तारे तो देत असल्याने त्याचा परिणाम खोलवर होईल यात शंका नाही; पण या विषयाकडे केवळ स्त्री सक्षमीकरण एवढ्यापुरत्याच मर्यादित अर्थाने बघितले जाऊ नये. भारतीय संस्कृतीने स्त्री सन्मानाबरोबरच नात्यांची वीण घट्ट करण्यावर कायमच भर राखला आहे. किंबहुना कौटुंबिक आणि पारिवारिक नात्यांचे जेवढे विस्तृत जाळे आपल्याकडे आहे तेवढे जगाच्या पाठीवर अन्यत्र कुठेच आढळत नाही. शिवाय, आई असो, बहीण असो, पत्नी असो की मावशी, आत्या, काकू अशा सगळ्याच नात्यांना आपली अशी एक खास ओळख आहे. मुलांवर योग्य ते संस्कार करण्यासाठी ही सगळी नाती मोलाचा हातभार लावत असतात. पण काळाच्या ओघात आणि पाश्चिमात्य संस्कृतीच्या अंधानुकरणात अलीकडे नात्यांची ही शंृखला काहीशी तुटक होत चालल्याचे दिसते. आपल्या संस्कृती आणि परंपरेचा एक अत्यंत महत्त्वाचा पैलू असलेल्या या कौटुंबिक नातेसंबंधांची जाणीव काहीशी पातळ होत असताना ही नाती अधिकाधिक घट्ट करण्याचे प्रयत्न विविध स्तरांवरून होणे अत्यावश्यक आहे. म्हणूनच भारतीय क्रिकेटपटूंचा हा प्रयत्न स्तुत्य ठरतो. या निमित्ताने सुरुवात चांगली झाली असून भविष्यात आणखी काही पावले त्यासाठी टाकता येतील. आईप्रमाणेच बहिणीचे नातेदेखील अत्यंत भावस्पर्शी असते. पण रक्षाबंधन आणि भाऊबीज वगळता हे नाते तसे दुर्लक्षितच राहते. अशाच काही उपक्रमांद्वारे बहिणीच्या नात्याचादेखील गौरव व्हायला हवा. क्रिकेटपटूंनी घेतलेला हा पुढाकार स्त्री सक्षमीकरणासाठी ‘ग्रेट ड्राइव्ह’च ठरावा असाच आहे.
बातम्या आणखी आहेत...